९ ऑगस्ट, २०११

आदर्श पालक

१.पालकत्वाची व्याख्या : जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. सध्याची पालकाची व्याख्या काय ? जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागड्या शिकवणीवर्गाला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले. याने आपण आपल्या मुलाला भोगी बनवत आहोत. भोगाच्या आधाराने अनेक विकार जन्म घेतात. भोगी व्यक्ती अनेक दोषांना जन्म देते. तर त्यागी व्यक्ती सद्गुणांना जन्म देते. तेव्हा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का ? ‘एखाद्या जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे’, हाच पालकाचा धर्म आहे.

२. आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकत असणे : आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्याा पालकांशी संवाद करावासा वाटत नाही. त्यांना सुचणार्याक नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्यात पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असायला हवा.

३. पालकांच्या मनावर ताण येण्यामागील कारणे

३ अ. सतत भूतकाळात रहाणे : सतत भूतकाळात वावरणारे पालक मुलांशी संवाद साधू शकत नाहीत. मुले सतत वर्तमानकाळात जगतात; म्हणून ती सतत आनंदी असतात. आपण आपल्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आणि घटना सतत आठवत रहातो. ‘शेजार्याीशी घडलेला प्रसंग’, ‘सासूबाई वाईट बोलल्या’, ‘कार्यालयात अधिकारी बोलले’, या विचारांचे ओझे बहुतेकजण वहात असतात. सहाजिकच मुले काही सांगत असतील, तर आपण त्यांचे विचार ऐकण्याच्या स्थितीत नसतो. तेव्हा आपण सतत वर्तमानकाळात रहायला शिकले पाहिजे. आपण भूतकाळाच्या विचारात वावरत असल्याने मुले आणि आपण यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही.

३ आ. नकारात्मक बोलणे : ‘तुला काही येत नाही, तुझा काही उपयोग नाही’, अशा नकारात्मक बोलण्याने मुलांच्या मनावर घाव होतात. एक वेळ स्थूलदेहावर केलेले घाव भरून निघतात; पण जिवाच्या मनावर झालेले घाव आपण भरून काढू शकत नाही. तेव्हा मुलांशी बोलतांना सतत सकारात्मक बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे.

३ इ. स्वतःच्या चुका मुलांसमोर मान्य न करणे : स्वतःच्या चुका मान्य केल्याने मनावरचा ताण अल्प होतो. मुलांच्या मनात आपल्याविषयी आदराचे स्थान निर्माण होते. आपले पाहून मुलेही प्रामाणिकपणे चुका मान्य करायला शिकतात. आपण चूक लपवली, तर प्रथम आपल्या मनावर ताण येतो. मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. ‘बाबा आणि आई स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत, मग मी का कराव्यात’, असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे पालक आणि मुले यांच्यात सूक्ष्म-दरी निर्माण होते.

३ ई. मुलांचे सतत दोष पहाणे : मुलांमधील दोष सतत पाहिल्याने आपल्या मनावर ताण येतो. आपण मुलांचे गुण पहावेत आणि त्यांचे कौतुक करावे. पर्यायाने मुले स्वतःचे दोष स्वीकारून ते घालवण्यासाठी प्रयत्न करतात; पण बरेच पालक मुलांना सतत दोषच दाखवतात. ‘मुलांचे सतत दोषच पहाणे - तणाव आणि मुलांचे सतत गुण पहाणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणले, तर ताण न्यून होण्यास साहाय्य होते.

३ उ. स्वतःची प्रतिमा जपत बोलणे : पालक व्यवहारातील त्यांच्या पदाला चिकटून बोलतात. ते स्वतःला विसरत नाहीत. ‘मी आधुनिक वैद्य आहे’, ‘मी अभियंता आहे’ किंवा ‘मी अधिकारी आहे’, ही प्रतिमा जागृत ठेवून बोलण्याने पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद कदापी होणार नाही. उलट पालकांना ताण येतो आणि मुले ऐकत नाहीत. ‘पालक’ या भूमिकेत येऊन मुलांशी सहजतेने बोलायला हवे. ‘व्यवहारातील प्रतिमा ठेवून बोलणे - ताण आणि मुलांचा पालक म्हणून बोलणे - आनंद’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.

३ ऊ. अधिकारवाणीने बोलणे : आपण मुलांशी बोलतांना अधिकारवाणीने बोललो, तर त्यांना ताण येतो. मुलांना आपले बोलणे आवडत नाही. अधिकारापेक्षा आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे. आपणाला स्वतःलाही कोणी एखादी गोष्ट अधिकारवाणीने सांगितली, तर ती स्वीकारावीशी वाटत नाही. तसेच हे आहे. ‘आधिकारवाणीने बोलणे - तणाव आणि प्रेमाने बोलणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणायला हवे.

३ ए. ‘मुलांमध्ये ईश्वरीतत्त्व आहे’, असा विचार न करणे : ‘प्रत्येक मुलात देव आहे’, याची जाणीव ठेवून संवाद साधायला हवा. मुलातील ईश्वरी तत्त्वाचा आदर करूनच बोलावे. मी ‘व्यक्तीशी बोलत नसून तत्त्वाशी बोलत आहे’, असा सतत विचार केला, तर मुलांशी सहज संवाद होईल आणि तणाव दूर होईल. त्यासाठी ‘व्यक्ती म्हणून बोलणे - तणाव आणि ईश्वरी तत्त्वाशी बोलणे - आनंद’, या सूत्राकडे सतत लक्ष ठेवायला हवे.

३ ऐ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, हे तत्त्व समजून व्यवहार न करणे : पालकांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. आपल्या मुलाची प्रकृती कोणती आहे, त्याची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा. स्पर्धावृत्ती आणि समाजातील स्वतःची प्रतिमा यांनुसार काही पालक मुलांशी व्यवहार करतात. पर्यायाने मुले आणि पालक यांच्यात तणाव निर्माण होतो. असे होऊ नये, याकरिता ‘मुलाची प्रकृती समजून संवाद - आनंद आणि मुलाची प्रकृती समजून न घेता संवाद - तणाव’, हे सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

३ ओ. समजावून न सांगणे : मुलांना प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगावी. सम म्हणजे मुलांच्या स्तराला जाऊन सांगणे. मुलगा पहिलीत असेल, तर पालकांनी त्याच्या स्तराला येऊन संवाद साधावा. यामुळे मुले आपले ऐकतात; पण पालक स्वतःच्याच स्तरावर रहातात. त्यामुळे मुले ऐकत नाहीत. पालकांच्या अहंकारामुळे असे घडते. ‘मुलांच्या स्तराला येऊन बोलणे - आनंद आणि स्वतःच्या स्तराला राहून बोलणे - तणाव’, हे सूत्र आचरणात आणले, तर तणाव न्यून होतो.

३ औ. मुलांशी संवाद नसणे : सध्या मुलांच्या समस्या ऐकून घेणारे कोणीच नसते. पालक म्हणतात, ‘आम्हाला कामे आहेत’, तर शिक्षक म्हणतात, ‘आम्हाला आमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.’ पर्यायाने आज मुलांची फार मोठी मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे पालकांविषयी मुलांच्या मनात आदर आणि विश्वास राहिला नाही. मग मुले ऐकत नाहीत; म्हणून पालकांच्या मनावर ताण येतो. अनौपचारिक बोलल्यामुळे मने जुळतात. याकरिता मुलांशी प्रतिदिन १५ मिनिटे अनौपचारिक बोलणे आवश्यक आहे. यातून मुले मोकळी होतात. ‘प्रतिदिन मुलांशी १५ मिनिटांचे अनौपचारिक बोलणे - आनंद आणि प्रतिदिन अनौपचारिक बैठक नसणे - तणाव’, हे सूत्र लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागल्यास पालक मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात.

३ अं. अपेक्षा करणे : आपण मुलांकडून अपेक्षा ठेवून व्यवहार करत असू, तर मुलांना आपले बोलणे आवडत नाही. त्यांच्यात अहं अल्प असल्यामुळे त्यांना अपेक्षेची स्पंदने कळतात. आपण निरपेक्षपणे त्यांच्याशी व्यवहार करावा. जेथे निरपेक्षता आहे, तेथेच प्रेम आहे. ‘म्हातारपणी मुलगा माझा सांभाळ करील. समाजातील माझी पत टिकविल आणि वाढविल’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा ‘देव माझा सांभाळ करील’, असा विचार करणे योग्य ठरेल; कारण ‘अपेक्षा करून व्यवहार - तणाव आणि निरपेक्षपणे व्यवहार - आनंद.’

पालकांनो, वरील सर्व सूत्रे कृतीत आणल्यानंतर आपण आनंदी होऊ. पर्यायाने आपण सुसंस्कारित पिढी घडवू शकू. ही सर्व सूत्रे कृतीत आणण्यासाठी आपण कुलदेवतेची उपासना करायला हवी. (उपासना सांगावी.)

- श्री. राजेंद्र पावसकर, पनवेल