आपल्यायला काय वाटत!आपली मुले चांगली व्हावी,यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आज वयाची ३ वर्ष पूर्ण नाही झाली तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे
२१ ऑगस्ट, २०१३
शाळेची अति घाई-कि आपली सुटका
मुलांना पटापट मोठं करायला निघालेल्या आई-बाबांनो, जरा सबुरीनं.
दीड-दोन वर्षांचं मूल. रडत-भेकत शाळेत जातं.पालकांना वाटतं, मूल लवकर शाळेत गेलं म्हणजे ‘बुद्धिमान’ होईल, लवकर पुढे जाईल,
स्पर्धेत सगळ्यांच्या पुढे राहील. शाळाही त्यांना ‘हुशार’ करण्याचा चंग बांधतात. लेखन, वाचन, पाठांतर. त्यांच्या बोकांडी मारतात.
त्यातून मूल खरंच हुशार होतं?.
झ्या मैत्रिणीनं तिच्या मुलीला शाळेत घातलंय. ती फक्त दीड वर्षांची आहे.’’
‘‘मुलांना लवकरच्या वयात शाळेत घातलं म्हणजे बरं पडतं. त्यांना सवय लागून जाते.’’
‘‘मला आणि त्याच्या बाबांना नोकरीवर जायचं असतं. थोडा वेळ तो शाळेत गेला, म्हणजे आजी-आजोबांना पण सांभाळायला सोपं जातं.’’
‘‘तो खूप रडतो शाळेत जाताना. पण मी तरी काय करू? मला कामावर जावं लागतं.’’
हल्ली अशी वाक्यं खूपच कानावर पडतात. कुठेही जा, एखाद्या गावात, नाही तर शहरात, मुलांना जेवढय़ा लवकर शाळेत घालता येईल तेवढय़ा पटकन त्यांना शाळेत पाठवायचं, असं जणू फॅडच आलंय. दिवसेंदिवस ते वाढतही चाललंय. खूप लहान लहान मुलं अडखळत्या पावलांनी आई-वडिलांबरोबर शाळेची वाट चालू लागली आहेत.
का होतंय असं?
या संदर्भात काही शाळाचालक म्हणतात, ‘आमच्या शाळेत आधी फक्त ‘के.जी.’च होतं. पण पालकांच्या आग्रहामुळे आम्ही ‘मिनी केजी’ आणि त्या आधीच्या
वयासाठी प्ले ग्रुपही सुरू केले.’’ काही शाळाचालक मात्न लहान मुलांना लवकर शाळेत घालण्याचं व्यवस्थित सर्मथन करतात.
.प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मुलांच्या ‘लवकरच्या शाळे’चा विचार करतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, ज्याला/जिला शाळेत घालायचंय, घातलंय, त्यांचा विचार कोणीच करत नाही.
- त्यांना शाळा हवीये का?
- त्यांना शाळा आवडते का?
- त्यांना शाळा झेपेल का?
- ते शाळेत जाऊन नक्की काय करणार आहेत? काय शिकणार आहेत?
- हे आत्ताच शिकणं आवश्यक आहे का?
- आत्ता मारून-मुटकून शाळेत नाही घातलं तर चालणार नाही का?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे दीड-दोन वर्षाचं वय शाळेत जायचं आहे का?
हे प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळायला हवीत.
- असा विचार करताना लक्षात येईल की, आपण पहिल्याच प्रश्नाला अडखळलो आहोत. ‘मुलांना शाळा हवी आहे का?’ या प्रश्नाचं काय उत्तर आहे?
यावर कोणीही म्हणेल की, ‘त्याला काय कळतंय शाळा म्हणजे काय ते? हा विचार आपणच करायचा असतो.’
पण आपण तरी करतो का असा विचार? बहुतेक जण शेजार्यानं, मित्नानं, मैत्रिणीनं, नातेवाईकांनी त्यांच्या मुलांना शाळेत घातलं, मग आपणही घालायला पाहिजे, असा विचार करतात. त्यातूनच मग अशा छोट्यांच्या शाळा जन्माला येतात. त्यात मुलं जायलादेखील लागतात. के.जी.च्या आधी मिनी के.जी. आणि त्याआधी प्ले ग्रुप सुरू झालेत.
मुलांना पटापट मोठं करायला निघालेले आई-बाबा आणि त्यासाठी आपला एक एक वर्ग खाली करणारे शाळाचालक यामुळे मुलांना लवकर शाळेत घालायचं पेव फुटलंय. यात सारासार विचार कोणीच करत नाहीये. आई-बाबा नाही आणि शाळाही नाही. अगदी दीड वर्षाचं असताना प्ले ग्रुपला घातलेलं आपलं मूल पटापट अभ्यास करायला लागणार आहे, अतिशय बुद्धिमान होणार आहे, असं सार्यांनाच वाटतंय का? ही मुलं शाळेत जाऊन नक्की काय करणार आहेत? काय शिकणार आहेत? आणि हे आत्ताच शिकणं आवश्यक आहे का?.
सध्या तर असं दिसतंय की, बुद्धीचा विकास वगैरे जाऊ द्या, मुलांच्या साध्या शारीरिक गरजासुद्धा शाळेच्या या सोसापायी पूर्ण होत नाहीयेत. अशा शाळा बहुतेक सकाळी लवकरच्या असतात. झोपेतून उठवून तयार करून शाळेत पाठवणं, खाणं झालंय की नाही, शी झालीये का नाही याकडे दुर्लक्ष करून भराभर आवरून वेळेत सोडून येणं हेच महत्त्वाचं. कितीही रडत असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून सोडून येणं, शाळेच्या शिक्षकांनी मुला/मुलीचा ताबा घेणं. हे अशा छोट्या-छोट्या मुला-मुलींच्या बाबतीत रोजच्या रोज घडतं. बर्याच मुलांना हे बदल स्वीकारता येत नाहीत. ते रडत राहतात. शिक्षक काही मिनिटं रडणार्या मुलांना घेऊन बसतात. पण सारखं कोण घेऊन बसणार? काही मुलं तर सहा महिन्यांपर्यंत शाळेत सोडलं की रडत राहतात. अगदीच निरुपाय झाल्यावर केव्हातरी रडणं बंद करतात. या सगळ्य़ातून आई-बाबा आणि शिक्षक काय साधतात? यामुळे मुलांच्या मनावर दीर्घकालीन काय परिणाम होणार आहे हे आई-बाबांनी लक्षात घ्यायला हवं.
एकूण काय, तर योग्य वयात मुलांना शाळेत घातलं तर मुलं शाळा एन्जॉय करतील. अवेळी आलेला पाऊस जसं काही रुजवत-मुरवत नाही उलट नुकसानच करतो तसंच अवेळी शाळेत जाणार्या मुलांच्या कोवळ्या मनावर अवेळी शाळेच्या बळजबरीचे ओरखडे उमटल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वीची बालवाडी
मुळात बालवाड्या सुरू का झाल्या? याचा विचार कोणी केला आहे का? आता तर बालवाय़ांमधून मुलांचे खेळ कमी आणि शिकणं जास्त होतं. पूर्वीच्या बालवाड्या आणि आताच्या बालवाड्या यात आता बराच फरक पडलाय. बालवाडीसाठी शब्द होता ‘के.जी.’ म्हणजेच ‘किंडरगार्टन.’ या केजीचा जनक फ्रेडारिक फ्रोबेल. त्यांच्या नजरेसमोरचं किंडरगार्टन काही वेगळंच होतं. किंडरगार्टन म्हणजे मुलांची बाग. मुलांनी इथे येऊन बुद्धीला चालना देणारे खेळ खेळावेत अशी त्यांची योजना होती. त्यासाठी फ्रोबेलनं वयानुसार खेळणी तयार केली होती. त्यात प्रामुख्यानं चेंडूचा वापर केला होता. विविध प्रकारचे चेंडूचे खेळ त्यांनी शोधून काढले होते. मुलं चेंडू खेळण्यातून खूप काही शिकतील, असं त्यांना वाटत होतं. फ्रोबेलनंतर पेस्टॉलॉजी या मानसशास्त्नज्ञानंही फ्रोबेलप्रमाणेच आपली बालवाडी चालवली. फ्रोबेल यांच्या मूळ कल्पनांना त्यांनी धक्का लावला नाही. यानंतर मुख्य आणि आपल्याला माहीत असलेलं नाव येतं ते ‘मॉन्टेसरी’चं. मॉन्टेसरी मॅडम यांना वाटायचं की, मुलांच्या बुद्धीला योग्य प्रकारे चालना देण्याचं हेच वय आहे. मुलं खेळ खेळण्यातून काही नवं शिकतील हे त्यांनी बघितलं. खेळताना मुला-मुलींना आवर्जून स्वातंत्र्य दिलं. सगळ्या मुलांना एका वेळी एकाच प्रकारचा खेळ खेळायचा असेल असं नाही. त्या क्षणाला जे खेळायचं आहे ते त्यानं निवडणं, त्याला वाटेल तितका वेळ त्यानं ते खेळणं आणि खेळून झाल्यावर जागेवर ठेवणं यातून खेळ, अभ्यास, शिस्त लागेल हे त्यांनी बघितलं. यातलं महत्त्वाचं काय तर, या तिघांनीही ‘मुलांचं वय लक्षात घेऊन खेळ’ हाच महत्त्वाचा मुद्दा मानला. खेळातून बुद्धीचा विकास होईल हे बघितलं.
आताची बालवाडी
पूर्वीच्या बालवाडीच्या तत्त्वाशी तुलना करता आजच्या बालवाड्यांमध्ये काय दिसतं? तर बुद्धिविकासाच्या दृष्टीनं पूर्ण विरोधी असणारं लेखन, वाचन, पाठांतर असा चक्क ‘अभ्यास’च शाळाशाळांमध्ये सुरू झाला आहे. या अभ्यासामुळे मुलं लवकर लवकर शिकतील, लवकर पुढे जातील, स्पर्धेत पुढे राहतील असं पालकांना वाटतं, पण होतं ते नेमकं याच्या उलट. लवकर, नकळत्या वयात शाळेत टाकल्यामुळे ते शाळेलाही लवकरच कंटाळणार आहेत. म्हणजे जे आई-बाबांना हवंय, त्याच्या नेमकं उलट होण्याची शक्यता. कारण चार ते सहा ही बालवाडीत जाऊन खेळायची वर्षं आहेत. सहा वर्षं पूर्ण झाली की पहिलीत प्रवेश घ्यायचा. ही पद्धत योग्य आहे. कारण या वयात मूल आपल्या विश्वातून थोडंसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचं सामाजीकरण होण्याची प्रक्रि या चालू असते. मुद्दाम शाळेत घातलं नाही तरी मित्न-मैत्रिणींकडे ओढा वाढणार असतो. बाहेरच्या वातावरणात जाऊन छोटे खेळ खेळणं आवडणार असतं. आपल्या नेहमीच्या सवयीच्या भाषेतली गाणी साभिनय म्हणणं, गोष्टी ऐकणं यातला रस वाढणार असतो. त्या नेमक्या वयात त्याच्यासमोर अतिशय आनंदाच्या वातावरणात बुद्धीला चालना देणारं जर काही ठेवलं तर त्याच्या मेंदूत सकारात्मक बदल घडतील. घरापेक्षा वेगळ्य़ा ठिकाणी, पण आनंदी वातावरणामुळे त्याच्या मनावर अन् भावनांवरही चांगले परिणाम होतील.
‘स्वार्थी’? - आई?
राध्याच्या शाळेचं कसं होणार बाई आता?
- असा प्रश्न पडला असेल का ऐश्वर्या रायला?
‘ऐश्वर्या ढुंढ रही है आराध्या के लिए स्कूल’ अशा ब्रेकिंग न्यूज आपण मध्यतंरी टीव्हीवर पाहिल्या. हे कमीच म्हणून त्यात असाही उल्लेख होता की, शिल्पा शेट्टीचा मुलगा विवानही आता शाळेत जायला लागला. (म्हणून तर तिला डान्स शो, आयपीएलसाठी वेळ मिळतो म्हणे.)
आणि.
आपल्या आमीर खानची बायको किरण, मोठी दिग्दर्शिका. तिचा मुलगा आझादही झाला की, दीड वर्षाचा. तोही आता जायला लागला शाळेत. (त्यामुळे आता किरणला वेळ मिळणार आणि ती पुन्हा झडझडून कामाला लागणार असल्याचे कळते-समजते. टीव्हीच्या बातम्यांवरून.)
मग आराध्या तर दोन वर्षाची होईल नोव्हेंबरात.
अजून ती शाळेत जात नाही, मागे तर नाही पडणार ती इतरांच्या तुलनेत?
- असं वाटत असेल का आजी-आजोबा बच्चन, बाबा बच्चन आणि आई बच्चनला.?
- त्यांना काय वाटत असेल ते त्यांचं ते जाणोत.
पण आपल्यातल्या सामान्य आया.? त्यांना सगळ्याची घाई.
साधारण एकाचवेळी झाली बाळंतपणं तर, झालीच स्पर्धा सुरू. तिचं मूल पालथं पडतं आपलं अजून नाही, अमकीचं बाळ सहाव्या महिन्यातच बसायला लागलं, तमकीचं चौथ्यातच सरकायला लागलं.
धड मान धरता येत नाही त्या बाळांना स्वत:ची, पण इकडे आयांची स्पर्धा सुरू. काही ‘शहाण्या आणि जागरूक’ आया तर इंटरनेटवर ऑनलाइन मुलांच्या प्रगतीचे ‘माईलस्टोन’ तपासत आपल्या बाळाला जन्मत:च जागतिक स्पर्धेत उभं करतात, वजन-उंची-अँक्टिव्हिटीची जागतिक स्पर्धाच सुरू करून टाकतात.
मूल मोठं व्हायला लागतं तशी स्पर्धा वाढते आणि जेमतेम दीड वर्षाच्या मुलासाठी शाळेचा शोधही सुरू होतो. ‘पटापट शिकेल गं सगळं आणि तेवढाच दोन तास आराम आपल्याही जीवाला.’ असं म्हणत मूल दीड वर्षाचं झालं की टाकतात त्याला एखाद्या इंग्रजी ‘प्ले स्कूल’मध्ये.
लगेच सुरू स्टँडिंग लाइन-स्लिपिंग लाइनची स्पर्धा.
वह्या-पुस्तकं-युनिफॉर्मचं ओझं आणि ते घेऊन व्हॅनमध्ये बळजबरी कोंबलेलं, भेदरलेलं-भोकाड पसरलेलं मूल. इतर आयांच्या तुलनेत आपण पुढं राहावं. आपलं मूल आपलं ‘प्रगतिपुस्तक’ बनावं. आणि त्यासाठी त्या बाळानं करावी सुरुवात स्वत:ला सिद्ध करायला.
एवढी ‘स्वार्थी’ असते आई.?
विचारावं स्वत:ला आपणच.!
डॉ.श्रुती पानसे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा