२५ ऑगस्ट, २०१०

घर मुलांचं

घर मुलांचं


हल्ली नवे आई-बाबा हौसेनं फ्लॅट घेतात इंटिरियर डेकोरेटरकडून तो सजवून घेतात. त्यात मुलांची खोली असते, तिथे कपाटं रंगीत, भिंती रंगीत, पलंग रंगीत, बाथरूम रंगीत एवढंच काय छत आणि पंखादेखील रंगीत असतो. ते सगळं पाहून हे मुलांना खरंच आवडत असेल का असा मला प्रश्न पडतो. मुलांना काय आवडावं ते आपण असं कुण्या परक्या माणसाच्या हाती कसं काय सोपवून टाकतो? आणि डेकोरेटर मंडळी कुठली तरी तयार पुस्तकं पाहतात, दाखवतात तो फोटो छान दिसतो म्हणून तशा रचना निवडल्या जातात; पण मला हे सगळं मुळीच `बालकेंद्री' वाटत नाही.

जसं लहान मुलाला स्वत:च्या हातानं ते जेवायला लागलं की लहान ताट देऊ नये, मोठं ताट द्यावं.कारण ते मूल अन्न सांडतं, उडवतं, पसरतं. तसंच लहान मुलं लोळतात, त्यांना त्यांच्या मापाचा छोटा पलंग कसा चालेल? घरात अभ्यास करतानाही मुलानं त्याच्या छोट्या टेबलावर छोट्या खुर्चीवर अंग आखडून का बसायचं? छोट्या फळयावरच का चित्रं काढायची? लहान मुलांच्या हालचाली कशा जोरदार असतात ती तेवढा हात उंच करतात, भोवताली फेकतात तेवढी चित्रं काढायला जागा त्यांना मिळायला हवी.

तासाभराच्या शिबिरातसुद्धा आपण पाहिलं तर मुलं कधीच `देवासारखी' मांडी घालून ताठ बसत नाहीत. ती एक पाय दुमडून बसतील, दोन्ही पाय आरामात मागे दुमडून बसतील, पालथी पडतील. त्यांच्या एकेक अवस्था पाहण्याजोग्या असतात. आपण `लाइफ स्टाइल'च्या मागे लागून त्यांना शारीरिक मर्यादा घालतो आहोत का? त्याचे परिणामही दिसत आहेत. मुलं कोलांटी उड्या मारू शकत नाहीत, मुलांची डोकी गुडघ्याला लागत नाहीत, ती सरसर झाडावर चढू शकत नाहीत. घरात हालचालीच्या मर्यादा आणि खाण्यात काहीच मर्यादा नाहीत, दोन्ही कारणं आहेत मुलांचा लवचीकपणा जायला.
घरात सर्वांत काय आवडतं याचं उत्तर अनेक मुलं टीव्ही असं देतात. काहीजण कम्प्यूटर असं देतात. टीव्ही म्हटलं की मुलांची जी टकळी सुरू होते. आपण कधी न ऐकलेल्या अशा अनेक कार्यक्रमांची, मालिकांची, चॅनल्सची, शोज्ची नावं मुलं फटाफट सांगत असतात. कशातलं कुठलं पात्र मस्त असतं ते सांगतात. किती वेळ टीव्ही बघता याचं उत्तर आई ओरडेपर्यंत असं असतं.

घरात कॉम्पुटर वापरणाऱ्या मुलांची संख्याही बरीच आहे. आमच्याकडे पाच कॉम्पुटर आहेत. लॅपटॉपपण आहे, असंही सांगणारी मुलं भेटतायत आणि अनिर्बंध कम्प्यूटर वापरणारी मुलं-मुली आठव्या व नवव्या वर्षी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडची भाषा करू लागलीत. त्या नात्यांच्या मानसिक परिणामांना बळी पडू लागलीत. अभ्यासातलं लक्ष उडणं, घरात आई-वडिलांशी सतत वाद होणं, शाळेत जायचा कंटाळा असे अनेक प्रश्न वेगानं निर्माण होऊ लागलेत.
शहरीकरणाच्या रेट्यात, पैशांच्या समृद्धीत, दिवाणखान्याला बळी पडताना, घराचं डेकोरेशन करताना आपण मुलांच्या गरजा किती वेगानं विसरत चाललो आहोत आणि हे सगळं हौसेनं ज्या मुलांसाठी करायचं ती काय म्हणतायत? ती काय सांगतायत?
एक मुलगी म्हणत होती `मला घरातलं बाकी काही आवडत नाही; पण माझी छोटी बहीण आवडते.' एकजण सांगत होता `आजी नसली की मला घर आवडत नाही. आजी लाड करते.' एक म्हणाली, `मला आबा आवडतात.' एका मुलीने नाक उडवत सांगितलं, `माझं कपड्यांचं कपाट डॉल्स हाऊसच्या आकाराचं आहे ते मला मुळीच आवडत नाही.' एकीनं निषेध नोंदवला, `मला बाबांचं कपाट आवडत नाही ते कपडे कसेपण कोंबतात आणि वासपण येतो.' एकाने सांगितलं, `मला माझी खेळण्याची बास्केट आवडत नाही. कारण त्यात खूप मोडकी खेळणी तशीच ठेवलीत.' हे एकेक वाक्य आपल्या अभ्यासासाठी आहे असं मला वाटलं.
शाळेत कुटुंबाचं `फॅमिलीचं' चित्र काढायला सांगितलं होतं तर एका मुलीनं आई-बाबा-मुलं, आजी, आजोबा, घरातली कामाची बाई, मांजर, कुत्रं, ड्रायव्हर काका असं चित्र काढलं, तर बाइंर्नी त्यावर काट मारली. सांगितलं, `आई-बाबा आणि तू एवढंच चित्र काढून आण.' हे ऐकून मी धन्य झाले! मुलांचं जगच वेगळं असतं. त्यांना घरातली माणसं एवढंच नाही तर नातेवाईक, शेजारी, प्राणी एवढंच काय घरातली पाल (शिल्लक ठेवली असेल तर) हीसुद्धा आप्तमंडळी वाटतात. घराचं चित्र काढायला सांगितल्यावर एकदा एका मुलाने नुसतंच फुलपाखरू काढलं त्याच्याबद्दल बोलताना तो अगदी नाचून सांगत होता, `आमच्या घरात हे येतं आणि असं खुर्चीवर बसतं, मग भिंतीवर बसतं, मग उडून जातं.' एका मुलाने घराचं चित्र म्हणून मोठं शेत काढलं होतं. त्यात हिरवं पिवळं गवत आणि एका कोपऱ्यात त्याचं स्वत:चं छोटंसं चित्र. म्हणाला, `मला घर नाही आवडत शेतच आवडतं.'
एका मुलीने घराचं चित्र म्हणून बाबा आणि तीन मुली आणि मुलीच्या दोन्ही वेण्या पुढे जमिनीपर्यंत आलेल्या अशा काढल्या. तिच्या आईचे केस लांब आहेत का मी पाहिलं तर नव्हते. तिचेही नव्हते. बहिणीचेही कापलेले. मग तिनं असं का चित्र काढलं तर तिची आई म्हणाली, तिला लांब केस आवडतात म्हणून ती नेहमी मुली अशाच काढते.
मुलांचं हे वागणं केवळ चित्रांपुरतंच खरं नाही. त्यांना काय आवडतं ते शोधून काढून ते करण्याची त्यांची धडपड अखंड चालू असते. त्यामुळे घरात मला सगळयात गॅलरी आवडते. तिथेच मी भातुकली खेळते. मला गच्चीच आवडते तिथे मी खूप खेळतो. चांगली खेळणी शोकेसमध्ये ठेवतात म्हणून मग मी मोडक्या खेळण्यांशीच खेळतो असं मुलं सांगत असतात. मुलांसाठी आणलेली पुस्तकंसुद्धा कपाटात बंद ठेवणारे नीटस आईवडील असतात.
अर्थात ही उदाहरणं मुद्दाम लिहायचं कारण सुधारणा इथे हवी आहे. नाहीतर समंजस आई-बाबांचं प्रमाणही हळूहळू वाढताना दिसतं आहे, ही आनंदाची गोष्ट सांगायला हवीच.
आपापली कामं करताना मुलं वाढवणं, त्यांना पुरेसा वेळ देणं ही नवी कौशल्यं आई-बाबा दोघांनीही आत्मसात करायला हवीत. मुलाची वाढ म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक वाढ हे सगळं कायम लक्षात असावं लागतं. कृतीत उतरावं लागतं. तसं भान असलेले आई-वडीलही मला दिसायला लागलेत. फक्त भीती अशी वाटते की भरपूर पैसे मिळवणं हा मार्ग एकदा मान्य केला की त्या वाटेवर अनेक गोष्टी हरवतच जाणार की काय! वेळ हरवणार, नाती हरवणार, स्वास्थ्य हरवणार, आणखी कितीतरी !
पण आपण असा नकारार्थी विचार करून चालणार नाही. काय हरवता कामा नये हे कायम लक्षात ठेवायला हवं. त्यात प्रेम हरवता कामा नये. घरातली शांती हरवून चालणार नाही. निरपेक्षपणे इतरांसाठी काम करण्याची आपली संस्कृती विसरून चालणार नाही. सातत्यानं चांगल्या गोष्टी करत राहण्याच्या सवयी घरात रुजायला हव्यात. मुलांचा उत्साह आयुष्यभर शिल्लक राहील असा आनंदाचा आणि कामसूपणाचा पाया भक्कम करायला लागेल. कितीही लाटा आल्या आणि रेटे वाढले तरी आयुष्यात कोणती मूल्यं कधीच विसरायची नाहीत त्याची पक्की तयारी आई-वडिलांचीच असायला हवी, तर ती मुलांपर्यंत पोचेल. स्पर्धा स्पर्धा म्हणून नको ते ताण मुलांवर लादणं बंद व्हायला हवं. आयुष्य वैयक्तिक झेंडे लावण्यासाठी नसून सामाजिक गरजा, सामाजिक न्यायासाठी, डोळसपणे कामं करण्यासाठी आहे हे पटलं तर मुलं फार सुजाणपणे आपले मार्ग शोधतात. भारतात जन्मलेल्या माणसांना तरी आपल्या भोवतालच्या गरीब जगाचा विसर पडून चालणारच नाही आणि या पृथ्वीचं जे काही वाटोळं आजवर आपण केलं ते यापुढे करत राहणार नाही या विचारामागे वेगानं जात राहण्याला पर्यायच नाही. या सगळया गोष्टी घरानंच शिकवायच्या आहेत.
जगाचा प्रगतीचा वेग वाढला असेल तर घर अनभिज्ञ असून कसं चालेल? ज्या घरात भावी काळातलं जग उमलत असतं, आकार घेत असतं ते मुलांचं घर किती सुजाण व्हायला हवं!

- शोभा भागवत,

२४ ऑगस्ट, २०१०

आनंदाचे रोपटे !

परिपूर्ण शिक्षण म्हणजे जीवनाचा अनुभव, जगण्यातील मजा, विविध वस्तू, प्रक्रिया यांचं अवलोकन आणि निरीक्षण. कोवळ्या मुलांवर नाही ती ओझी लादून आपण काय मिळवतो? त्यांच्या सर्जनशीलतेला किती वाव देतो? आम्ही यातून बाहेर पडलो आहोत आणि भोवताली पसरलाय आनंद आणि आनंदच...

दहा ऑगस्ट २००९, आमच्या आयुष्यातील एक क्रांतिकारी दिवस ठरला. आमची दोन्ही मुलं एका प्रथितयश कॉन्व्हेंट शाळेत शिकत होती. मुलगी होती पहिलीला आणि मुलगा sr. K.G.मध्ये english Medium (कॉन्व्हेंट)ला. अट्टहासामुळे त्यांची होणारी मानसिक घुसमट आम्ही रोज अनुभवत होतो. शाळेमध्ये होणारा इंग्रजी संभाषणाचा अट्टहास, रनिंग लिपी समजावून घेण्यासाठी होणारी मुलांची घुसमट, दप्तरांचं ओझं आणि या समस्या "रॅट रेस'मध्ये आपापली लेकरं पुढं दामटण्यासाठी मुलांवर शाळेच्या वेळांव्यतिरिक्त खासगी ट्यूशनचा अत्याचार, हे सगळं सगळं मुळापासून उखडून टाकावंसं वाटत होतं. पण, त्यासाठी आपल्या संस्कारांची, मातृभाषेची किंमत मोजायची तयारी नव्हती. जीवनाचा वेग समजत होता; परंतु त्यासाठी कोवळ्या मनांचा, अल्लड बालपणाचा बळी द्यायचा नव्हता आणि या सगळ्या मानसिक आंदोलनात एक आशेचा किरण दिसला, जिथं इंग्रजी शिक्षण होतं, संभाषण होतं, परंतु त्याचा अट्टहास नव्हता. मायेच्या ऊबेत त्यांच्या कोवळ्या मनाचा विचार करून लडिवाळ मातृभाषेतून इंग्रजी समजावून सांगण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. जिथं कवितेचं गाणं होत होतं आणि धड्याचं जीवन अनुभवाशी नातं जोडलं जात होतं.

मनाचा धीर एकवटला. इंग्रजी शाळेच्या विळख्यातून आधुनिकतेच्या नावाखाली मुलांच्या मन मारण्याच्या प्रक्रियेला फाटा दिला आणि दोन्ही मुलांची ऑगस्ट २००९ च्या मध्यात कॉन्व्हेंट शाळेतून नावं काढली आणि महाराष्ट्र विद्या मंडळाच्या नवीन पद्धतीने सुरू झालेल्या सेमी इंग्रजी शाळेत त्यांचा प्रवेश घेतला. आज सुमारे एक वर्षाने आम्ही जेव्हा मनाला प्रश्‍न विचारला, की या एक वर्षात आम्ही काय मिळवलं, तर त्याचं उत्तर आनंद, आनंद आणि आनंदच!

कशाकशाचा म्हणून सांगावा आनंद! सर्वप्रथम मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. रोज शाळेतून घरी आलं, की आपण फक्त काय काय झालं विचारायचा अवकाश, त्यांच्या उत्तरांची मालिकाच. आज मटकी शिजत घातली, मेथीची भाजी निवडली, वर्तमानपत्राच्या ऑफिसात गेलो, कवितेवरचं गाणं सादर केलं, शेतीवरच्या कार्यक्रमामध्ये मी शेतकरी झालो आणि एवढंच नाही तर पाढ्यांची गाणी, संगीत सुरवटींची प्राथमिक ओळख, इंग्रजीमधून आपापला परिचय. रोजच्या रोज व्यायामाचे धडे. रोज परिपूर्ण आहार, प्रत्यक्ष झाड लावण्याचा अनुभव या आणि अशा अनेक गोष्टी.

चांगलं शिक्षण म्हणजे नेमकं काय? चांगलं इंग्रजी संभाषण म्हणजे पूर्ण शिक्षण नाही. तो एक अत्यावश्‍यक भाग आहे. परंतु, परिपूर्ण शिक्षण म्हणजे जीवनाचा अनुभव, जगण्यातली मजा, विविध वस्तू, प्रक्रिया यांचं अवलोकन आणि निरीक्षण. विविध कलांचा रसास्वाद, चांगलं काय, वाईट काय ते समजून चांगल्याचं अनुकरण, प्रयोगशीलता, नावीन्याची आवड, निसर्गासंबंधी कुतूहल, कलांचा रसास्वाद.

हे सगळं आम्ही आमच्या मुलांद्वारे अनुभवत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी मुलांनी केलेल्या विविध प्रात्यक्षिकांचं एक प्रदर्शन शाळा भरवते. ते पाहून असं वाटतं खरंच आपल्या मुलांनी हे केलं, एक पालक म्हणून आणखी काय हवं?

या सर्व प्रवासात आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पालक म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? चांगल्या संस्थेची, शाळेची निवड, हवी ती पुस्तके, वह्या, गणवेश घेऊन देणे, शाळेत दिलेले होमवर्क मारून-मुटकून, घोकंपट्टी करून प्रसंगी स्वतःचं करून, ट्यूशनचा भडिमार करून पालक म्हणून आपली जबाबदारी संपते? नक्कीच नाही. मुलांना अशी "प्रॉडक्‍ट ओरिएंटेड ट्रीटमेंट' देऊन ती सुजाण नागरिक बनू शकतील? एखादी वस्तू तयार होताना जशी उत्पादनाची साखळी असते, त्याप्रमाणे पहिली ते दहावी मुलांना एस.एस.सी. बोर्डाच्या फॅक्‍टरीत चढवले, की बहुतांश त्यातून कृतीपेक्षा पुस्तकी ज्ञानाला कवटाळणाऱ्या पिढ्या तयार होत जातात. हे सर्वांना माहीत असतं, कळत असतं आणि म्हणूनच "थ्री इडियट'सारखा परंपरेला छेद देणारा, नवीन विचार मांडणारा चित्रपट मनाला भावून जातो. पण, हा विचार प्रत्यक्षात आणायचा असेल तर प्रत्येक पालकाला कृतिशील व्हावं लागेल. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड द्यावी लागेल. प्रत्येक पाठ वाचून त्याचे कृतीत कसे रूपांतर करता येईल हे पाहायला लागेल. प्रयोगशीलता प्रत्येकाने अंगी बाणावयास पाहिजे. उदा. झाडांबाबतचा पाठ प्रत्यक्ष झाड लावून, जोपासून, झाड, जमीन, पाणी, पक्षी, मानव, सूर्यप्रकाश, हवा अशा अनेक अंगांची ओळख, त्याचा जीवनानुभव मुलांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करायला हवा.

शाळांमध्ये असलेली मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची धावपळ, स्नेहसंमेलने, स्पोर्टस डे, शिक्षकांवर लादलेली इतर कामे यांमुळे सर्वच गोष्टी आपण शाळेकडून अपेक्षित करू शकत नाही. म्हणून आपण पालकांनीच आता खऱ्या अर्थाने शिक्षक बनायला हवं. आपल्या पाल्यासाठी वेळ काढायला हवा. हे सोपं नाही, परंतु अशक्‍य मात्र नक्कीच नाही.
आजकाल रविवारी काय करायचं, मुलांच्या सुट्यांमध्ये काय करायचं, अशा प्रश्‍नांचं उत्तर असतं - शाळा संपली की आता त्यांना शिबिरांमध्ये टाकू. जिथं संस्कार, शिक्षण, छंद "गॅरेंटेड' विकलं जातं. अशा विकाऊ शिबिरांत मुलं स्मार्ट बनत असतील; जिज्ञासू बनत असतील? कला, कौशल्याची तोंडओळख होत असेल; परंतु कलेचा रसास्वाद घेण्याइतका त्यांच्याकडे वेळ तरी कुठे असतो? आणि एका वेळेला पन्नास मुलांच्या क्रियाशीलतेला वाव मिळत असेल? ही शिबिरांवर टीका नाही; वस्तुस्थिती आहे. पालकांना जागं करायचा प्रयत्न आहे.
आपल्या मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे कलागुण, आकलन शक्ती, निरीक्षण शक्ती आपल्यालाच माहीत असतात. त्यांना योग्य तो वाव, न्याय आपणच दिला पाहिजे. सेन्सेक्‍स कितीने वाढेल, हे सांगता येत नाही. बॅंकेचे व्याजदर कमी का जास्त होतील, हे सांगता येत नाही; परंतु आपल्याकडे असलेलं आनंदाचं रोपटं घडवूयात. त्यांना खत, पाणी घालूयात आणि त्यांची वाढ होतानाची पर्वणी पुरेपूर लुटूयात.

यामध्ये कुठेही शिक्षणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये; परंतु शालेय शिक्षणाला कृतिशील अनुभवांची जोड अत्यंत जरुरी आहे. विविध खेळ, छंद, साहित्य, कथा, कविता, नाटक यातून माणसाला माणूस म्हणून समजावून घेण्याची, अंतर्मनाला साद घालण्याची संधी मिळत असते. जीवनाचा रसपूर्ण आनंद पालकांनी पाल्याबरोबर उपभोगला पाहिजे. परंतु, हे तू केलंच पाहिजे, याची बळजबरी नको; तुलना तर मुळीच नको. आपला अहंकार जोपासण्यासाठी त्यांना वेठीस धरायला नको. हे बदलायला हवं. प्रत्येक मूल हे निसर्गाचा एक चमत्कार आहे, एक प्रतिभाशाली धगधगतं रसायन. भगवंताने ते आपल्या हाती सोपवलं आहे. त्याला योग्य तो न्याय आपण दिलाच पाहिजे. नाही तर यातून पुढं उभ्या राहणाऱ्या गंभीर समस्या आपण रोज वाचतोय. कोवळ्या मुलांच्या आत्महत्या, तरुणांचे अश्‍लील चाळे, मोबाईल इंटरनेट यांच्या विळख्यात सापडलेली आजची तरुण पिढी, चोऱ्यामाऱ्या, खून, दरोडे हे सर्व करणारी मंडळी केव्हा तरी लहान मुलंच असतील ना? ही सर्व कृत्ये करायला हे धजावले कसे? यांचं बालपण नेमकं कसं गेलं? आई-वडिलांकडून यांना योग्य तो वेळ, मायेची ऊब, वेळप्रसंगी शिक्षा, जाब विचारणं झालं असेल का? एक जबाबदार पालक म्हणून मी या सर्व गोष्टींचा विचार करतो का? मी माझ्या पाल्यासाठी काय देऊ शकतो? सुजाण समाज बनण्यासाठी माझ्या पाल्याला सुजाण करणं, त्याच्या चैतन्याला चांगला आकार देणं आणि हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे, असं मला वाटतं.

बाळकृष्ण दामले, पुणे

२० ऑगस्ट, २०१०

मेंदू क्रांती

अनादी काळापासून मानवाच्या मेंदूत अनेक बदल होत गेले. शास्त्रज्ञांच्या म्हण्यानुसार मेंदूची क्षमता अफाट असून त्याचा वापर मात्र माणूस शंभर टक्के करुन घेत नाही असे लक्षात आले आहे. बालकाच्या मेंदूची वाढ ही पहिल्या तीन वर्षात सर्वात अधिक होते. त्यानंतर वाढीचा वेग कमी होत दहाव्या वर्षापर्यंत स्थिरावतो.
सर्वसाधारण समज आहे की बाळाचे भाषिक ज्ञान शाळेत गेल्यावर सुरु होते परंतु हे खरे नाही. जन्मापासून त्याचे पालक आणि नातेवाईक जेव्हा बाळाशी बोलतात, संवाद साधतात, खेळतात, चित्र काढायला शिकवतात, तेव्हापासूनच 'ब्रेन स्टीम्यूलेशन' चालू होते. लहान बालकाची माहिती साठविण्याची क्षमता नॅशनल आर्काइव्जपेक्षा दसपट असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू अभ्यासक डॉ. ग्लेन डोमन http://www.internationalparentingassociation.org/Early_Learning/accelerate.html ह्या साईटवर म्हणतात लहान बालकांची शिकण्याची क्षमता अति प्रचंड प्रमाणात असते. वाढत्या वयानुसार ती कमी होत जाते. जसे की एक वर्षाच्या बालकाची शिकण्याची क्षमता सहा वर्षापेक्षा अधिक असते. डॉ. डोमन ह्यांनी नवजात शिशू ते दहा वर्षांच्या बाळांचा विशेष अभ्यास केला त्यासाठी ते जगभर फिरले. त्यात त्यांनी मानसिक अपंग आणि अर्धांगवायू झालेल्या बालकांना त्यांचा खास असा 'ब्रेन डेव्हलपमेंट' प्रोग्रॅम नुसार प्रशिक्षण दिले. आणि काय आश्चर्य त्यातली बहुतेक मुले वाचायला, बोलायला, खेळायलाही शिकली. आपल्या ह्या संशोधनाचा सर्वांना फायदा व्हावा म्हणून डॉ. डोमन ह्यांनी फिलाडेलफिया मध्ये १९५५ साली THE INSTITUTES FOR THE ACHIEVEMENT OF HUMAN POTENTIAL® (http://www.iahp.org/) ह्या संस्थेची स्थापना केली. आज त्यांचे कार्य जगभर पसरले आहे.
प्रत्येक पालकांना वाटते आपल्या बाळाची हुशारी वाढवायची कशी ? त्यासाठी आधी मेंदूचे कार्य आणि वाढ समजावून घेऊ या. गर्भाशयात मेंदूची बांधणी चालू असतांना प्रत्येक मिनीटांना २,५०,००० नवीन 'न्यूरॉन्सची' निर्मिती होत असते. ही निर्मिती जन्माच्या वेळेपर्यंत बरीचशी पूर्ण होते. तरी सुध्दा जन्मानंतरही काहीप्रमाणात न्यूरॉन्सची बांधणी चालूच असते. वयाच्या दोन वर्षापर्यंत माणसाचा ८०% मेंदू विकसीत झालेला असतो.
बालकाच्या जन्मानंतर तुम्ही त्याला नवीन किती गोष्टींचे ज्ञान देता, स्पर्श, गंध, रंग, ध्वनी, चव ह्या पंच अवयवांना वेगवेगळे अनुभव देता त्यावर त्याच्या उरलेल्या न्यूरॉन्सची बांधणी अधिक होते आणि पर्यायाने तुमचे मूल हुशार होते. ह्यामध्ये आहार आणि भावनिक प्रेमालाही खूप महत्त्व आहे. ज्या बाळांना सकस आणि परिपूर्ण आहार दिला जातो, शब्द आणि स्पर्शातून पालकांचे प्रेम मिळते त्या बालकांची न्यूरॉन्सची बांधणी अधिक वेगाने होते. ह्याचाच अर्थ हुशार माणसाच्या मेंदूच्या न्यूरॉन्सचे जाळे हे अधिक दाट असते. सर्वसाधारणपणे परिक्षेत चांगले मार्क मिळवणा-या मुलांना हुशार समजले जाते. परंतु हुशारीची व्याख्या फक्त मार्क मिळवण्यापूर्ती संकूचित नसावी. अमेरिकेचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ.हॉवर्ड गार्डनर ह्यांनी हुशारी किंवा बुध्दांक हा नऊ प्रकारे मोजला जातो हे सर्वप्रथम मांडले. निसर्ग, संगीत, तर्क/गणित, मानवी अस्तित्व, भाषिक, खेळाडू/नर्तक, परस्पर सुसंवाद, कलाकृती, स्वत्त्वाची जाणिव ह्या विविध प्रकारे बुध्दांक मोजला जातो. आतातर यशस्वी माणसांसाठी बुध्दांका बरोबर भावनांकही तितकाच महत्त्वाचा आहे. बुध्दांक मोजण्याच्या विविधतेवरुन 'मलटीपल इन्टलिजन्स'ची (Multiple Intelligence) संकल्पना पुढे आली. सर्वसाधारणपणे गणित आणि भाषेत उत्तम असणारया मुलांना 'हुशार' म्हटले जाते. पण डॉ.गार्डनर ह्यांनी हा समज ठामपणे 'मलटीपल इन्टलिजन्सच्या' आधारावर मोडून काढला आहे. त्यांच्या मते गणित, भाषेत हुशार नसणारे एखादे मुल खेळात, संगीतात, चित्रकलेत अगदी निसर्गात रमणारे असेल. गरज आहे त्यातली ही विविध बुध्दीमत्ता ओळखण्याची आणि फुलवण्याची. मलटीपल इन्टलिजन्स समजून घेण्यासाठी …………….
आपल्या मेंदूचे दोन विभाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात अधिक भर डाव्या मेंदूवर दिला जातो. डावा मेंदू हा भाषा, गणित, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जवाबदार असतो त्या उलट उजवा मेंदू सृजनशिलता, कल्पकता, भावना, नेटकेपणा आणि विविध कलांशी निगडीत असतो. दोन्ही भागांच्या मेंदूचे कार्य विरुध्द परंतु परस्परपूरक आहे. डावा मेंदू माहिती हळूहळू आणि सातत्याने (repetitive) घेतो तर उजवा मेंदू ही माहिती काही क्षणात घेतो व त्याला सातत्याची आवश्यकता नसते. जेव्हा गरज पडेल तेव्हा उजव्या मेंदूला ही माहिती काही सेकंदात आठवते ह्याला 'फोटोग्राफीक मेमरी' म्हणतात. जपानचे डॉ. सिशीदिया मॅकातो ह्यांचा त्यावर गाढा अभ्यास होता व त्यांनी जपानमध्ये प्रिस्कूलर्ससाठी अश्या ३५० संस्था काढल्या आहे. ह्याच अर्थ सहा वर्षाच्या आधी आपण उजव्या मेंदूची वाढ होण्यासाठी प्रयत्न करु शकतो म्हणजेच मलटीपल इन्टलिजन्स आपल्या मुलामध्ये जागवू शकतो. संशोधनात असे सिध्द झाले आहे की अपूरा आणि निकृष्ट आहार, विशिष्ट इन्फेक्शन किंवा औषधे, प्रदुषित वातावरण आणि जास्तीचा स्ट्रेस हा मेंदूच्या वाढीत अडथळे निर्माण करतो. मेंदूच्या वाढीसाठी चारवेळा सकस आणि पौष्टीक आहार, योग्य प्रमाणात पाणी आणि कमीतकमी ताणतणाव हे सर्व आवश्यक आहे. मेंदूचे कार्य समजावून घेतल्यावर आपल्या पाल्यांसाठी आपण जरुर उपयोग कराल ही आशा.

भाग्यश्री केंगे
marathiworld.com

पालकत्व पेलतांना

एकवेळ आईबाबा होणं सोप पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पध्दती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्यांचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्टयपूर्ण व्यक्तीमत्व आहे. बाळ राजाच्या आगमनापासूनच त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. मोठयांचे सल्ले, समवयस्क पालकांचे अनुभव, पुस्तके आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून होतकरु पालक अधिकाअधिक प्रगल्भ होत जातात. एव्हढी सगळी पूर्व तयारी करुनही प्रत्यक्ष आपल्या मुलाचा स्वभाव, वागणे, प्रतिक्रीया पाहूनच पालक आपआपली भूमिका निभावत असतात. हे करत असतांना त्यांच्या अनेक चुका होतात, तोल सुटतो, राग येतो, हताश होतात, निराश होतात पण आपल्या बछडयाच्या प्रेमापोटी सारे विसरुन परत नव्याने पालकाच्या भूमिकेत शिरतात. पालकत्व अर्थात Parenting ही काही दिवसांची कामगिरी नसून दीर्घकाळाची प्रक्रीया आहे आपल्या मुलाला जन्म देऊन, त्याचे प्रेमाने संगोपन आणि शिक्षण देऊन एक चांगली व्यक्ती घडवण्याची. ह्या व्याख्येत मुख्यता आपले स्वतःचे मूल गृहीत आहे पण त्याबरोबर दत्तक किंवा अनाथ मुलांचेही पालकत्व स्विकारता येते.
http://en.wikipedia.org/wiki/Parenting ह्या लिंकवर पालकत्वाचा अर्थ सांगितला आहे.

ह्यात आपल्या मुलाची शारिरीक, मानसिक आणि भावनिक संरक्षण, संवर्धन आणि वाढ अपेक्षित आहे. तसेच त्याच्या शिक्षणासाठी, आकस्मित आपत्तींसाठी आणि भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणेही अपेक्षित आहे. येथे आपल्याला पालकत्वाचे वेगवेगळे टप्पेही वाचायला मिळतात. आपल्या मुलाच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर जसे बाल्य, शिशू, बालक, विद्यार्थी, पौगंडावस्था, तारुण्य; पालक आपली भूमिका बदलत असतात. आपल्या मुलाच्या वाढी बरोबरच पालक म्हणूनही ते वाढत असतात, अधिक समृध्द होत असतात.
इंटरनेटवर पालकत्व विषयावर सर्च करतांना असे आढळून येते की बालसंगोपनाविषयीच अधिक मजकूर आपल्याला वाचायला मिळतो. वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी तुलनेने फरशी माहिती उपलब्ध नाही.
परंतु http://www.indiaparenting.com/ ही साईट अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. गर्भारपण, संगोपन, स्त्री आरोग्य ह्या विषयांना ही साईट स्पर्श करतेच परंतु कौटूंबिक बाबींवरही प्रकाश टाकते. Raising Children ह्या सदरात वेगवेगळ्या वयात मूल वाढवतांना येणारे संभाव्य अडथळे, अडचणी अनुसरुन वेगवेगळ्या उपविभागात त्यानुरुप माहितीपूर्ण लेख आहेत. एकटे मूल, दोन भावंडे, भाषा विकास, वागणूक, भिती, अस्वस्थता, सामाजिक जवाबदारी अश्या अनेक विषयांवर लेख वाचायला मिळतात. ह्या मध्ये अनेक विषयांवर भारतीय तसेच परदेशी पालकांचे, तज्ञांचे लेख आहेत. ह्या लेखांमध्ये 'प्रसन्न सकाळ' हा वेगळया विषयावरचा लेख आहे. आजच्या गतीमान जीवनानुसार प्रत्येकाची सकाळ धावपळीची असते. आईबाबा दोघेही नोकरी करणारे असल्यास बहुतेकदा त्याचा फटका मुलांना बसतो आणि नकळत त्याचा ताण मुलांवर येतो. आपल्या मुलाची प्रत्येक सकाळ प्रसन्न आणि उत्साहपूर्ण असली पाहिजे ही जबाबदारी पालकांनी ओळखली पाहिजे. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री सर्व पूर्व तयारी करुन ठेवल्यास घाई गडबड टाळता येऊन संपूर्ण कुटूंबाची दिवसाची सुरुवात चांगली होईल.
अश्याप्रकारे 'महिलांचा आदर' हाही लेख वेगळा आहे. आपल्या घरातला मुलगा आणि मुलगी वाढवतांना पालकांनी महिलांचा आदर राखण्याचे विशेष भान जागरुकपणे मुलांना दिले पाहिजे. मुलाला घरकामास प्रवृत्त करणे, महिलांविषयी विनोद अथवा अनादराने न बोलणे, मुलगा म्हणून विशेष वागणूक न देणे ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. आईने सतत बाबांवर अवलंबून राहण्यापेक्षा मुलाला स्वतःहून विविध गोष्टींची माहिती पुरवणे, बाबांनीही आईला सल्ला विचारणे अश्या सारख्या छोटया छोटया गोष्टी पाळल्यास मुलालाही आपल्या आईची क्षमता कळून तिच्या विषयी आदर वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच मोठा होत असतांना महिलांविषयीही त्याचा आदर वाढेल आणि एक सभ्य व्यक्ती समाजाला मिळेल. अश्या प्रकारचे वाढत्या वयासंबंधी अनेक लेख आपल्याला ह्या साईटवर वाचायला मिळतात.
आजच्या युगात Parenting Skills ला अधिक महत्त्व आहे. आपल्या जवळ असलेला कमी वेळ आपण Quality time म्हणून कसा उपयोगात आणतो ह्यावर पालकत्वाची कौशल्ये अवलंबून आहे. http://www.theparentszone.com/category/parenting-skills/ ह्या लिंकवर आपल्या मुलांमध्ये वेगवेगळी कौशल्ये जसेकी घरकाम, पैशाचे व्यवस्थापन, संभाषण, अभ्यास अशी अनेक कौशल्ये वाढविण्यासाठीची माहिती दिली आहे. आपले मुल वाढत असतांना आपल्याला अनेक प्रश्न पडतात, "माझी मुलगी शाळेत शांत असते पण घरी मात्र भरपूर हट्टीपणा करते असे का? ", ''माझा पाच वर्षाचा मुलगा अंधाराला खूप घाबरतो" , ''लहानपणी हुशार असणारा माझा मुलगा मोठया इयत्तेत गेल्यावर कमी मार्क मिळवायला लागला आहे", " माझ्या वयात आलेल्या मुलीला मी ह्या वयात बाळगायची सावधगिरी कशी सांगू" हे आणि असे असंख्य प्रश्न प्रत्येक पालकांना कधीतरी पडतातच. अश्या वेळी कुणा तज्ञांचा सल्ला मिळाल्यास दिलासा वाटतो. त्यासाठी http://www.raisingkids.co.uk/ ह्या साईटवर वयोगटा प्रमाणे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपले वेगळे प्रश्न असल्यास तेही आपण विचारु शकता. पालकत्वा विषयी अधिक वाचायचे असल्यास www.sitagita.com/view.asp?id=8994 , www.goodparenting.co.in
ह्या साईटही उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहेत.
http://www.lifepositive.com/mind/parenting/spiritual-parenting.asp ह्या लिंकवर spiritual Parenting अर्थात अध्यात्मिक पालकत्वाची संकल्पना मांडली आहे. येथे पालकांचे विविध अनुभव वाचतांना आपल्याच घरात घडणारे प्रसंग आहेत असे वाटत राहते. सुजाण पालकत्वासाठी कुठलही शॉर्टकट नाही. काहीजण पालकत्व जाणीवपूर्वक शिकतात, काही आपल्या चुकातून आणि अनुभवातून शिकतात तर काही कधीच शिकत नाहीत. अध्यात्मिक पालकत्वानुसार आपण आपल्या मुलांचे फक्त 'पालक' असतो. देवाने दिलेली ही अमूल्य भेट आपण फक्त वाढवायची आणि फुलवायची. त्यांच्यात सृजनशिलता, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आपल्या मनापेक्षा हृदयाचे ऐकण्याची, वेगळ्या वाटेवरुन जाण्यासाठीचे धैर्य त्यांना मिळावे ह्यासाठी पालकांनी अथक परिश्रम घ्यायला हवेत. त्यासाठी त्यांनी देवाबरोबर भागीदारी करायला हवी. पंधरावीस वर्षे ह्या पालकत्वाच्या वाटेवरुन जातांना वेळोवेळी पालकांना स्वयंशिस्त, निस्वार्थी, दयाळू, क्षमाशिल, सहनशिल, परिवर्तनशिल, तर असलेच पाहिजे त्याबरोबर कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलांवर निस्वार्थ प्रेम करता आले पाहिजे. फक्त आपलेच घोडे पुढे न दामटता मुलांना बोलायची संधी देऊन त्यांचे ऐकून घेतल्या आपल्या पालकत्वाच्या कक्षा अधिक रुंदावतील ह्यात शंकाच नाही. ह्या अवघड वाटेवरुन चालतांना मुलांवर पैसा अधिक खर्च करण्यापेक्षा अधिक वेळ दिल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील.

भाग्यश्री केंगे
marathiworld.com

१९ ऑगस्ट, २०१०

एक विचार टागोरांचा.. विद्यार्थी घडविताना !

रवींद्रनाथ टागोर हे जसे ‘विश्वकवी’ होते तसेच ‘गुरुदेव’ही होते. रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्त्व तसं बहुरंगीच होतं. जन्मत:च ते मनाने कवी होते. आणि म्हणून निसर्गाचं जणू त्यांना वेडच होतं. त्यांच्या या सौंदर्यवेडातूनच शब्दांची जुळवाजुळव सुरू झाली. हळूहळू त्या शब्दांमध्ये नाद भरू लागला, ताल येऊ लागला. लवकरच त्यातून कविता अवतरली. लहान वयातच ते भराभर कविता लिहू लागले. रवींद्रनाथ विश्वकवीच ठरले. परंतु रवींद्रनाथांचा हा विकास किंवा प्रवास तथाकथित शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून घडला नाही. निसर्गाच्या उघडय़ा शाळेतूनच ते पुष्कळ शिकले आणि आपल्या या अनुभवातूनच रवींद्रनाथांची स्वत:ची अशी एक शिक्षणदृष्टी किंवा विचार निर्माण झाला.
१९०१ साली रवींद्रनाथांनी ‘शांतिनिकेतन’ नावाची आपली शाळा सुरू केली. त्यांचं हे ‘शांतिनिकेतन’ होतं कलकत्त्यापासून लांब, मोकळ्याढाकळ्या माळावर शाल वृक्षांच्या सावलीत. ही शाळा काढताना ते म्हणाले होते, ‘माझी ही शाळा म्हणजेसुद्धा एक काव्यच आहे! त्याला कदाचित शब्दांचं माध्यम नसेल, ते निर्जीव, रूक्ष कागदावरही लिहिलेलं नसेल, परंतु ते एक जीवनाचं काव्य असल्याकारणानं जीवनाच्या माध्यमातून आणि संपूर्ण जीवनासाठी लिहिलेलं असेल!’ ज्याला आपण पालक किंवा शिक्षक मंडळी शिक्षण- शिक्षण म्हणतो, त्या शिक्षणाबद्दल रवींद्रनाथांना कधीच प्रेम, आपुलकी आस्था वाटली नाही. त्याची उपयुक्तताही पटली नाही. या असल्या औपचारिक शिक्षणामुळे माणूसही औपचारिक बनतो, कृत्रिम होतो व निखळ मनुष्यत्व गमावून बसतो. त्या काळच्या शाळा म्हणजे तर कोंडवाडेच होते. आजही असे कोंडवाडे अनेक ठिकाणी आहेतच. या कोंडवाडय़ातून वेळापत्रकाप्रमाणं चालणारा ठराविक अभ्यासक्रम रवींद्रनाथांना कधीच आवडला नाही. त्यांनीच म्हटलं आहे, ‘नाजुक फुलांवर ऊंचावरून होणाऱ्या जोरदार गारांच्या वर्षांवाप्रमाणं आमच्यावर पाठांचा मारा होत असे आणि वस्तुसंग्रहालयातील निर्जीव चित्रांप्रमाणे आम्हाला तो गुपचूप बसून सहन करावा लागत असे.’ ‘या शाळा निसर्ग आणि वास्तव जीवन यांपासून फार फार दूर असत. शिक्षण आणि जीवन यात भक्कम भिंतच उभी असे! वर्गातील साहित्य, अध्यापनपद्धती आणि एकूण सर्व वातावरणच मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तींच्या विरुद्ध असे. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक शक्तीवर आणि उत्साहावर पाणी पाडलं जात असे. ती शक्ती आणि तो उत्साह दडपून टाकला जात असे.’ रवींद्रनाथांनी अशा शाळा आणि त्यातील शिक्षण यांच्याविरुद्ध जणू बंडच पुकारले आणि ‘शांतिनिकेतन’ ही एक अभिनव मोकळीढाकळी शाळा काढली. मुलं म्हणजे उत्साह, आनंद यांचा कंद आणि चैतन्याचा सळसळता कोंभ असतात, हे रवींद्रनाथांनी स्वानुभवावरून जाणलेलं होतं. म्हणून मुलांची शाळा आणि तिथलं शिक्षणदेखील आनंदमय व चैतन्यदायी असायला हवं, असा त्यांचा आग्रह होता. त्यांची बालकांकडे बघण्याची दृष्टी किंवा बालमानसशास्त्र हे बालकाबद्दल त्यांना वाटणाऱ्या अथांग प्रेमावर आणि उदंड सहानुभूतीपूर्ण वात्सल्यावर आधारलेलं होतं. रवींद्रनाथ म्हणत असत, ‘बालक म्हणजे मानवी जीवनाच्या वेलीवर उमलणारी फुलंच! त्यांना जितका मोकळेपणा व स्वातंत्र्य मिळेल तितकी ती प्रफुल्लित आणि टवटवीत बनतील. या स्वातंत्र्यामुळंच बालांना आनंदाचा आणि सौंदर्याचा रसास्वाद घेता येतो. बालकांचं कोवळं मन त्यांच्या अवतीभवतीच्या वातावरणातून उत्तमोत्तम संस्कार टिपण्यासाठी सतत जागृत आणि उत्सुक असतं. बालांना प्रौढांनी, म्हणजे पालकांनी किंवा शिक्षकांनी ज्ञान भरवण्यापेक्षा ते त्यांचं त्यांनीच आपल्या विविध प्रकारच्या धडपडीतून मिळवणं, हे रवींद्रनाथांना फार फार उपयुक्त वाटत असे.’
निसर्ग हाच एक मित्ररूप शिक्षक आहे. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:च्या प्रयत्नानं मुलं रममाण होऊन जेवढं काही चांगलं शिकू शकतील आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतील, तेवढं शिक्षण आणि विकास अन्य कुठल्याही मार्गाने होऊ शकत नाही. रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतन या शाळेविषयी पु. ल. देशपांडे यांनी आपल्या एका व्याख्यानात रवींद्रनाथांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन फार चांगल्या रीतीनं विशद केलेला आहे. ते म्हणतात, ‘ज्ञान हा केवळ पुस्तकाकडून पुस्तकाडं चालणारा व्यवहार नसून ज्ञानाची आणि कर्माची सारी इंद्रियं ज्यामुळं चैतन्यमय होतील अशी शिक्षणपद्धती या देशात आल्याशिवया इथं प्रगती, प्रबोधन, संस्कृती, स्वातंत्र्य वगैरे कल्पनांचा खरा अर्थच लोकांना कळणार नाही. एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला येणाऱ्या माणसाची त्या वृक्षाकडून फूल, फळ व छाया लाभावी अशी अपेक्षा असते. तसलीच इच्छा धरून विद्यार्थी शाळेकडं आला तरच शिक्षणाला काही अर्थ आहे, हे रवींद्रनाथांनी ओळखलं, निर्मितीक्षम प्रतिभा, चिंतन, व्यासंगानं सबल झालेली प्रज्ञा आणि अनेक प्रकारच्या माणसांच्या स्नेहातून, त्यांच्या सुख-दु:खाच्या कथा ऐकून मनात उपजलेलं प्रेम आणि करुणा या साऱ्या गुणांच्या समन्वयातून रवीन्द्रांची शाळा जन्माला आली.
रवींद्रनाथांचा आग्रह मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे, असा होता. स्वत:च्या भाषेतून मुलांना आपले विचार जेवढे नीटनेटके आणि स्पष्ट मांडता येतात, तेवढे परकीय भाषेतून येत नाहीत. परकीय भाषेमुळे त्यांच्या अभिव्यक्तीत अनंत अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम त्यांच्या विकासावरही होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही होतो. त्यांची अभिव्यक्ती कुंठित बनते. म्हणून परकीय भाषेचं आकर्षण टाळून मातृभाषेतूनच मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. ‘शांतिनिकेतन’ म्हणजे रवींद्रनाथांची शिक्षणविषयक कल्पनांची प्रयोगभूमीच होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर स्वातंत्र्य व भरपूर आनंद कसा मिळेल, याचीच दक्षता घेतली जात असे.
‘अमूक एक गोष्ट करा’, असं रवीन्द्रनाथ मुलांना कधीच सांगत नसत. ‘आपण काय करायचं’ हे मुलंच ठरवीत असत. याबाबत त्यांचा मुलांवर फार फार विश्वास होता आणि त्यांच्या या विश्वासाला मुलंही तेवढय़ाच विश्वासूपणानं प्रतिसाद देत असत. शिस्तीचे प्रश्न कधी कधी उपस्थित होत असत, पण ते सोडवण्यासाठी मुलांचंच न्यायमंडळ होतं. रवीन्द्रनाथांनी कधीच कोणाला शिक्षा केली नाही. एकदा काही विद्यार्थी वर्गातील नेहमीच्या तासाला हजर नव्हते. त्यांच्याविरुद्ध शिक्षकांनी तक्रार केली. त्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात समरस करून घेण्यासाठी रवीन्द्रनाथांनी एका नाटकाच्या प्रयोगात त्यांना सहभागी करून घेतलं. शांतिनिकेतनमधील दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीताच्या मधुर आलापात होत असे. बहुतेक सर्व गीतांची रचना रवीन्द्रनाथांनीच केलेली होती. त्यातून मुलांना आत्मिक व मानसिक आनंद भरभरून मिळत असे. शाळेतील सर्व वातवारणच नृत्य, नाटय़, चित्र, संगीत यांनी चैतन्यमय होत असे. शिक्षण ही एक आनंदयात्राच आहे, अशीच आनंदयात्री रवीन्द्रनाथांची श्रद्धा होती. एकूणच रवीन्द्रनाथांचे शिक्षणविषयक विचार हे मुलांना आयुष्यभरातून येणाऱ्या अनुभवातून घडविण्यास हातभार लावणारेच आहेत आणि ते आजच्या शिक्षण पद्धतीतही जसेच्या तसे लागू पडतात. त्यांच्या विचारांची कास धरली तर नक्कीच आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण, सर्जनशील नागरिक म्हणून चमकू शकतो अन् अशा विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. रवीन्द्रनाथांच्या मते, शिक्षक हा सहानुभूतीपूर्ण, प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांला घडविणारा असावा व स्वत: आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची कास धरणारा असावा आणि म्हणूनच ते म्हणत की,

“A lamp can never light another lamp unless it cantinues to burn its own flame.”

बालस्वातंत्र्य

बालस्वातंत्र्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीरपणे समजून घेऊन विचार करण्याचा आहे. राष्ट्राच्या विकासासाठी योग्य समाज निर्माण करण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर आहे. वैचारिक देवाणघेवाण साधण्यासाठी अभ्यासगट, चर्चासत्रं, शिक्षणतज्ज्ञांचं या विषयावरील लिखणाचं वाचन आणि त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे.
शिक्षक, पालकच नव्हे तर एकूणच समाज निरागस, सहज उमलणाऱ्या बालकांवर स्पधेर्ची भीती आणि सक्तीचा बडगा दाखवून त्यांच्या नैसगिर्क प्रवृत्ती आणि क्षमता यांचं खच्चीकरण करत असतात. त्याला आवर घालण्याचा हा एक प्रयत्न आहे.

बालकांना स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कोणी समजून घेत नाही. त्याचं महत्त्व कोणी लक्षात घेत नाही. आजचा बालक हा भावी काळातील नागरिक बनणार असतो. त्याला स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्यायचे असतात. येणाऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड द्यायचं असतं. सृजनशील नागरिक बनण्यासाठी त्याच्या अंगात असणाऱ्या सर्व क्षमतांचा विकास व्हायला हवा आणि हा विकास छडी लागे छमछम या पद्धतीने किंवा घोकंपट्टी करून आणि केवळ परीक्षाथीर् बनून घडणार नाही. तात्पुरता त्याचा परिणाम चांगला दिसला तरी तो चिरकाल टिकणारा नसतो आणि म्हणूनच तो निरुपयोगी ठरतो.

माणसाचा भविष्यकाळ त्याच्या बाल्यातून आकारास येत असतो. त्याच्या हिताच्या दृष्टीने येणाऱ्या पिढीचं जतन करणं, तिची जोपासना करणं आणि नवजीवनाला तिला तयार करणं हे प्रत्येक प्रौढ पिढीचं आद्यकर्तव्य आहे. संपूर्ण प्राणीविश्वात माणसाचं मूल सर्वात जास्त काळ परावलंबी असतं. ही नैसगिर्क गोष्ट लक्षात घेऊन त्याचं संरक्षण करणं, त्याला फक्त आवश्यक ती मदत देऊन ते लवकरात लवकर नैसगिर्करित्या स्वावलंबी कसं बनेल, याचा विचार कुटुंबाने करायला हवा. बालकाला स्वावलंबी करण्याच्या प्रयत्नात त्याचं बालपण हरपणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. लहान मुलं ही मोठ्या माणसाची छोटी आवृत्ती असते म्हणजे शक्तीने, ज्ञानाने व अनुभवाने लहान असलेल्या बालकाला मोठ्यांप्रमाणे संपूर्ण शरीर, संपूर्ण मन, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती असणं याची दखल आपण घेतली पाहिजे. त्याला लाभलेल्या उपजत बुद्धिमत्तांचा शोध घेण्यासाठी त्याला अनुभवयुक्त शैक्षणिक संधी मिळवून देणं म्हणजे खऱ्या अर्थाने बालकाचं संगोपन करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

प्रत्येक मुलाची क्षमता, त्याचे कल, त्याची गती भिन्न असल्याचं लक्षात घेऊन जात, धर्म, वर्ग, लिंग आदी त्यांना मिळणाऱ्या संधीच्या आड येता कामा नयेत, याचाही विचार व्हावा. बालकांमधील लहरीपणा, हट्टीपणा, एखाद्या गोष्टीचा बाऊ करणं अशी लक्षत काही मुलांमध्ये दिसतात. पण ते त्यांचं व्यक्तित्व नसतं,हे लक्षात घ्यायला हवं. त्याला अशा गोष्टींपासून दूर ठेवायला हवं.


ताराबाई मोडक

आमच्या भावी आई–बाबानो

मुलांना जर आई वडील निवडण्याची संधी असती तर त्यांनी हे प्रश्न निशित विचारले असते
आई बाबा ,तुम्हाला आम्ही हवे आहोत म्हणता तर ,

१.लहान मुलाची काळजी कशी घ्यायची याचा तुम्ही काही अभ्यास केलाय का

२.आम्हाला तुम्ही खायला- प्यायला केव्हा काय-काय देणार, हे माहित आहे का

३.आमच्या रडण्याची कारणे तुम्हाला माहित आहेत का

४.आमची वाढ कशी होते , ते तुम्ही कुठे वाचलंय का ?

५.आमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काय करणार आहात तुम्ही ?

६.आमची प्रेमाची भूक भागवणार आहात का तुम्ही ?

७.आमच्या तुम्ही दोघेही काही वेळ राखून ठेवणार आहात का ?

८.आम्हाला मोकळे पणी वाढू देणार आहात का ? कि तुमच्या अपेक्षांच्या कात्रीने
सारख्या आमच्या प्रेरणा छाटणार आहात ?

९.मुलाशी कसं वागायचं ,याबद्दल मुळात तुमच दोघांचे एकमत आहे का ?

१०.आणि हो सर्वात महत्वाचं ... आई -बाबा आम्ही तुम्हाला कशासाठी हवे आहोत ?
आपले भावी

मुल हे प्रश्न विचारू शकत नाही हे किती बर आहे नाही ? --शोभा भागवत (आपली मुल)

______________________________________
आणि हो खरेच जर हे प्रश्न आपण एक पालक म्हणून आपल्या पुढे आले तर आपल्या हयातीत किती गोष्टीची सखोल माहित आहे , आणि जर नसेल तर माहित करून घ्यायाल वेळ आहे का ?

१८ ऑगस्ट, २०१०

मूल वाढवायचे म्हणजे काय ?

मूल वाढवायचे म्हणजे काय? चांगला पालक व्हायचे म्हणजे काय? मुलाला स्पधेर्चा घोडा न बनवता फुलवायचे म्हणजे काय? त्याचे परिसराशी नाते जोडायचे म्हणजे काय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हवे आहे बालभवन. आज पालक सुजाण होण्यासाठी गरज आहे ती त्यांच्या प्रशिक्षणाची. मूल जसे गरिबीत बिघडू शकते तसे आणि तितकेच ते समृद्धीतही बिघडू शकते. आपण सर्वांनी उद्याची ही पिढी 'नॉर्मल' बनवायला हवी...
...............

एखादं मूल पुरेसं बोलत नाही, इतरांशी मैत्री करत नाही, कधी वय वाढलं तरी चालू शकत नाही, मनानं अस्वस्थ आहे, घरी आई-वडिलांचं न पटण्याचा गंभीर प्रश्न आहे, शाळेत मागे पडत आहे, अशा समस्या जाणवून बऱ्याचदा मुलांचे डॉक्टर्स मुलांना 'बालभवना'त पाठवा, असा सल्ला पालकांना देतात. अशा मुलांना आम्हीही बालभवनात लगेच सामावून घेतो आणि बऱ्याचदा त्यांचे प्रश्न काही काळातच सुटतात. बरोबरच्या २०-२५ मुलांच्यात रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं, त्यांची भाषा कानावर पडणं, अनेक आनंददायक उपक्रमात सामील होणं, या सगळ्याने खूप मदत होते प्रश्न सुटायला.

जेव्हा असं जाणवतं की प्रश्न मुलांचा नाही, त्यांच्या पालकांचाच आहे, तेव्हा त्यांनी समुपदेशकाकडे जायलाच हवं, असा आग्रह आम्ही धरतो.

चार वर्षांची मुलगी हाका मारल्या तरी जेवायला येत नाही, म्हणून रागानं तिच्या गालाला गरम उलथनं लावणारी आई होती, घरातल्या आई-वडलांच्या भांडणात मिटून गेलेली आणि चित्र रंगवताना कायम काळाच रंग वापरणारी मुलगी होती. घरीदारी 'हा वाईट मुलगा आहे' असा शिक्का बसलेला आणि त्यामुळे वस्तूंची तोडफोड करणारा, शिव्या देऊन थुंकणारा मुलगा होता, सहलीला यायला उशीर झाला, बस निघून गेली म्हणून राग असह्य होऊन रस्त्यातच मुलाला लाथाबुक्क्यांनी मारणारी आई होती.

कधी मुलांच्या चित्रांमधून, कधी त्यांच्या वेगळ्या वागण्यामधून तर कधी पालकांच्या वागण्या-बोलण्यातून प्रश्न जाणवतात. त्यांच्यावर जेवढ्या लवकर उपाय होतील, तेवढे ते मुलाच्या हिताचं असतं. कारण मूल फार भरभर वाढत असतं. कुठलेतरी प्रश्न , अस्वस्थता, विकृती घेऊन ते वाढलं तर त्याच्या सबंध आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलाचं दुसरं नाव 'आज' आहे, असे म्हणतात. त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच मुलाशी ज्यांचा ज्यांचा संबंध येतो, त्या सर्व प्रौढांना या प्रश्ानंची समज असायला हवी. आमच्याकडे मुलांचे काहीच प्रश्न नाहीत, असे शाळांनी म्हणू नये तर हे प्रश्न समजण्याची दृष्टी सर्व शिक्षकांना द्यायला हवी. त्या मुलाची, त्याच्या चमत्कारिक वागण्याची, त्याच्या पालकांची चेष्टा न करता त्यांना खूप मनापासून शक्य ती सगळी मदत करायला हवी.

कित्येकदा असं आढळतं की पालकांशी मोकळेपणाने बोलल्यानेही त्यांना खूप मदत होते. आपण पालक म्हणून कसे आहोत, कसं असायला हवं, याबद्दल बोलायला लागतं, आपलं मूल कसं आहे, ते त्यांना समजून सांगावं लागतं, आपलं घर आज मुलांना काय देत आहे, याबाबत पालकांची जागरूकता संवादातून वाढवावी लागते. मुलांशी चांगला संवाद कसा करावा, याची पथ्ये शिकवावी लागतात. मुलांकडे दुर्लक्ष न करणं, त्यांना धमक्या न देणं, त्यांची इतरांशी तुलना न करणे, त्यांचे निर्णय परस्पर न घेणं, त्यांच्यावर शिक्के न मारणं, त्यांना न रागावणं, मारणं टाळणं अशी कितीतरी पालकत्वाची कौशल्ये अंगवळणीच पाडावी लागतात. पालकांनी स्वत:चं आणि मुलांचं जग मोठं करण्याची गरज असते. याची जाण आली तर प्रश्न सुटायला मदत होते. आपण कुठे चुकतो हे पालकांच्या लक्षात येतं. मुलं लहान असताना पालकांना हे पालकत्वाचं शिक्षण देणं ही जाणत्या माणसांची मोठी जबाबदारीच आहे. त्यातून खूप मुलांचा समस्यांपासून बचाव होईल. पालक शिक्षणाचं हे काम नुसती विविध विषयांवर भाषणं देऊन होत नाही हे शाळांनी लक्षात घ्यायला हवं. हे कौशल्याचं शिक्षण आहे. त्यामुळे त्यासाठी बालवाडीच्या वयापासून पालकांसाठी अभ्यासक्रम आखायला हवेत. तरच मुलांना त्याचा उपयोग होईल.

आजचे तरुण पालक असे आहेत की त्यांचा स्वत:चा जन्म स्वतंत्र कुटुंबात झाला आहे. स्वत:ला मूल होईपर्यंत त्यांनी लहान मूल हाताळलेलं नाही सांभाळलेलं नाही. घरात मोठी माणसं नाहीत. त्यामुळे मूल ही त्यांना न पेलणारी जबाबदारी वाटते. त्यातच नवरा-बायकोचं पटत नसेल तर अधिकच ताणातून कुटूंब जात असतं. आज कित्येक घरं अशी आहेत, की त्यातले बाबा कामानिमित्त दूरगावी किंवा परदेशात असतात. कधी आईपण अशी लांब गेलेली असते. याचा घरातल्या माणसांवर मुलांवर अतिरिक्त ताण असतो. सतत अस्वस्थ असलेल्या मोठ्या माणसांच्या सहवासात मुलांनी मग लवकर मोठं होण्याची अपेक्षा असते. बालपण जसं गरिबीत हिरावलं जातं. तसं ते आथिर्क संपन्नतेतही हिरावलं जातं. तो निवांतपणा, ती मोकळीक, चुकलं तर चुकलं जाऊ दे असं प्रेमानं म्हणणारी मोठी माणसं या सगळ्या बालपणाच्या गरजाच आहेत. चार खेळणी कमी मिळाली तर काही बिघडत नाही. मुलं कशातूनही खेळ शोधून काढू शकतात. पण पालकांच्या मनाचं स्वास्थ्य फार फार महत्त्वाचं आहे.

घरं लहान, खेळायला मुलं नाहीत, मित्र नाहीत, सर्व दारं बंद अशा सोसायट्यांमध्ये असंख्य मुलं आज गुदमरत आहेत. आई-वडील त्यांच्या नोकरी-व्यवसायात बांधले गेलेले. मग कुणावरतरी मुलं सोपवायची! पाळणाघर ते शाळा. पाळणाघर ते ग्राऊंड. पाळणाघर ते क्लास अशी मुलं दिवसभर फिरवली जातात. एक मूल 'मला बालभवनात नाही जायचं' म्हणून कळवळून रडायचं. त्याची आई मला हा माझाच दोष असा ठपका मनात बाळगून भांडायला आली. त्याचा दिनक्रम पाहिला तर ते मूल सकाळी सहा वाजल्यापासून घराबाहेर असायचं. त्याला आई-वडील भेटायचेच नाहीत. पाळणाघर-शाळा-क्लास हे चक्र संपलं की त्याला घरी जावंसं वाटलं तर त्याची काय चूक? त्याला 'खरंच सध्या बालभवनात पाठवू नका' अशी मी त्या आईला विनंती केली. त्याला आई हवी होती. ती मिळाल्यावर त्याचा प्रश्न आपोआप सुटला.

पालकांच्या बेबंद अपेक्षांपासूनही मुलांचा बचाव करायला हवा आहे. मला माझ्या मुलाला क्रिकेटिअरच करायचा आहे. माझी मुलगी नृत्यांगना व्हायलाच हवी, मुलाला स्केटिंगला घातलं की, त्यानं सुवर्णपदकच मिळवायला हवीत. चौथ्या वर्षापासूनच खरोखर अशा व इतक्या 'स्पेशलायझेशनची' गरज आहे का? महत्त्वाकांक्षी पालकांना वाटतं 'बालभवन'मध्ये २० मुलांच्यात 'जनरल' शिकून काय होणार? पण मग आपली मुलं मातीत, वाळूत, पाण्यात कधी खेळणार? ती इतरांशी मैत्री कधी करणार? स्वत:च्या हातांनी नवनव्या गोष्टी करायचा आनंद ती कधी मिळवणार? ती शेती कधी करणार? आज शहरी आयुष्यात मुलांना एका बंदिस्त कोशात आपण वाढवतो आहोत. स्पधेर्त धावणारी घोडी आपण तयार करतो आहोत. इतरांकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही, इतरांसाठी काही करायचं नाही, घरातली साधी साधी कामं त्यांनी करायची नाहीत. काय होईल मोठेपणी अशा मुलांचं? त्यांच्या भविष्यात मानसिक अस्वास्थ्य तर लिहून नाही ना ठेवलं जात?
गरीब वस्त्यांमधली मुलं 'बालभवन'मध्ये खेळताना आम्ही पाहतो. तेव्हा १४-१५ व्या वर्षी एखाद्या मुलीचं लग्न झालं की खूप वाईट वाटतं. तिच्या आईची असहायता दिसत असते. वर्षभरात या खेळणाऱ्या-बागडणाऱ्या मुलीला मूल होतं. नंतर येऊन जेव्हा ती सांगते की बालभवनातला काळ तिच्या आयुष्यातला सर्वांत चांगला काळ होता. छान खेळता आलं. वाचता आलं. अजूनही ती कधी सुटीच्या दिवशी येऊन बालभवनात खेळू शकते. आई म्हणून ती मुलाचा वेगळा विचार करते. मुलांच्या गाण्यांकडे, गोष्टींकडे, खेळाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहते. तेव्हा लक्षात येतं की बालपणातला आनंद सुजाण पालकत्वालाही जन्म देत असतो.

घरात आणि शाळेत बसून बसून आणि बसूनच राहून मुलांना धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत, कोलांटीउडी मारता येत नाही. त्यांच्या शरीराचा लवचिकपणा तिसऱ्या वर्षापासूनच कमी होतो आहे. त्यांच्या आहाराचा विचार करायला पालकांना वेळ नाही. सहलीला खाऊ म्हणून मुलं तयार वेफर्सची मोठाली पाकिटं आणतायत. टीव्ही व कॉम्प्युटर हेच त्यांचे मित्र. त्यांच्याशी गप्पा मारायला कुणाला वेळ नाही. अशा वातावरणात मुलं विकृत झाली नाहीत तरच नवल!

शोभा भागवत