१६ फेब्रुवारी, २०११

संस्कार - कालचे आणि आजचे

मुलांना संस्कार नाहीत, ते देण्यात आई वडील कमी पडतात, विभक्त कुटुंब पद्धती, घरात आजी आजोबांचे नसणे .... ह्या आणि अश्या अनेक कारणांचे खापर आजच्या पिढीवर फोडल्या जात.
मुलांना संस्कार देण्याची जबाबदारी आधी आई वडिलांची, मग शिक्षकांची आहे हे पिढ्यानपिढ्या आपण गुहीत धरत आलो आहोत. एखादा मुलगा वडीलधारयाशी वाद घालताना दिसला किंवा मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसली कि आई वडिलांचा उद्धार आज हि होताना दिसतो.

पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंतची परिस्थिती साधारण पणे अशी होती. मुल जन्माला आल्यानंतर आईच्या जवळच असायचं, त्या नंतर हळूहळू त्याच्या विश्वाच्या कक्षा रुंदावून त्यात वडील, भावंड, आजी आजोबा ह्यांचा समावेश होत असे. मुल शाळेत जाई पर्यंत त्याचं विश्व, हे फक्त त्याच कुटुंबच होत. त्यामुळे आईवडील आणि आजी आजोबा जे सांगतील ते आणि तेच बरोबर, हा विश्वास आपोआप त्या मुलामध्ये रुजायचा. आज मुल जन्माला येत आईच्या कुशीत पण वाढत आयाच्या मांडीवर किंवा पाळणाघरात. त्याला नजर येते ती टीव्ही वरची गाणी बघता बघता. टीव्ही वर कार्टून लागलं नसेल तर ते दुध पीत नाही. हातात पेन्सील धरता येत नसली तरी रिमोट ची बटण बरोबर दाबून हवं ते च्यानल लावता येत. रांगणारी मुल सुद्धा खुळखुळ्या ऐवजी मोबाईल शी खेळण पसंत करतात. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण ह्याच कौतुक सुद्धा करतो.

घरात रोज देवा जवळ दिवा लावल्या जात होता, शुभंकरोती आणि रामरक्षा आजी म्हणत असे ती आपसूक मुल आत्मसात करत होती. देवानंतर पहिला नमस्कार आईवडिलांना, हे आजीने शिकवलं त्यातून देवा नंतर च स्थान आई वडिलांचं हे कोणी न सांगताच मनावर कोरल्या जात होतं. मुल शाळेत जाई पर्यंत हा संस्कारांचा पाया मजबूत होत होता. घरातल्या व्यक्तीबद्दल चा आदर आणि विश्वास त्याचा आत्मविश्वास वाढवत होता. आज घरामध्ये आई वडील भाऊ बहिण आजी आजोबा ह्यांच्या बरोबर टीव्ही मालिका मधली characters , त्यातले भडकपणे दाखवल्या जाणारे प्रसंग हे सुद्धा त्या बालमनावर संस्कार करतात.

पूर्वी, घरात आईने एक आणि आजीने दुसरं सांगितला तर कोणतं स्वीकारायच ह्या संभ्रमात मुलं बावचळून जात होती. मग आता चाहु बाजूने चार अतिशय भिन्न संस्कार त्यांच्यावर घडले तर ते किती गोंधळून जात असतील? नोकरी करणारे आईवडील त्यांना जेवढा वेळ देवू शकतात त्याही पेक्षा हे टीव्ही आणि कॉम्पुटर त्यांची जास्ती सोबत करतो. घरातल्या वडील मंडळींकडून कितीही सात्विक संस्कार मिळाले तरी ह्या माध्यमातला चमचमीतपणा त्याला आकर्षित करणारच. मग आई वडील यांच्या पेक्षा ते ह्या यंत्रांवर विश्वास ठेवतात.

पूर्वी सकाळची न्याहारी आणि रात्रीच जेवण हे संपूर्ण कुटुंब एकत्र करत असत. त्यामुळे पंक्ती प्रपंच, वाढलेले पदार्थ न टाकता सगळे संपवणे, अन्नाचा मान राखणे, हे जेवताना अपेक्षित असलेल वळण, वेगळं लावाव लागत नव्हत.पूर्वी वडील संध्याकाळी घरी आले, कि संध्याकाळी नाष्टा चहा होत असे आणि रात्री सगळेजण एकत्र येवून, गप्पा मारत, मजेत जेवण होत असत. आता नोकरीच्या वेळा बदलल्या. आई वडील घरी पोचेपर्यंत जेवणाची वेळ टाळून गेली असेल तर मुलं आपल्याच हातानी फक्त आवडेल तेच पदार्थ वाढून टीव्ही समोर बसून जेवतात. ह्यात त्या गृहिणीचा हि दोष नाही किंवा मुलांचा तर अजिबात नाही. आज एकतरी घर असं आहे, कि जिथे टीव्ही नाही? टीव्ही कॉम्पुटर ह्या आता गरजेच्या वस्तू झाल्या आहेत.

घरी वडीलधारया माणसांचा आदर ठेवावा आणि तोच विश्वास शिक्षकांवर ठेवावा हि शिकवण घरातून मिळत होती. सगळेच शिक्षक उत्कृष्ट शिकवत होते असा त्याही काळी नव्हत पण शिक्षकांचं स्थान पूजनीय होत. त्यांच्या शिक्षकी पेश्यामध्ये पुस्तकी ज्ञान देण्याबरोबर समाज घडवण्याची जबाबदारी सुद्धा गृहीत धरली होती. मुलाला शाळेत घातलं कि त्या मुलाच आयुष्य घडवण्याची जबाबदारी शिक्षक स्वीकारत होते.
आज मुळात शिक्षकी पेशा आवडीने आणि त्यातली जबाबदारी समजून तो स्विकारणारे शिक्षक दुर्मिळ झाले आहेत. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी कि पूर्वी ज्ञान मिळण्याचा एकमेव आधार हा शिक्षक होता. आज संगणक तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे कि मुलांना हवी ती माहिती एका 'click ' वर मिळते.

पूर्वी मनातला कोणताही प्रश्न वडीलधाऱ्या व्यक्तीला विचारला कि मिळेल ते उत्तर बरोबरच आहे असा गृहीत धरून मुलं ते आत्मसात करत होती. त्या विरुध्द बोलण्याची मुलांची हिम्मत नव्हती आणि वडीलधार्या माणसाना सुद्धा तो अपमान वाटत असे. आज मुलं मोकळेपणी चर्चा करतात, विचारतात, पण त्यानंतर गुगल वर जावून पडताळून बघतात. तुमच उत्तर जर त्या उत्तराशी समन्वय साधणार नसेल तर ते तुम्हाला स्पष्ट पणे सांगायला मागे पुढे बघत नाहीत. पण त्या मागचा त्यांचा हेतू तुमचा अपमान करण्याचा नसतो.

पूर्वी दोन पिढ्यांमध्ये साधारणपणे २० वर्षाच अन्तर असत असं म्हणाल्या जायचं. आता ते पाचच वर्ष झालं आहे. म्हणजे आपल्या मध्ये आणि आपल्या मुलांमध्ये साधारणपणे चार पिढ्यांचं अंतर पडत. हि ग्याप कमी करण्यासाठी आपण थोडं जोरात धावायचं कि मुलांना मागे ओढायच? आपण दोन पावलं पुढे गेलो तर मुलं मागे वळून तरी नक्कीच बघतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा