१५ ऑगस्ट, २०१४

मुले खोटे का बोलतात ? – मंगला गोडबोले


मुलांना वाढवताना काही प्रसंग मोठे बाके यायचे. म्हणजे उदाहरणार्थ, नेमकी मी घरात नसताना आणि नेमकी दोन्ही कार्टी घरात असताना घरातली सर्वांत सुंदर फुलदाणी फुटणे वगैरे. कोणी फोडली विचारले की, दोघेही कानावर हात ठेवायची. दोघांपैकी कोणीही तिला धक्का, हात किंवा बोटही लावलेले नसायचे; फार काय तिच्याकडे कटाक्षही टाकलेला नसायचा. पुराव्यादाखल एक मूल देवाची शपथ घ्यायचे, दुसरे माझी शपथ घ्यायचे. म्हणजे मामला आटोपलाच. घरामध्ये या दोघांखेरीज तिसरे भूत आढळलेले नसल्याने भुताटकीची शक्यताही नाकारावी लागायची. मग खात्रीचा निष्कर्ष काय काढायचा? मुले खोटे बोलताहेत एवढाच! मुले अधूनमधून खोटे बोलायचीच. अजूनही बोलतात. बदल असेल तर तो खोटे बोलण्याच्या हेतूमध्ये आहे एवढेच. लहानपणी ती मार चुकवायला खोटे बोलत असतील, तर आता कुमारवयात एखादा आळ चुकवायला खोटे बोलतात. तेव्हा एखादवेळेस स्वत:चा निष्पापपणा सिद्ध करायला खोटे बोलत असतील तर आता आपले खाजगीपण किंवा प्रायव्हसी सिद्ध करायला खोटे बोलून जातील. म्हणजे दर वळणावर कमीअधिक खोटे आहेच. खरे बोलायचे तर मुलांनी अधूनमधून खोटे बोलणे अटळच आहे. बिचा:यांवर नाना अडचणी येत असतात. नेमके क्लासच्या वेळात टी.व्ही.वाले चांगला सिनेमा दाखवायला निघाले की, क्लास बुडवताना खोट्याचा आधार लागतो. शाळेत आपल्या हातून प्रयोग करताना टेस्ट-ट्यूब फुटली आहे हे घरी कळू द्यायचे नसते. खडूस मास्तरांच्या शिक्षेच्या संकटातून मित्राला वाचवायचे असते. (मित्राऐवजी मैत्रीण संकटात आली तर ही जबाबदारी अनेक पटींनी वाढते.) काही वेळा मित्रमैत्रिणींवर ‘इम्प्रे’ टाकण्यासाठी कल्पनाविलासात्मक खोटे बोलावे लागते. कपिलदेव किंवा माधुरी दीक्षित आपल्याला ‘हॅलो’ म्हणाले असे अनेक मुले एकदा ना एकदा सांगतात. काहींना हळूहळू स्वत:लाही ते खरे वाटायला लागते. तेवढाच त्यांचा वेळ बरा जातो. अशा निरुपद्रवी खोट्यांपासूनच बहुतेक मुलेमुली थापेबाजीला सुरुवात करतात. शिवाय घरातल्या थापविलासाचे दर्शनही होत असतेच. टी.व्ही.वरची टेस्ट मॅच बघण्यासाठी ऑफिसला दांडी मारून घरी राहिलेले बाबा ऑफिसमध्ये खोटी सिकनोट पाठवतात. आपला ‘स्पेअर बर्शेन सिलिंडर’ मैत्रिणीला द्यावा लागू नये म्हणून आई अभिनयाची पराकाष्ठा करत मैत्रिणीला म्हणते, ”तुला दिलाच असता गंऽ पण आज आमच्याकडे पार्टी आहे ना…” मुलांवरती या सगळ्यांचा कळत-नकळत परिणाम होतच असणार. पण गंभीर परिणाम होतो तो आई-वडिलांवर. मुलांच्या खोटारडेपणाने आई-वडील खोलवर दुखावतात. ‘बिचा:या आपल्या मुलांचा नैतिक अध:पात होईल’ यासाठीचे हे दु:ख अर्थातच नसते. दु:ख असते अविश्वासाचे, फसवणुकीचे, आपली सत्ता नाकारल्याचे. पहिल्या मुलाचे पहिले खोटे अनेक पालकांना जड जाते ते यामुळेच. पुढे सवय होते किंवा करून घ्यावी लागते. खोट्यांचे विश्वरूपदर्शन रोज उठून घडायला लागते. सगळी खोटी ही स्पष्टपणे खोटी नसतात. त्यांच्या नाना छटा असतात. साधारणपणे तिसरी-चौथीपासूनच, बाहेरच्या किती गोष्ट घरात सांगाव्यात व किती सांगू नयेत याची आपापली गणिते मुले बसवायला लागतात. असे ‘निवडक सत्य’ (Partialtruth) हेही एका परीने खोटेच की. फसवणे…लपवणे…वाढवून सांगणे यात कमीजास्त मार्क कसे देणार? प्रश्न मोठा बिकट असतो. ”सत्य सदा बोलावे, सांगे गुरू आणि आपुला बाप! असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप॥” असे ऐकत, म्हणत मोठ्या झालेल्या पालकपिढीला तर तो फारच बिकट वाटायला लागतो. ‘खोटे कधी बोलू नये,’ ‘बरे सत्य बोला…’, ‘सत्यमेव जयते…’ हे सगळे काय उगाचच शिकवले जात होते? मला असे अजिबात वाटत नाही.उलट वाटते, तसे शिकवले हे बरेच झाले. निदान सत्याच्या बाबत तरी, ”आम्हीही सुंदर झालो असतो…” असे म्हणण्याची वेळ आजच्या पालकपिढीवर त्यांच्या अगोदरच्यांनी येऊ दिली नाही. त्यांनी शिकवायचे ते शिकवले, यांनी घ्यायचे ते घेतले. त्यांनी आदर्श पुढे ठेवला, यांनी त्यात वास्तवाचे पाणी घालून तो हवा तेवढा पातळ करून घेतला. सत्यही राहिले, त्यामध्ये प्रत्येकाची आवड, ऐपत, सोय हेही गरजेप्रमाणे मिसळून गेले. पुढची पिढी ही सर्वच बाबतींमध्ये पुढची. त्यामुळे स्वत:ला हवे ते करणारच आहे. वाढते स्वातंत्र्य, वाढती प्रलोभने यांमध्ये सत्याची पीछेहाट होणारच आहे. पालकांनी ती कशी स्वीकारावी हे कळणे ही काळाची गरज आहे.अनुभवावरून आणि वाचन-विचारांवरून मला असे वाटते, मुलांच्या कोणत्याही खोट्यावर एकदम आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे पालकांनी टाळायला हवे. खोटे बोलण्यामागचे कारण काय आहे हे प्रसौम्यच घ्यायला हवी. म्हणजे समजा, प्राथमिक शाळेतल्या मुलाला कपिलदेवने ‘हॅलो’ म्हटले असेल तर ते तसे म्हणू द्यावे. ‘हॅलो’ म्हणायला हरकत घेणारे आपण कोण? तसेच गमतीने रुपयाचे नाणे गिळायला जाणारे प्रत्येक मूल काही मोठेपणी एक्साइज इन्स्पेक्टर होत नाही हेही समजून घ्यावे. ही गंमत गमतीच्याच पातळीवर राहते आहे हे बघितले म्हणजे पुरे. थापेसाठी थाप, मजेसाठी खोटे बोलणे इतपत निरुपद्रवी असत्य फारच तात्कालिक असते, त्याला तितक्याच गांभीर्याने वागवावे. शिक्षेच्या भीतीने, स्वत:ला किंवा दुस:याला वाचवण्यासाठी बोललेले खोटे जरा तपशिलाने बघावे. शिक्षेची वेळच मुळात का यावी? वाचवण्यासाठी आटापिटा का करावा लागला याचा विचार व्हावा, याबद्दल मुलांशी सल्लामसलत व्हावी, ही वेळ वरचेवर येऊ नये म्हणून मार्गदर्शनही द्यावे. केवळ कौतुक करून घेण्यासाठी मूल खोटे बोलत असेल तर त्याची कौतुकाबाबत फार उपासमार तर होत नाही ना हेही बघितले जावे. कौतुकाची गरज काही मुलांना जास्त वाटते, जसे, स्वातंत्र्य किंवा प्रायव्हसीचे आकर्षण काही मुलांना इतरांपेक्षा लवकर वाटायला लागते. त्यांना त्या हौशी भागवण्यासाठी खोटे बोलायला लागणार नाही, यासाठी पालकांनी जागरूक राहावे. काम किंवा कर्तव्य टाळण्यासाठी, हेतुत: फसविण्यासाठी, कोडग्या स्वार्थासाठी, हीन स्पर्धेसाठी खोटे बोलणे मात्र केव्हाही क्षम्य समजू नये, दुर्लक्षू नये.थम समजावून घ्यायला हवे. कारण जर फुटकळ किंवा सौम्य असेल तर प्रतिक्रियाही अशा वेळा बहुधा किशोरवयानंतर जास्त येऊ लागतात. आता आता इवले वाटलेले मूल एकदम मोठे होते, बाहेरच्या विराट दुनियेत फेकले जाते. अशा वेळी त्याचा खोटेपणा वाढला तर पालकांनी एकदम सजग व्हायला हवे. हे मूल शिक्षणाव्यतिरिक्त काय करते, कुठे जाते, कोणात मिसळते, कोणती वाहने चालवते, टी.व्ही.-व्हिडीओवर काय बघते, ड्रग्ज वगैरे तर घेत नाही ना, हे सगळे बारकाईने बघायला हवे आणि कितीही अप्रिय वाटले तरी वेळच्या वेळी याला आळाही घालायला हवा. एक खोटे निस्तरायला दहा खोटी बोलण्यापर्यंत त्याची मजल जाऊ देऊ नये. मुलांना खरे आणि केवळ खरेच बोलायला लावणे केव्हाही कठीणच होते. आज ते कधी नाही इतके दुर्घट होत चालले आहे. ‘खोटे कधी बोलू नये’ हे वाक्य प्रिय तर खरेच, पण त्या ‘कधी’ पुढे ‘च’ आणि वाक्यापुढे भलाभक्कम पूर्णविराम देण्यापेक्षा, खोटे कधी बोलू नये? हे प्रश्नचिन्हात्मक मार्गदर्शन मला जास्त मोलाचे वाटते ते यामुळेच. जिथे आपल्यावर विश्वास टाकला जातो, जिथे वैयक्तिक किंवा सामूहिक नीतीचा प्रश्न येतो, जिथे आपल्या खोट्याने दुस:यावर अन्याय होतो, दुस:याला दु:ख होते, तिथे खोटे नक्कीच बोलू नये, बोलल्यास त्याची गयही करू नये. बाकी किरकोळ एप्रिल फूल बाराही महिने केले तरी चालेल. असा कुठेतरी सत्याशी समझोता व्हायला हवा. टीप : हा लेख लिहिताना Why Kids Lie या Paul Ekman यांच्या पुस्तकाचा मला विशेष उपयोग झालेला आहे. हे सगळे माझेच आहे असे खोटे कशाला बोला? मंगला गोडबोले