६ डिसेंबर, २०१२

संस्कार.......एक द्विधा ??

संस्काराचं बाळकडू .. बालपणीच पाजलेले.. आज मात्र समाजात, संस्काराचे "बारा" वाजलेले.. समाजात फिरताना जाणवतो, संगतीचा भारी पगडा... इकडेच सुरु होतो, 'संस्कार - संगत' झगडा.. मौल्यवान शिक्षणाचे सध्याचे.. समाजातले "दर" पाहून, 'डॉक्टर' , 'इंजिनिअर' अशा "सेवाभावी" इच्छा.. मनातच जातात राहून.,, आजचे "कॉर्पोरेट विश्व" म्हणजे.. संस्कार जपण्याची बॉर्डर, कारण क्वालिटी डावलून, "बार" मध्ये साईन होतात पर्चेस ऑर्डर.. विवाह संस्था ह्या पवित्र प्रथेचे.. बदललेले इक्वेशन.....म्हणजेच स्वातंत्र्याच्या "स्पेस" साठी... सजवलेले "लिव इन रिलेशन" अनेक उदाहरणे देऊन गायली जाते... नारी शक्तीची गाथा, सोयीनुसार संस्कारांना डावलून रुजवली जात आहे...."स्त्री-भ्रूण" हत्येची प्रथा.. "मोठा झाल्यावर नक्की सांभाळेन..." ही बालपणीच्या संस्काराची भाषा.. अर्थार्जनाच्या हव्यासापोटी पालकांना दाखवते.. एकटेपणा अथवा वृद्धाश्रमाची दिशा.. समाजातल्या अशा विरोधाभासाने, होऊन देऊ नका स्वतःची "द्विधा".. बुद्धीचा कस पणाला लावून.. विचारांचा सुवर्णमध्य साधा.
चांगले संस्कार आणि स्वतःचे विचार यांचा अचूकपणे घाला मेळ... आनंदाने जीवन जगण्याचा, मग रंगात येईल खेळ..

२७ नोव्हेंबर, २०१२

तुम्ही, मी, आपण सारे सुजाण पालक....

आहाहा! लेखाचं शीर्षकच कसं कानाला गोड वाटतं!- -प्रा. रमेश सप्रे पण ते अर्धवट आहे...पुढे जे शब्द आहेत ते मनाला कसे वाटतात पहा.....‘आहोत का? (सुजाण पालक आहोत का?) नसू तर कसे होऊ?’ असे ते शब्द, खरं तर, प्रश्‍न आहेत. आजचा हा आपणा सर्वांच्या दृष्टीनं जिवंत नि जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्याविषयी अनेक पालक-शिक्षक संघांच्या बैठकांतून प्रश्‍न विचारले जातात. या प्रश्‍नांच्या मुळाशी मुलांचं वर्तन, अभ्यास यामुळे बिघडलेलं कौटुंबिक आरोग्य असतं. पण वाटते तेवढी ही परिस्थिती गंभीर नाही. आपण पालकांनी थोडं अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे. ‘सुजाण पालकत्व’ (वाइज पेरेंटिंग) ही कल्पना अलीकडच्या काळातील आहे अन् ती महत्त्वाची आहे. ‘जाण’ शब्दात जाणणे, जाणता, जाणीव अशा अर्थांच्या छटा आहेत. आपल्याला मुलांच्या मनाची(मानसिकतेची) खरी जाणीव आहे का? मुलांची मनं सदा प्रसन्न राहावीत यासाठी करायच्या उपायांची आपल्याला जाण आहे का? आपण आई-वडील झालो खरे पण ‘परिपक्व, जाणते पालक’ झालो का? हा खरा प्रश्‍न आहे. म्हणतात ना, आई-वडील होणं सोपं आहे, ‘पालक’ होणं अवघड आहे. पशुपक्षी सारे आई-वडील बनतात पण पालक नाही बनू शकत कारण त्यासाठी आवश्यक ती बुद्धी, विचारशक्ती म्हणजेच ‘जाण नि जाणीव’ त्यांच्याकडे नसते. प्रा. राईलकर हे गणिताचे प्रसिद्ध शिक्षक. त्यांना सरकारनं पाहणी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यास -विषयक परिस्थितीबद्दल सूचना करणारा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या अहवालाचं नावच आहे, ‘पालकांनी चालवलेला मुलांचा छळवाद’. यात दोन मुख्य मुद्दे म्हणजे मुलांवर आरंभापासून पालकांनी लादलेलं इंग्रजी माध्यम आणि त्यांच्यावर लादलेलं अवास्तव अपेक्षांचं ओझं. एकूण बोजा वाहणार्‍या गाढवासारखी अवस्था मुलांची होते म्हणून ‘छळवाद’ हा शब्द वापरलाय. असो. ‘बालभवन’ म्हणजे मुलांसाठी नंदनवन. शाळा सोडून उरलेल्या वेळात मुलं इथं निरनिराळ्या कला शिकायला, छंदांचा विकास करायला, आनंदात नाचायला, गायला, बागडायला जमतात. गोव्यातही शहरी व ग्रामीण भागात अशी अनेक ‘बालभवनं’ आहेत. महाराष्ट्रातील ‘बालभवन’च्या संचालिका शोभा भागवत या चांगल्या लेखिकाही आहेत. मुलांचं शिक्षण, पालकांच्या अडचणी, सुजाण पालकत्व अशा विषयावर चिंतन व निरीक्षण करून त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांच्या एका लेखाचं नावच बरंच काही सांगून जातं. - ‘पालकांना, शहाणपण देगा देवा!’...मुख्य विचार अर्थातच शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स-ग्रेड्‌स-रँक्स-पर्सेंटेज एवढाच उद्देश समोर ठेवणारे अनेक पालक असतात. त्यांना आपण आपल्या मुलांचं ‘मार्क्स मिळवणारं यंत्र’ बनवताना त्यांचं कधीही परत न येणारं लहानपण हिरावून घेतोय याची जाणीव नसते. हे कसले ‘सुजाण पालक!’ पालकत्वाचा सर्वांगीण विचार करणारी(ए टू झेड ऑफ पेरेंटिंग) अनेक पुस्तकं मिळतात. ‘जडण-घडण’, ‘पालक-नीती’, गोव्यातील विद्याभारती -कडून प्रकाशित होणारं ‘पालक मित्र’ अशी अनेक नियतकालिकं आपापल्या परीनं ‘सुजाण पालकत्वासाठी मार्गदर्शन करत असतातच. आपणही थोडं याच दिशेनं सहचिंतन करू या.- शाळेत पालकांना संबोेधित करण्यासाठी बोलवतात तेव्हा एक नेहमीचा विषय असतो - ‘मुलांच्या शिक्षणात किंवा व्यक्तिमत्त्व विकासात पालकांचा सहभाग(पार्टिसिपेशन) किंवा पालकांची भूमिका (रोल ऑफ पेरेंट्‌स). शहरातील व ग्रामीण भागातील पालकांच्या बर्‍याच अडचणी समान असल्या तरी काही निराळ्या निश्‍चित असतात. अशा सभांना पालकांना बोलावणं हे रुटीन कर्मकांड असतं. पण पालकांनी येणं किंवा त्यांना आणणं हे त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचं काम असतं. हल्ली पालकांना जाणीव होऊ लागलीय त्यामुळे पूर्वीपेक्षा खूपच चांगली उपस्थिती अशा बैठकांना असते. मुलांचा अभ्यास, सवयी, वागणं याविषयी नुसत्या तक्रारी करून भागणार नाही हे आता बहुतेक पालकांना पटलंय. त्याबरोबरच नुसता शिक्षकांवर सर्व भार टाकणं किंवा सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना जबाबदार धरणं हेही योग्य नाही याची जाणीवही पालकांना अधिकाधिक होऊ लागलीय. हे मुलांच्या जीवनाच्या दृष्टीनं शुभचिन्ह आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांच्या पालक-शिक्षक संघांच्या माध्यमातून पालकांसाठी विविध विषयांवर उद्बोधन वर्ग, तज्ज्ञांची व्याख्यानं व प्रश्‍नोत्तरं सत्रं असे कार्यक्रम सादर होऊ लागले आहेत. ही अत्यंत आवश्यक व आशादायी घटना आहे. पालकांनी अधिकाधिक संख्येनं व सकारात्मक मनोवृत्तीनं यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि हे सारं करताना मनात ‘मुलांचं हित’ हाच मुद्दा असला पाहिजे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे दिवसाचे सक्रिय १२ तास पालक मुलांपासून दूर असणारी बहुसंख्य उदाहरणं आहेत. मुलांचं दुपारचं जेवण, थोडी विश्रांती, सकस मनोरंजन, गृहपाठादी अभ्यास, मित्रमैत्रिणींशी फोनवरून बोलणं, वृत्तपत्रादींचं थोडं वाचन अशा अनेक बाबींकडे पालक लक्ष देऊच शकत नाहीत. व लक्ष देण्यासाठी ठेवलेले नोकर-चाकर याबाबतीत विशेष काही करू शकत नाहीत. हे खरं कारण आहे जे पालकत्वाच्या निरोगी विकासाच्या आड येतं. पालकांनी संस्कार केव्हा घडवायचे - संध्याकाळी, रात्री की सुटीच्या दिवशी? असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो. याच्यावर प्रभावी उपाय आहे का याचा विचार आता करू या. मुलं हे आपल्या जीवनाचा प्राण आहेत हे पालकांना सांगावं किंवा शिकवावं लागत नाही. पण ‘मुलं’ही आपल्या दैनंदिन व एकूण जीवनाची प्राथमिकता किंवा अग्रक्रम(प्रायॉरिटी) आहे का? ...हा प्रश्‍न विचारात टाकणारा आहे. इतर अनेक कटकटी आपल्या मागे असतात हे खरं आहे. पण हेही सत्य आहे की अनेक अनावश्यक कटकटी आपण आपल्या मागे लावून घेतो आणि त्यामुळे मुलांसाठी वेळच उरत नाही. नाहीतरी आपली एकूणच जीवनपद्धती स्वकेंद्री (सेल्फ सेंटर्ड) होऊ लागलीय. कळत नकळत र्आपल्या अनेक कृतींचा फोकस आपल्या स्वतःच्या सुखसोयींवर, आरामसुविधांवर असतो. त्याप्रमाणात कुुटुंबासाठी, मुलांसाठी वेळ व शक्ती कमी राहते. परिणाम मुलांच्या वागण्यामुळे व अभ्यासाच्या परिस्थितीमुळे सर्वांच्या मनावर सदैव ताण राहतो जो कौटुंबिक शांतिसमाधानाला आणखी मारक असतो. हे दुष्टचक्र भेदलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? वेळेचं नियोजन(टाइम मॅनेजमेंट) जरा काटेकोरपणे करून त्यात मुलांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. सर्वप्रथम व सर्वांत शेवटी अधिकाधिक वेळ मुलांसाठी ठेवलाच पाहिजे. सुदैवानं हल्ली कुटुंबात मुलं कमीच(बहुतेक कुटुंबात एकच) असतात. त्यामुळे लक्ष देणं अवघड नसतं पण विशिष्ट वेळ यासाठी राखून ठेवावाच लागतो. काम करणार्‍या पालकांना मुलं सर्वसाधारणपणे सायंकाळीच भेटतात. त्यावेळपर्यंत दिवसभराच्या कष्टानं, केलेल्या वणवणीमुळे शरीर थकून जातं. पण मनाचा उत्साह कायम ठेवला तर मुलांसाठी आवश्यक ती ऊर्जा राखून ठेवता येते. ती ठेवलीच पाहिजे. शिक्षणाशिवायही मुलांचं जग व जीवन आहे हे पक्कं ठरवलं पाहिजे. शिक्षण कमी महत्त्वाचं नाही पण मुलांबरोबरचं आपलं ‘सहजीवन’ अभ्यास, गृहपाठ, क्लासेस, शिकवण्या यामुळे झाकोळून जाणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. आठवड्याच्या शेवटी(वीकेंड) मुलांबरोबरच राहण्याच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. हे करताना मुलांच्या मनाचा कल लक्षात ठेवायला हवा याचं भान ठेवलं पाहिजे. घरातील साध्या साध्या गोष्टीत जी निर्णय घेण्याची प्रक्रिया(डिसिजन मेकिंग) असते त्यात मुलांचा मार्गदर्शित सहभाग (गाइडेड पार्टिसिपेन) असला पाहिजे. मुलांबरोबर गप्पागोष्टी करण्यासाठी, काव्यशास्त्र विनोदासाठी खास वेळ रोज काढून ठेवला पाहिजे. मुलं मोठी होत जातील तशा अनेक मर्यादा या गोष्टींवर पडतील. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या मित्रमंडळाचा (पीअर ग्रुप्स) त्यांच्या अनेक सवयी, निर्णय, आवडीनावडी यावर व एकूणच वर्तनावर खूप प्रभाव किंवा दबाव(पीअर प्रेशर) असतो ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. हल्लीच्या जीवनपद्धतीत वाढत्या वयाच्या मुलामुलींच्या मनावर तर शिक्षक-पालक-इतर वडील मंडळी यांच्यापेक्षा हा प्रभाव अधिक असतो. आईवडिलांनी आपला प्रभाव प्रेम, आपुलकी, कर्तव्यपालन यातून सतत जागता व जिवंत ठेवायला हवा. लहानपणापासून मुलांच्या भावजगताशी व कल्पना किंवा विचार विश्‍वाशी प्रेमानं जोडलेलं राहणं यासाठी अत्यावश्यक आहे. प्रेमानं जाणीवपूर्वक केलेला स्पर्श हा यासाठी जिवंत सेतु आहे. अजून खूप गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळी बघू. एक लक्षात ठेवू या - मुलांची स्वतंत्र व्यक्तिमत्वं असतात. त्यांना गृहीत न धरता त्यांचं हित साधण्याचा संकल्प करू या.

८ मे, २०१२

काही सत्य पालकांसाठी

"आपल्या श्वासोच्छवासापासून आपल्या सगळ्या भावभावना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या वाडीतले काही टप्पे पाह्रच रंजक आहेत .ज्या मुलांचे पालक/शिक्षक त्यांना मोठ्यादा गाणी /गोष्टी म्हणून /वाचून दाखवतात आणि तसचं त्याच्यांशी सतत संवाद साधतात त्या मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होतो . मुल भाषा कशी शिकत आणि त्यात मेंदूची भूमिका काय असते हे तपासायचं ठरवल तर वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जी मुला किमान दोन भाषा शिकतात त्या मुलांच्या मेंदूची रचना एकच भाषा शिकणाऱ्या मुलांच्या मेंदू पेक्षा थोडी वेगळी असते. ज्या मुलांना लहानपणी ताणतणाव भांडण असे वातावरण अनुभवायला लागत त्या मुलांची अध्ययन क्षमता कमी होते . तसेच लहानपणी आपल्या घरात मुलांना प्रोत्साहीत करणारे वातावरण असेल तर शिकण्याची क्षमता २५% नं जास्त वाढते अस संशोधनान सिद्ध झालय." तेव्हा सुजाण पालक हो आता तरी आपल्यला जागे व्हायलाच हवे, लहान मुला / मुली समोर काय बोलावे काय टाळावे ह्याचा बोध व्हायला हवा तसेच जेव्हडं जमेल तसं आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्या पाल्याशी संवाद साधुयात.

१३ मार्च, २०१२

नाते मैत्रीचे पालकांचे मुलांचे

सं वाद तेथेच शक्यव असतो, जेथे निखळ, पारदर्शी, विश्वा्सपूर्ण मैत्रीचे नाते असते. मुलांबरोबर खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल; तर पालकांनी व शिक्षकांनी प्रथम मुलांबरोबर मैत्रीचे नाते जोपासायला हवे. यासाठी कुटुंबाचा आपसातील सुसंवाद आवश्य क आहे; तसेच मुलांचे वय व त्या वयातील मानसिक व शारीरिक वाढीच्या आवश्यचकतेनुसार तो अधिक निकोप व सुदृढ व्हायला हवा.

आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. त्याहीपेक्षा स्वतःचे वय विसरून मुलांबरोबर लहान मूल होऊन निखळ मैत्रीच्या नात्याने संवाद साधतात. मुलांनी उत्साहाने, उत्सुकतेने सांगितलेल्या शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, यश-अपयश याविषयीच्या गप्पा ऐकतात. त्याचबरोबर मुलांचे भावविश्वे, असंख्य प्रश्न्, कुतूहल, त्यांचे भन्नाट स्वप्नविश्व , आकलनशक्ती, अफाट कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींबद्दलचे मुलांचे निकष, भावभावना, स्वतःविषयी व घरातील सदस्यांविषयीचे विचार, अपेक्षा या सर्व गोष्टींमध्ये त्यांना रस असतो. आपली सर्व कामे बाजूला ठेवून केवळ मुलांसाठी ते हवा तेवढा वेळ देतात. त्यामुळेच मुलांनासुद्धा ते अधिक सुरक्षित, हक्काचे, प्रेमाचे, विश्वातसाचे ठिकाण वाटते.

मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वाीत आपणही रममाण होणे आवश्यनक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वा्स आहे) सांगायला हवे. यामुळे एका कार्यसिद्धीसाठी अनेक सोप्या वाटा, उपाय सहजतेने उलगडत गेल्याने चौफेर, व्यापक विचार करण्याची व त्यानुसार प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वाचस वाढवणारी ठरते.

आजी-आजोबांकडून मुलांची कधीही कोणाबरोबर तुलना होत नाही. "तुझे- माझे' "आपले-परके' हा भेदभाव नसतो. तेथे फक्त प्रकर्षाने सहकार्याची, बरोबरीची व आपुलकीची भावना असते. आईबाबांनीसुद्धा आपल्या कार्यबाहुल्यातून रोज थोडा वेळ तरी मुलांसाठी जरूर द्यायला हवा. त्यासाठी त्यांनी आपले करिअर, पैसा, संधी व आव्हाने यामध्ये थोडी तडजोड करून मुलांचे उमलते भावविश्व , स्वप्न, अपेक्षा जाणून घेऊन मदतीच्या भावनेने नियमित व गुणात्मक संवाद साधायला हवा. घरातूनच ही सवय असेल तर घराबाहेरही मुले इतरांबरोबर मैत्री करू शकतील. वाहतुकीचे नियम पाळणे, खोटे न बोलणे, दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी व त्याची सवय स्वतःला असणे, हे कुटुंबातील प्रत्येकाने लक्षात ठेवले तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले अधिक सक्षम होत जातात. आपल्या आनंदात; तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांचे आयुष्य अधिक निकोप, सकारात्मक व प्रगल्भ बनविते.

अनामिक

पालकत्व - पूर्वीचे आणि आत्ताचे

नमस्कार,

सुजाण पालक हो आज बरेच दिवसांनी ब्लॉग वर लिहायला वेल झाला ,आणि एक छानसा लेख आपल्यासाठी




काळ बदलला, त्यानुसार पालकत्वाची संकल्पनाही बदलली आहे. या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा.

"आजकालची पिढी ना खूप बिघडत चालली आहे. आगाऊपणा आणि उद्धटपणा खूप वाढला आहे. कुणाचा धाक म्हणून नाहीये या मुलांना. खूप काळजी करण्यासारखे चित्र आहे.'' अशा प्रकारचे संवाद अनेक ठिकाणी आजकाल ऐकायला मिळतात. घरात, शाळेत सीनियर सिटिझन्सच्या कट्ट्यावर, पालकांच्या मिटींगमध्ये अगदी लग्न समारंभात सुद्धा असे संवाद ऐकायला मिळतात. खरा विचार केला, तर मुले बिघडली आहेत का? असा प्रश्नस पडतो, काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे आजकाल स्वीकारलेच जात नाही. अजूनही "आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो?' यातच मन रमत आहे. "आम्ही कसे आई-वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो' याच विचारात आजकालचे पालक आहेत आणि त्याचप्रमाणे मुलांच्याकडून अपेक्षा करत आहेत, असे वाटते.

पूर्वीचे पालकत्व म्हणजे घरामध्ये कमीत कमी चार मुलांचा ट्रेंड होता. कुटुंब नियोजनाची पद्धत उपलब्ध नव्हती किंवा मुले ही देवाची देणगी आहे, असे समजून होतील तेवढी मुले होऊ द्यायची असा शिरस्ता होता. मग मुले वाढवण्यासाठी पुरेसे आर्थिक बळ, शारीरिक बळ आहे की नाही याचा विचार केला जात नसे. शिवाय एकत्र कुटुंब पद्धती रूढ होती. त्यामुळे बरीच भावंडे, त्यांची सर्वांची मुले एकत्र नांदायची. त्यामुळे मुले आपोआप वाढतात यावर ठाम विश्वावस होता. मुलांना दुखले, खुपले, काही समस्या आल्या, शाळेमध्ये काही समस्या आल्या, तर हे गृहीत धरले जायचे की हे आपापलेच बघायचे. घरामध्ये क्व चित कोणते प्रॉब्लेम्स्‌ घेऊन मुले पालकांपाशी यायची. त्यामुळे घरात पालकांशी संवाद किंवा मुले पालकांशी मोकळेपणाने बोलायला धजावायची नाहीत. वडील कडक किंवा एकतर्फी संवाद करणारे आणि आईची भूमिकाही मुलांना खाऊ-पिऊ घालणे, आजारी असेल तर सेवा-शुश्रूषा करणे एवढीच असायची. कित्येकदा घरामध्ये मुलगा किंवा मुलगी कोणत्या इयत्तेत आहे हेही ठाऊक नसायचे. मुलेसुद्धा शाळा ते घर, घर ते शाळा एवढ्याच परिघात असायची. अगदीच शाळेत काही कार्यक्रम किंवा शाळेच्यावतीने काही क्रीडा, स्पर्धा वगैरे असतील, तर त्यामध्ये मुले भाग घ्यायची. बाकी शाळेतून आल्यावर गल्लीबोळात खेळ खेळायचे हे ठरलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात काय चालले आहे हे बघण्याची पालकांना आवश्यअकता वाटत नसे. मुलांना सहाव्या वर्षी बालवाडीत प्रवेश घ्यायचा आणि फक्त पहिले आठ दिवस मुलांना शाळेत सोडायचे की पुढे मुले आपोआप शाळेत ऍडजेस्ट होतात असा पालकांचा समज असे.

पूर्वी वयात येण्याचा काळसुद्धा उशिराच असे. म्हणजे मुली बाराव्या-तेराव्या वर्षी आणि मुले चौदा वर्षाच्या पुढे वयात येत असत. तेव्हाही पालकांना या गोष्टीची माहिती व्हायचीच असे नाही. मुलींच्याबाबतीत मात्र पालक दक्ष असायचे. वयात आलेल्या मुली मैत्रींणीबरोबर गुजगोष्टी करायच्या. लाजाळूपणा, नम्रपणा, मोठ्यांशी आदरानेच वागणे, लग्नाच्या आणि सासरी जाण्याच्या तयारीने घरातील कामे शिकून घेणे, घरातल्या पुरुषांशी किंवा एकंदर मुलांशी, पुरुषांशी मर्यादेने वागणे हे सर्व गृहीत धरले जायचे. प्रेमप्रकरण वगैरे तर दूरच; पण मुलगी एखाद्या मुलाशी चुकून बोलली, तरी तिला मारणे, कोंडून ठेवणे, घर की इज्जत वगैरे दाखवून देणे असे प्रकार पालकांकडून केले जात.

मुलांच्या बाबतीत घराबाहेर मित्रांबरोबर हिंडणे, चोरून सिनेमाला जाणे, मुलींना चिडविणे, छेड काढणे, शाळेत मारामाऱ्या करणे आणि पालकांकडून क्विचित मार मिळणे ही सर्व वयात येणाऱ्या मुलांची वैशिष्ट्य होती; पण कौतुकच जास्ती असायचे. वंशाचा दिवा म्हणून मुलांना मान मिळायचा, घरातील कोणतेही काम त्यांना सांगितले जात नसे. मुलांना जास्त खाऊ-पिऊ घालणे, मुलींना त्या मानाने अन्न कमी देणे असे प्रकारसुद्धा पालकांच्याकडून घडत असत.

पूर्वी पालक मुलींच्या शिक्षणाबाबतीत अनुत्सुक असायचे. मुलींनी शिकून काय करायचे? चूल आणि मूल हेच अपेक्षित असल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर भर कमी दिला जात असे; मग तिला घरकाम, विणकाम, स्वयपांक या सर्व गोष्टी करण्याची सक्ती होती. मुलीने संसार नेटका करावा या दृष्टीने सर्व काही शिकवले जात असे. मुलींनाही या गोष्टींचा ऍक्सेदप्टन्स होता आणि त्याप्रमाणे सोळाव्या - सतराव्या वर्षी त्या लग्न करायला सज्ज असत.

मुलांच्या बाबतीत शिक्षणाला बऱ्यापैकी महत्त्व होते आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांनी सरकारी नोकरी किंवा बॅंकेत, पोस्ट खात्यात नोकरी करावी यासाठी प्रयत्न असायचे. "एकदा मुलाला चांगली नोकरी मिळाली की आयुष्याचे कल्याण' अशी पालकांची समजूत असे. त्यामुळे शाळेत नापास झाले ,तर पालक बदडून काढण्यासाठी मागेपुढे पाहात नसत.

जसजसे स्त्रियांनी शिक्षण घेण्याचा प्रघात आला, तेव्हा हळूहळू पालकत्व आणि पाल्य यांच्यामध्ये लक्षात येण्याइतपत फरक जाणवू लागला. शिक्षण, नवे तंत्रज्ञान, बऱ्याच गोष्टींची नव्याने ओळख (उदा. मोबाईल, इंटरनेट इ.) जागतिकीकरण, आधुनिकीकरण या सर्वांमुळे आजकालच्या मुलांची बऱ्याच गोष्टींशी ओळख झाली. मुख्य म्हणजे कुटुंब नियोजनाच्या अनेक पद्धती आल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली आणि त्यातूनच "हम दो हमारे दो' असा प्रघात पडला.

आजकाल पालकांना एक किंवा दोन मुले असल्यामुळे आणि एकंदरीतच मुलांचे संगोपन याबाबतीत सर्व पातळीवर जागृती निर्माण झाल्यामुळे पालकांना मुलांकडे लक्ष देणे भाग पडत आहे. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखमीचे झाले आहे. आजकाल मूल जन्माला येण्याआधीच नियोजनाला सुरवात झालेली असते. अगदी गंमतीने असेही म्हटले जाते की, मूल जन्माला येणार असे कळल्यावरच शाळेच्या ऍडमिशन घेण्यासाठी पालकांना धावाधाव करावी लागते. अगदी गर्भसंस्कारापासून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक व्याख्याने, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यामुळे साहजिकच आपले मूल सर्व गुण संपन्न व्हावे या अपेक्षेने पालक या सर्व मार्गांचा अवलंब करतात.

पालकांचे समुपदेशन करताना असेही लक्षात आले आहे की, एकंदर आजकालचे पालक धास्तावलेले आणि आत्मविश्वाेस कमी असलेले जाणवतात. मुलांना हाताळण्यात, त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेण्यात आपण कुठेतरी चुकतो आहोत किंवा कमी पडत आहोत अशीच भावना रुजलेली दिसते. पालकांच्यात अपराधीपणाची भावना, तसेच हताशपणा, मुलांच्या भविष्याबाबतीत केलेल्या महाभयंकर कल्पना (उदा. ः त्याने, तिने अभ्यास केला नाही तर तो /ती वाया जाईल, त्याचे/तिचे करिअरच घडणार नाही / अशा टोकाला लगेच पोचतात) यामुळे पालक त्रस्त असतात. दुसऱ्या बाजूने पालकांचा विचार केला तर पालक आधुनिकीकरणाचा स्वीकार करतानाही दिसतात. जसे मुलांना मोबाईल देणे, घरामध्ये कॉम्प्युटर असणे, शिक्षणाच्या बाबतीत ठाम असणे आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी असणे हे सर्वही कौतुकास्पदरित्या बदलेले आहे.

आजकाल वयात येणाऱ्या, म्हणजे टिनएनर्ज मुलांबद्दल समाजामध्ये बऱ्यापैकी नकारात्मकता निर्माण झाली आहे. एकंदरीत पालक, ज्येष्ठ मंडळी, शाळेतील शिक्षक वर्ग, सर्वच वर्गात एक प्रकारची नाराजी दिसून येते. वयात येतानाचे वयही आता खूप अलीकडे आलेले आहे. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे आजच्या पिढीला अनेक गोष्टींचे एक्पोयजर मिळाल्यामुळे मेंदू लवकर प्रगल्भ होऊन, मुले लवकर पौंगडावस्थेमध्ये प्रवेश करताना दिसतात. आठव्या, नवव्या वर्षीच पौगंडावस्थेतील लक्षणे दिसायला लागतात. अचानक झालेल्या संप्रेरकांच्या बदलांमुळे (कीोपरश्र उहरपसशी) मुलामुलींमध्ये शारीरिक बदल तर होतातच; पण त्याचबरोबर मानसिक, भावनिक, सामाजिक, वैचारिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सर्जनशील, कलात्मक, क्रिडात्मक असे अनेक पातळ्यांवर बदल होतात आणि हे बदल साधारण नवव्या वर्षीपासूनच सुरू होतात आणि साधारण विसाव्या वर्षीपर्यंत चालूच असतात; पण हे वय धड लहान नाही, धड मोठे नाही. त्यामुळे पालक आणि मुले दोघेही संभ्रमात असतात आणि त्यामुळे या पालकांचे वयातील मुलांशी एक प्रकारचे कटुतेचे नाते निर्माण होते आणि याचे मुख्य कारण म्हणजे पाल्यामध्ये होणारे बदल स्वीकारण्याची पालकांची मनापासून तयारी नसते. मुलींच्या बाबतीत हा स्वीकार होतो की मुलगी वयात येते आहे; पण तिची वर्तणूक अजिबात मान्य नसते त्यामुळे पूर्वीच्याच समजाप्रमाणे मुलीला लैंगितेच्या विळख्यातून सोडवले पाहिजे या वयात जपले पाहिजे असाच कल पालकांचा दिसतो.

आजच्या पिढीला सर्व तांत्रिक सोयीसुविधा मिळतात, बंधने कमी झाली आहेत, भरपूर स्वातंत्र्यही दिले जाते. याबद्दल "आम्हाला हे सर्व काहीही मिळत नव्हेत आणि या मुलांना मिळते आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत' असा आरोप या मुलांवर सहजपणे होतो. खरे पाहायला गेलो, तर यामध्ये या मुलांचा काय दोष आहे? किंवा त्यांच्यात जे बदल होतात आणि त्यातून त्यांची वागणूक होते ती जाणून बुजूनच केली जाते असाही पालकांचा गैरसमज होतो. या बदलांशी जुळवून घेणे आणि त्याप्रमाणे स्वतःची प्रतिमा सांभाळणे ही या मुलांच्या दृष्टिकोनातून तारेवरची कसरत असते. त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांचे पालकत्व हे आणखी अवघड होऊन बसले आहे. पालकत्वाचा बाऊ होऊन बसला आहे.

मुलांची नैसर्गिक वाढ मान्य करून पाल्याला नैसर्गिकरीत्या वाढू देणे आणि पालक म्हणून स्वतःवर विश्वािस ठेवून चुकत शिकतच पालकत्व निभावण्यात आनंद आहे, हे आजचा पालकवर्ग हे विसरून गेला आहे. पूर्वीचे आणि आजचे पालकत्व यात निश्चिपतच मोठा बदल झालेला आहे; पण आजकालचे पालक पूर्वीच्या पालकत्वाची तुलना करून मुलांना त्याची जेव्हा जाणीव देतात तेव्हा मुले संभ्रमात पडतात की, त्याचा संदर्भ देणे खरच उचित आहे का? पूर्वीच्या पालकत्वाचे काही फायदे जरूर करून घेणे आवश्यलक आहे; पण त्याचबरोबर पिढीनुसार झालेले बदलही स्वीकारणे तितकेच गरजेचे आहे. आज पालकत्व निभावण्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे समुपदेशनाद्वारे समजून घेणे गरजेचे आहे.

शुभांगी खासनीस, प्रसन्न रबडे