* माझी मुलगी सात वर्षांची आहे. सध्या सुट्टी सुरू झाल्यापासून तिचा एकच उद्योग असतो, टीव्ही बघणं. सकाळपासून रात्रीपर्यंत जवळजवळ सहा तास ती
टीव्हीच बघते. टीव्ही बंद केला, की जोराजोराने आरडाओरडा करते... आदळआपट करते. नाइलाजाने तिला टीव्ही बघू द्यावाच लागतो. तिचं जेवणही तिथेच चालतं. आम्हाला असहाय्य वाटतं. तिचं टीव्ही पाहणं आम्ही कसं थांबवू?
पहिली गोष्ट म्हणजे त्यातला 'नाइलाजाचा', 'असहाय्यतेचा' भाग तुम्हाला वजा करावा लागेल. स्वत:च्या असहाय्यतेकडे तुम्ही पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तिच्या हट्टाला घाबरताय आणि त्यालाच 'नाइलाज' आणि 'असहाय्यता' म्हणताय. काही बाबतीत तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. मुलांची ऊर्जा सक्रियतेने वापरली जाणं महत्त्वाचं असतं. नाहीतर ती आळसावतात आणि निष्क्रिय बनतात. पालकांनी मुलांना दिलेला वेळ ही मुलांसाठी पर्वणी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची गुंतवणूक असते. तुमच्या मुलीला तुमचा वेळ वेगळया तऱ्हेने मिळणं आवश्यक आहे. जर तुम्ही तिच्याशी खेळलात, तिच्याशी गप्पा मारल्यात, तिला ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टी करायला तिला जास्त वाव दिलात, तर तिची ऊर्जा विधायक दिशेने वळेल. आपोआपच टीव्ही बघण्यासारख्या निष्क्रिय कामासाठी तिच्याकडे कमी ऊर्जा शिल्लक राहील. त्यातून तुमचं आणि तिचं नातंही निरोगी होईल. तुम्हाला तिचा टीव्ही 'थांबवायचा' नाही तर टीव्हीला चांगले पर्याय निर्माण करायचे आहेत, ज्यामुळे तिची टीव्हीची गरज कमी होईल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील व्हावं लागेल. तिच्यात बदल होईपर्यंत धीर धरावा लागेल आणि मुख्य हणजे तिच्या आक्रस्ताळ्या तंत्रांना बळी पडणं थांबवावं लागेल.
* माझा मुलगा चार वर्षांचा आहे आणि मुलगी दोन वर्षांची आहे. त्यांना आम्ही शक्यतो टीव्हीपासून लांब ठेवतो. टीव्ही ही आम्हाला पुढे जाऊन त्यांच्यासाठी समस्या व्हायला नकोय. आम्ही काय खबरदारी घेऊ?
तुम्ही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन! तुम्हाला अभिप्रेत असलेल्या 'खबरदारी'बद्दल अमेरिकन बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्या सांगतो, टीव्हीला घराच्या सजावटीत सर्वात मध्यवतीर् स्थान नसावं. टीव्ही बेडरूममध्ये नसावा. टीव्हीवरचे कुठले कार्यक्रम मुलांनी बघावेत, हे पालकांनी ठरवावं. (सध्याचे आपल्याकडचे टीव्हीवरचे कार्यक्रम विचारात घेता ही निवड सुज्ञ पालकांसाठी फारच सोपी आहे. निदान ९० टक्के कार्यक्रम आपोआप बाद होतील!). मुलांनी टीव्ही किती वेळ बघावा, हेही महत्त्वाचं आहे. लहान मुलं जितका कमी बघतील तितकं चांगलं! मोठ्या मुलांसाठी शाळेच्या दिवशी जास्तीत जास्त एक तास आणि सुटीच्या दिवशी दोन तास (यात कम्प्युटर गेम्स, व्हिडीयो गेम्स हे सर्व आलं.). टीव्हीवरच्या आवडत्या कार्यक्रमांनुसार वेळेचं नियोजन करावं, आपल्याला वेळ आहे म्हणून टीव्ही लावलाय असं होऊ नये. गृहपाठ, खेळ या महत्त्वाच्या कार्यक्रमांनंतरच मुलांनी टीव्ही बघावा. झोपाण्याआधी निदान दोन तास तरी टीव्ही बंद होणं आवश्यक आहे. नाहीतर झोपेवर विपरीत परिणाम होतो. जेवताना (किंवा जेवण्यासाठी लालूच म्हणून) टीव्ही लावून देऊ नये. मुलांबरोबर पालकांनी काही कार्यक्रम बघावेत आणि त्या कार्यक्रमांविषयी मुलांशी चर्चा करावी. यामुळे मुलं कार्यक्रमातून काय घेतात हे कळतं. सर्वांत महत्त्वाचं हेच की पालकांनी स्वत:च्या टीव्ही बघण्याकडे आत्मपरीक्षणात्मक भूमिकेतून बघावं आणि त्यात योग्य ते बदल घडवावेत. आपल्या मुलांबद्दल जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या पालकांसाठी हे सर्व आचरायला कठीण आहे का, हे तुम्हीच ठरवा.
- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ