२७ नोव्हेंबर, २०१२

तुम्ही, मी, आपण सारे सुजाण पालक....

आहाहा! लेखाचं शीर्षकच कसं कानाला गोड वाटतं!- -प्रा. रमेश सप्रे पण ते अर्धवट आहे...पुढे जे शब्द आहेत ते मनाला कसे वाटतात पहा.....‘आहोत का? (सुजाण पालक आहोत का?) नसू तर कसे होऊ?’ असे ते शब्द, खरं तर, प्रश्‍न आहेत. आजचा हा आपणा सर्वांच्या दृष्टीनं जिवंत नि जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्याविषयी अनेक पालक-शिक्षक संघांच्या बैठकांतून प्रश्‍न विचारले जातात. या प्रश्‍नांच्या मुळाशी मुलांचं वर्तन, अभ्यास यामुळे बिघडलेलं कौटुंबिक आरोग्य असतं. पण वाटते तेवढी ही परिस्थिती गंभीर नाही. आपण पालकांनी थोडं अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे. ‘सुजाण पालकत्व’ (वाइज पेरेंटिंग) ही कल्पना अलीकडच्या काळातील आहे अन् ती महत्त्वाची आहे. ‘जाण’ शब्दात जाणणे, जाणता, जाणीव अशा अर्थांच्या छटा आहेत. आपल्याला मुलांच्या मनाची(मानसिकतेची) खरी जाणीव आहे का? मुलांची मनं सदा प्रसन्न राहावीत यासाठी करायच्या उपायांची आपल्याला जाण आहे का? आपण आई-वडील झालो खरे पण ‘परिपक्व, जाणते पालक’ झालो का? हा खरा प्रश्‍न आहे. म्हणतात ना, आई-वडील होणं सोपं आहे, ‘पालक’ होणं अवघड आहे. पशुपक्षी सारे आई-वडील बनतात पण पालक नाही बनू शकत कारण त्यासाठी आवश्यक ती बुद्धी, विचारशक्ती म्हणजेच ‘जाण नि जाणीव’ त्यांच्याकडे नसते. प्रा. राईलकर हे गणिताचे प्रसिद्ध शिक्षक. त्यांना सरकारनं पाहणी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यास -विषयक परिस्थितीबद्दल सूचना करणारा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या अहवालाचं नावच आहे, ‘पालकांनी चालवलेला मुलांचा छळवाद’. यात दोन मुख्य मुद्दे म्हणजे मुलांवर आरंभापासून पालकांनी लादलेलं इंग्रजी माध्यम आणि त्यांच्यावर लादलेलं अवास्तव अपेक्षांचं ओझं. एकूण बोजा वाहणार्‍या गाढवासारखी अवस्था मुलांची होते म्हणून ‘छळवाद’ हा शब्द वापरलाय. असो. ‘बालभवन’ म्हणजे मुलांसाठी नंदनवन. शाळा सोडून उरलेल्या वेळात मुलं इथं निरनिराळ्या कला शिकायला, छंदांचा विकास करायला, आनंदात नाचायला, गायला, बागडायला जमतात. गोव्यातही शहरी व ग्रामीण भागात अशी अनेक ‘बालभवनं’ आहेत. महाराष्ट्रातील ‘बालभवन’च्या संचालिका शोभा भागवत या चांगल्या लेखिकाही आहेत. मुलांचं शिक्षण, पालकांच्या अडचणी, सुजाण पालकत्व अशा विषयावर चिंतन व निरीक्षण करून त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांच्या एका लेखाचं नावच बरंच काही सांगून जातं. - ‘पालकांना, शहाणपण देगा देवा!’...मुख्य विचार अर्थातच शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स-ग्रेड्‌स-रँक्स-पर्सेंटेज एवढाच उद्देश समोर ठेवणारे अनेक पालक असतात. त्यांना आपण आपल्या मुलांचं ‘मार्क्स मिळवणारं यंत्र’ बनवताना त्यांचं कधीही परत न येणारं लहानपण हिरावून घेतोय याची जाणीव नसते. हे कसले ‘सुजाण पालक!’ पालकत्वाचा सर्वांगीण विचार करणारी(ए टू झेड ऑफ पेरेंटिंग) अनेक पुस्तकं मिळतात. ‘जडण-घडण’, ‘पालक-नीती’, गोव्यातील विद्याभारती -कडून प्रकाशित होणारं ‘पालक मित्र’ अशी अनेक नियतकालिकं आपापल्या परीनं ‘सुजाण पालकत्वासाठी मार्गदर्शन करत असतातच. आपणही थोडं याच दिशेनं सहचिंतन करू या.- शाळेत पालकांना संबोेधित करण्यासाठी बोलवतात तेव्हा एक नेहमीचा विषय असतो - ‘मुलांच्या शिक्षणात किंवा व्यक्तिमत्त्व विकासात पालकांचा सहभाग(पार्टिसिपेशन) किंवा पालकांची भूमिका (रोल ऑफ पेरेंट्‌स). शहरातील व ग्रामीण भागातील पालकांच्या बर्‍याच अडचणी समान असल्या तरी काही निराळ्या निश्‍चित असतात. अशा सभांना पालकांना बोलावणं हे रुटीन कर्मकांड असतं. पण पालकांनी येणं किंवा त्यांना आणणं हे त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचं काम असतं. हल्ली पालकांना जाणीव होऊ लागलीय त्यामुळे पूर्वीपेक्षा खूपच चांगली उपस्थिती अशा बैठकांना असते. मुलांचा अभ्यास, सवयी, वागणं याविषयी नुसत्या तक्रारी करून भागणार नाही हे आता बहुतेक पालकांना पटलंय. त्याबरोबरच नुसता शिक्षकांवर सर्व भार टाकणं किंवा सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना जबाबदार धरणं हेही योग्य नाही याची जाणीवही पालकांना अधिकाधिक होऊ लागलीय. हे मुलांच्या जीवनाच्या दृष्टीनं शुभचिन्ह आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांच्या पालक-शिक्षक संघांच्या माध्यमातून पालकांसाठी विविध विषयांवर उद्बोधन वर्ग, तज्ज्ञांची व्याख्यानं व प्रश्‍नोत्तरं सत्रं असे कार्यक्रम सादर होऊ लागले आहेत. ही अत्यंत आवश्यक व आशादायी घटना आहे. पालकांनी अधिकाधिक संख्येनं व सकारात्मक मनोवृत्तीनं यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि हे सारं करताना मनात ‘मुलांचं हित’ हाच मुद्दा असला पाहिजे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे दिवसाचे सक्रिय १२ तास पालक मुलांपासून दूर असणारी बहुसंख्य उदाहरणं आहेत. मुलांचं दुपारचं जेवण, थोडी विश्रांती, सकस मनोरंजन, गृहपाठादी अभ्यास, मित्रमैत्रिणींशी फोनवरून बोलणं, वृत्तपत्रादींचं थोडं वाचन अशा अनेक बाबींकडे पालक लक्ष देऊच शकत नाहीत. व लक्ष देण्यासाठी ठेवलेले नोकर-चाकर याबाबतीत विशेष काही करू शकत नाहीत. हे खरं कारण आहे जे पालकत्वाच्या निरोगी विकासाच्या आड येतं. पालकांनी संस्कार केव्हा घडवायचे - संध्याकाळी, रात्री की सुटीच्या दिवशी? असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो. याच्यावर प्रभावी उपाय आहे का याचा विचार आता करू या. मुलं हे आपल्या जीवनाचा प्राण आहेत हे पालकांना सांगावं किंवा शिकवावं लागत नाही. पण ‘मुलं’ही आपल्या दैनंदिन व एकूण जीवनाची प्राथमिकता किंवा अग्रक्रम(प्रायॉरिटी) आहे का? ...हा प्रश्‍न विचारात टाकणारा आहे. इतर अनेक कटकटी आपल्या मागे असतात हे खरं आहे. पण हेही सत्य आहे की अनेक अनावश्यक कटकटी आपण आपल्या मागे लावून घेतो आणि त्यामुळे मुलांसाठी वेळच उरत नाही. नाहीतरी आपली एकूणच जीवनपद्धती स्वकेंद्री (सेल्फ सेंटर्ड) होऊ लागलीय. कळत नकळत र्आपल्या अनेक कृतींचा फोकस आपल्या स्वतःच्या सुखसोयींवर, आरामसुविधांवर असतो. त्याप्रमाणात कुुटुंबासाठी, मुलांसाठी वेळ व शक्ती कमी राहते. परिणाम मुलांच्या वागण्यामुळे व अभ्यासाच्या परिस्थितीमुळे सर्वांच्या मनावर सदैव ताण राहतो जो कौटुंबिक शांतिसमाधानाला आणखी मारक असतो. हे दुष्टचक्र भेदलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? वेळेचं नियोजन(टाइम मॅनेजमेंट) जरा काटेकोरपणे करून त्यात मुलांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. सर्वप्रथम व सर्वांत शेवटी अधिकाधिक वेळ मुलांसाठी ठेवलाच पाहिजे. सुदैवानं हल्ली कुटुंबात मुलं कमीच(बहुतेक कुटुंबात एकच) असतात. त्यामुळे लक्ष देणं अवघड नसतं पण विशिष्ट वेळ यासाठी राखून ठेवावाच लागतो. काम करणार्‍या पालकांना मुलं सर्वसाधारणपणे सायंकाळीच भेटतात. त्यावेळपर्यंत दिवसभराच्या कष्टानं, केलेल्या वणवणीमुळे शरीर थकून जातं. पण मनाचा उत्साह कायम ठेवला तर मुलांसाठी आवश्यक ती ऊर्जा राखून ठेवता येते. ती ठेवलीच पाहिजे. शिक्षणाशिवायही मुलांचं जग व जीवन आहे हे पक्कं ठरवलं पाहिजे. शिक्षण कमी महत्त्वाचं नाही पण मुलांबरोबरचं आपलं ‘सहजीवन’ अभ्यास, गृहपाठ, क्लासेस, शिकवण्या यामुळे झाकोळून जाणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. आठवड्याच्या शेवटी(वीकेंड) मुलांबरोबरच राहण्याच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. हे करताना मुलांच्या मनाचा कल लक्षात ठेवायला हवा याचं भान ठेवलं पाहिजे. घरातील साध्या साध्या गोष्टीत जी निर्णय घेण्याची प्रक्रिया(डिसिजन मेकिंग) असते त्यात मुलांचा मार्गदर्शित सहभाग (गाइडेड पार्टिसिपेन) असला पाहिजे. मुलांबरोबर गप्पागोष्टी करण्यासाठी, काव्यशास्त्र विनोदासाठी खास वेळ रोज काढून ठेवला पाहिजे. मुलं मोठी होत जातील तशा अनेक मर्यादा या गोष्टींवर पडतील. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या मित्रमंडळाचा (पीअर ग्रुप्स) त्यांच्या अनेक सवयी, निर्णय, आवडीनावडी यावर व एकूणच वर्तनावर खूप प्रभाव किंवा दबाव(पीअर प्रेशर) असतो ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. हल्लीच्या जीवनपद्धतीत वाढत्या वयाच्या मुलामुलींच्या मनावर तर शिक्षक-पालक-इतर वडील मंडळी यांच्यापेक्षा हा प्रभाव अधिक असतो. आईवडिलांनी आपला प्रभाव प्रेम, आपुलकी, कर्तव्यपालन यातून सतत जागता व जिवंत ठेवायला हवा. लहानपणापासून मुलांच्या भावजगताशी व कल्पना किंवा विचार विश्‍वाशी प्रेमानं जोडलेलं राहणं यासाठी अत्यावश्यक आहे. प्रेमानं जाणीवपूर्वक केलेला स्पर्श हा यासाठी जिवंत सेतु आहे. अजून खूप गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळी बघू. एक लक्षात ठेवू या - मुलांची स्वतंत्र व्यक्तिमत्वं असतात. त्यांना गृहीत न धरता त्यांचं हित साधण्याचा संकल्प करू या.