घर मुलांचं
हल्ली नवे आई-बाबा हौसेनं फ्लॅट घेतात इंटिरियर डेकोरेटरकडून तो सजवून घेतात. त्यात मुलांची खोली असते, तिथे कपाटं रंगीत, भिंती रंगीत, पलंग रंगीत, बाथरूम रंगीत एवढंच काय छत आणि पंखादेखील रंगीत असतो. ते सगळं पाहून हे मुलांना खरंच आवडत असेल का असा मला प्रश्न पडतो. मुलांना काय आवडावं ते आपण असं कुण्या परक्या माणसाच्या हाती कसं काय सोपवून टाकतो? आणि डेकोरेटर मंडळी कुठली तरी तयार पुस्तकं पाहतात, दाखवतात तो फोटो छान दिसतो म्हणून तशा रचना निवडल्या जातात; पण मला हे सगळं मुळीच `बालकेंद्री' वाटत नाही.
जसं लहान मुलाला स्वत:च्या हातानं ते जेवायला लागलं की लहान ताट देऊ नये, मोठं ताट द्यावं.कारण ते मूल अन्न सांडतं, उडवतं, पसरतं. तसंच लहान मुलं लोळतात, त्यांना त्यांच्या मापाचा छोटा पलंग कसा चालेल? घरात अभ्यास करतानाही मुलानं त्याच्या छोट्या टेबलावर छोट्या खुर्चीवर अंग आखडून का बसायचं? छोट्या फळयावरच का चित्रं काढायची? लहान मुलांच्या हालचाली कशा जोरदार असतात ती तेवढा हात उंच करतात, भोवताली फेकतात तेवढी चित्रं काढायला जागा त्यांना मिळायला हवी.
तासाभराच्या शिबिरातसुद्धा आपण पाहिलं तर मुलं कधीच `देवासारखी' मांडी घालून ताठ बसत नाहीत. ती एक पाय दुमडून बसतील, दोन्ही पाय आरामात मागे दुमडून बसतील, पालथी पडतील. त्यांच्या एकेक अवस्था पाहण्याजोग्या असतात. आपण `लाइफ स्टाइल'च्या मागे लागून त्यांना शारीरिक मर्यादा घालतो आहोत का? त्याचे परिणामही दिसत आहेत. मुलं कोलांटी उड्या मारू शकत नाहीत, मुलांची डोकी गुडघ्याला लागत नाहीत, ती सरसर झाडावर चढू शकत नाहीत. घरात हालचालीच्या मर्यादा आणि खाण्यात काहीच मर्यादा नाहीत, दोन्ही कारणं आहेत मुलांचा लवचीकपणा जायला.
घरात सर्वांत काय आवडतं याचं उत्तर अनेक मुलं टीव्ही असं देतात. काहीजण कम्प्यूटर असं देतात. टीव्ही म्हटलं की मुलांची जी टकळी सुरू होते. आपण कधी न ऐकलेल्या अशा अनेक कार्यक्रमांची, मालिकांची, चॅनल्सची, शोज्ची नावं मुलं फटाफट सांगत असतात. कशातलं कुठलं पात्र मस्त असतं ते सांगतात. किती वेळ टीव्ही बघता याचं उत्तर आई ओरडेपर्यंत असं असतं.
घरात कॉम्पुटर वापरणाऱ्या मुलांची संख्याही बरीच आहे. आमच्याकडे पाच कॉम्पुटर आहेत. लॅपटॉपपण आहे, असंही सांगणारी मुलं भेटतायत आणि अनिर्बंध कम्प्यूटर वापरणारी मुलं-मुली आठव्या व नवव्या वर्षी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडची भाषा करू लागलीत. त्या नात्यांच्या मानसिक परिणामांना बळी पडू लागलीत. अभ्यासातलं लक्ष उडणं, घरात आई-वडिलांशी सतत वाद होणं, शाळेत जायचा कंटाळा असे अनेक प्रश्न वेगानं निर्माण होऊ लागलेत.
शहरीकरणाच्या रेट्यात, पैशांच्या समृद्धीत, दिवाणखान्याला बळी पडताना, घराचं डेकोरेशन करताना आपण मुलांच्या गरजा किती वेगानं विसरत चाललो आहोत आणि हे सगळं हौसेनं ज्या मुलांसाठी करायचं ती काय म्हणतायत? ती काय सांगतायत?
एक मुलगी म्हणत होती `मला घरातलं बाकी काही आवडत नाही; पण माझी छोटी बहीण आवडते.' एकजण सांगत होता `आजी नसली की मला घर आवडत नाही. आजी लाड करते.' एक म्हणाली, `मला आबा आवडतात.' एका मुलीने नाक उडवत सांगितलं, `माझं कपड्यांचं कपाट डॉल्स हाऊसच्या आकाराचं आहे ते मला मुळीच आवडत नाही.' एकीनं निषेध नोंदवला, `मला बाबांचं कपाट आवडत नाही ते कपडे कसेपण कोंबतात आणि वासपण येतो.' एकाने सांगितलं, `मला माझी खेळण्याची बास्केट आवडत नाही. कारण त्यात खूप मोडकी खेळणी तशीच ठेवलीत.' हे एकेक वाक्य आपल्या अभ्यासासाठी आहे असं मला वाटलं.
शाळेत कुटुंबाचं `फॅमिलीचं' चित्र काढायला सांगितलं होतं तर एका मुलीनं आई-बाबा-मुलं, आजी, आजोबा, घरातली कामाची बाई, मांजर, कुत्रं, ड्रायव्हर काका असं चित्र काढलं, तर बाइंर्नी त्यावर काट मारली. सांगितलं, `आई-बाबा आणि तू एवढंच चित्र काढून आण.' हे ऐकून मी धन्य झाले! मुलांचं जगच वेगळं असतं. त्यांना घरातली माणसं एवढंच नाही तर नातेवाईक, शेजारी, प्राणी एवढंच काय घरातली पाल (शिल्लक ठेवली असेल तर) हीसुद्धा आप्तमंडळी वाटतात. घराचं चित्र काढायला सांगितल्यावर एकदा एका मुलाने नुसतंच फुलपाखरू काढलं त्याच्याबद्दल बोलताना तो अगदी नाचून सांगत होता, `आमच्या घरात हे येतं आणि असं खुर्चीवर बसतं, मग भिंतीवर बसतं, मग उडून जातं.' एका मुलाने घराचं चित्र म्हणून मोठं शेत काढलं होतं. त्यात हिरवं पिवळं गवत आणि एका कोपऱ्यात त्याचं स्वत:चं छोटंसं चित्र. म्हणाला, `मला घर नाही आवडत शेतच आवडतं.'
एका मुलीने घराचं चित्र म्हणून बाबा आणि तीन मुली आणि मुलीच्या दोन्ही वेण्या पुढे जमिनीपर्यंत आलेल्या अशा काढल्या. तिच्या आईचे केस लांब आहेत का मी पाहिलं तर नव्हते. तिचेही नव्हते. बहिणीचेही कापलेले. मग तिनं असं का चित्र काढलं तर तिची आई म्हणाली, तिला लांब केस आवडतात म्हणून ती नेहमी मुली अशाच काढते.
मुलांचं हे वागणं केवळ चित्रांपुरतंच खरं नाही. त्यांना काय आवडतं ते शोधून काढून ते करण्याची त्यांची धडपड अखंड चालू असते. त्यामुळे घरात मला सगळयात गॅलरी आवडते. तिथेच मी भातुकली खेळते. मला गच्चीच आवडते तिथे मी खूप खेळतो. चांगली खेळणी शोकेसमध्ये ठेवतात म्हणून मग मी मोडक्या खेळण्यांशीच खेळतो असं मुलं सांगत असतात. मुलांसाठी आणलेली पुस्तकंसुद्धा कपाटात बंद ठेवणारे नीटस आईवडील असतात.
अर्थात ही उदाहरणं मुद्दाम लिहायचं कारण सुधारणा इथे हवी आहे. नाहीतर समंजस आई-बाबांचं प्रमाणही हळूहळू वाढताना दिसतं आहे, ही आनंदाची गोष्ट सांगायला हवीच.
आपापली कामं करताना मुलं वाढवणं, त्यांना पुरेसा वेळ देणं ही नवी कौशल्यं आई-बाबा दोघांनीही आत्मसात करायला हवीत. मुलाची वाढ म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक वाढ हे सगळं कायम लक्षात असावं लागतं. कृतीत उतरावं लागतं. तसं भान असलेले आई-वडीलही मला दिसायला लागलेत. फक्त भीती अशी वाटते की भरपूर पैसे मिळवणं हा मार्ग एकदा मान्य केला की त्या वाटेवर अनेक गोष्टी हरवतच जाणार की काय! वेळ हरवणार, नाती हरवणार, स्वास्थ्य हरवणार, आणखी कितीतरी !
पण आपण असा नकारार्थी विचार करून चालणार नाही. काय हरवता कामा नये हे कायम लक्षात ठेवायला हवं. त्यात प्रेम हरवता कामा नये. घरातली शांती हरवून चालणार नाही. निरपेक्षपणे इतरांसाठी काम करण्याची आपली संस्कृती विसरून चालणार नाही. सातत्यानं चांगल्या गोष्टी करत राहण्याच्या सवयी घरात रुजायला हव्यात. मुलांचा उत्साह आयुष्यभर शिल्लक राहील असा आनंदाचा आणि कामसूपणाचा पाया भक्कम करायला लागेल. कितीही लाटा आल्या आणि रेटे वाढले तरी आयुष्यात कोणती मूल्यं कधीच विसरायची नाहीत त्याची पक्की तयारी आई-वडिलांचीच असायला हवी, तर ती मुलांपर्यंत पोचेल. स्पर्धा स्पर्धा म्हणून नको ते ताण मुलांवर लादणं बंद व्हायला हवं. आयुष्य वैयक्तिक झेंडे लावण्यासाठी नसून सामाजिक गरजा, सामाजिक न्यायासाठी, डोळसपणे कामं करण्यासाठी आहे हे पटलं तर मुलं फार सुजाणपणे आपले मार्ग शोधतात. भारतात जन्मलेल्या माणसांना तरी आपल्या भोवतालच्या गरीब जगाचा विसर पडून चालणारच नाही आणि या पृथ्वीचं जे काही वाटोळं आजवर आपण केलं ते यापुढे करत राहणार नाही या विचारामागे वेगानं जात राहण्याला पर्यायच नाही. या सगळया गोष्टी घरानंच शिकवायच्या आहेत.
जगाचा प्रगतीचा वेग वाढला असेल तर घर अनभिज्ञ असून कसं चालेल? ज्या घरात भावी काळातलं जग उमलत असतं, आकार घेत असतं ते मुलांचं घर किती सुजाण व्हायला हवं!
- शोभा भागवत,
सर, आपला ब्लोग आज अचानक वाचावयास भेटला आणि वाळवंटात हिरवळ दिसल्यावर जो आनंद होतो तसा आनंद झाला. मराठी ब्लोग प्रेम गाणी, चारोळ्या, खादाडी, आणि इतर कथा याच्या पलीकडे जाण्यास तय्यार नाही.
उत्तर द्याहटवामाझे जाल वरील मित्र डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर हे मुलांचे डॉक्टर्स असून कोकणात महाड येथे व्यवसाय करतात. त्यांच्या बद्दल अधिक माहिती पुढील LINK वर आपणास मिळेल .अवश्य भेट द्या.
http://mr.upakram.org/node/2492#comment-38963
आपला स्नेह जाल वर लाभावा हीच इच्छा .
आपला
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com PLEASE REPLY To: thanthanpal@gmail.com
आपल्याला मेल केला पण तो फेल झाला म्हणून असा संपर्क साधत आहे.
आत्ताच त्यांना आपल्या ब्लोग बद्दल सांगितले. तो मेल पुढील आहे.
masta blog ahe. mala atishay avadla
उत्तर द्याहटवाchanch ahe ha blog. ata alela dambic pic. yavrch ahe. jrur phava. pn ya goshti pratyaksha aacharnyat khara point ahe. mulane mothe houn palkanche nav kadhave as vatnarya saglyani mulanche palan poshan nit krnyachi garj ahe. "JASE PERAL TASE UGVEL."
उत्तर द्याहटवा