१० डिसेंबर, २०१०

स्तुती : टॉनिक की विष?

नमस्कार,
सुजाण पालकहो ,
आज बरेच दिवसांनी वेळ हि मिळाला आणि तुम्हाला सांगण्यासारखे काही लेख हि छान तो पुढे देत आहे .


स्तुती : टॉनिक की विष?

माझी मुलगी दहा वर्षांची आहे. अभ्यासात तिची फारशी गती नाही. मी आई म्हणून तिला समजून घेऊ शकते. पण, तिचे वडील तिला सतत यावरून बोलत असतात. माझं म्हणणं

एकच, तिची चित्रकला चांगली आहे, गाणं चांगलं आहे त्याबद्दल तिची प्रशंसा करा. पण, ते ऐकत नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी सांगाल का?

मुलाची आत्मप्रतिमा घडण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा सहभाग असतो. सतत ऐकाव्या लागणाऱ्या टीकेमुळे मुलाची आत्मप्रतिमा नकारात्मक होते. कुठल्याही मुलात काहीतरी चांगलं असतंच. जे चांगलं असतं, त्याचं कौतुक जर पालकांनी केलं तर मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याची आत्मप्रतिमा सकारात्मक व्हायला मदत होते. त्यामधून ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत त्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलायला मदत होते. तुमच्या मुलीमध्ये जे चांगलं आहे त्याला वाव देणं महत्त्वाचं आहे. त्यातून ती खुलेल. तिची मन:स्थिती आनंदी राहील आणि तिचा विकास योग्य दिशेने होईल.

तिच्या वडिलांना मी हेच सांगेन, की तुमची मुलगी तुमच्या तोंडून आलेले तिच्याबद्दलचे चांगले उद्गार ऐकण्यासाठी आतुरलेली आहे यावर विश्वास ठेवा. तिच्या आयुष्यात आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही निश्चितपणे जबाबदार ठरू शकता.

द्य माझा मुलगा चार वर्षांचा आहे. त्याने कुठलीही गोष्ट केली, की त्याला त्याच्याबद्दल खूप जास्त स्तुती हवी असते. आम्ही ती करतोही. पण, आम्हाला सतत भिती वाटते, की त्याचीच त्याला सवय लागेल की काय?

तुमची भिती रास्त आहे. आपण केलेल्या कृत्याची प्रशंसा मुलांनाच काय पण, भल्याभल्यांनाही हवी असते. मुलांच्या कुठल्याही कृत्याबद्दल त्यांची स्तुती केल्यास त्यांना 'आपण केलेलं कृत्य चांगलं होतं' हा संदेश मिळतो. या अथीर् स्तुती एक टॉनिक आहे. पण, स्तुती एखाद्या अंमली पदार्थासारखी असते. तिची चटक लागू शकते. स्तुती आपण कशी करतो आहोत, त्यावर ते अवलंबून असतं. अनेकदा 'तू काय गेट आहेस', 'तुझ्यासारखं कोणी नाही' , 'तुझं अमुक अमुक कसं नेहमीच छान असतं' अशी अवास्तव स्तुती आपण करतो. त्यातून मुलाला आपण नेमकं काय चांगलं केलं ते समजत नाही. 'आपण म्हणजे कुणीतरी सर्वश्रेष्ठ आहोत. आपलं कायम सर्वांनी कौतुकच केलं पाहिजे' ही कल्पना त्याच्या मनात दृढ व्हायला लागते. असं कौतुक नाही मिळालं, की त्याला अंमली पदार्थाची जशी 'विथड्रॉअल्स' येतात तसं काहीसं व्हायला लागतंं. अशा वेळी मुलं चिडचिडी होतात, हट्टी होतात, स्तुती ओरबाडून घ्यायला बघतात आणि अति आत्मकेंदित होतात. म्हणून मुलांची स्तुती करताना जपून करावी!

मुलाने केलेल्या कृत्यातलं काय आणि कसं चांगलं आहे ते सांगावं. उदा. त्याने काढलेल्या चित्रातली रंगसंगती कशी योग्य आहे, त्यातला जिवंतपणा कसा मनाला आनंद देणारा आहे वगैरे गोष्टी त्याला सांगितल्या तर त्याच्या हे लक्षात येईल, की आपण काढलेलं चित्र छान आहे. त्यासाठी त्याला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची गरज नाही. स्तुती करताना हे भान ठेवलं तर त्याचे दुष्परिणाम न होता चांगला उपयोग होईल.

- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ

1 टिप्पणी:

  1. ha prayog aawdla.............. mi pn hou ghatleli manastadnya ahe. ata maze counselling madhil MA che last semister chalu ahe. ya saglya goshtincha mla pn anekda anubhav yeto. mulanvishaichi avastav kalji n avastav apeksha yamule anekda prashna nirman hotat. palak purn kru na shaklelya sarv goshti purn karnyasathi mule nastat he palkani lakshat thevayla paije.

    उत्तर द्याहटवा