१८ ऑगस्ट, २०१०

मूल वाढवायचे म्हणजे काय ?

मूल वाढवायचे म्हणजे काय? चांगला पालक व्हायचे म्हणजे काय? मुलाला स्पधेर्चा घोडा न बनवता फुलवायचे म्हणजे काय? त्याचे परिसराशी नाते जोडायचे म्हणजे काय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हवे आहे बालभवन. आज पालक सुजाण होण्यासाठी गरज आहे ती त्यांच्या प्रशिक्षणाची. मूल जसे गरिबीत बिघडू शकते तसे आणि तितकेच ते समृद्धीतही बिघडू शकते. आपण सर्वांनी उद्याची ही पिढी 'नॉर्मल' बनवायला हवी...
...............

एखादं मूल पुरेसं बोलत नाही, इतरांशी मैत्री करत नाही, कधी वय वाढलं तरी चालू शकत नाही, मनानं अस्वस्थ आहे, घरी आई-वडिलांचं न पटण्याचा गंभीर प्रश्न आहे, शाळेत मागे पडत आहे, अशा समस्या जाणवून बऱ्याचदा मुलांचे डॉक्टर्स मुलांना 'बालभवना'त पाठवा, असा सल्ला पालकांना देतात. अशा मुलांना आम्हीही बालभवनात लगेच सामावून घेतो आणि बऱ्याचदा त्यांचे प्रश्न काही काळातच सुटतात. बरोबरच्या २०-२५ मुलांच्यात रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं, त्यांची भाषा कानावर पडणं, अनेक आनंददायक उपक्रमात सामील होणं, या सगळ्याने खूप मदत होते प्रश्न सुटायला.

जेव्हा असं जाणवतं की प्रश्न मुलांचा नाही, त्यांच्या पालकांचाच आहे, तेव्हा त्यांनी समुपदेशकाकडे जायलाच हवं, असा आग्रह आम्ही धरतो.

चार वर्षांची मुलगी हाका मारल्या तरी जेवायला येत नाही, म्हणून रागानं तिच्या गालाला गरम उलथनं लावणारी आई होती, घरातल्या आई-वडलांच्या भांडणात मिटून गेलेली आणि चित्र रंगवताना कायम काळाच रंग वापरणारी मुलगी होती. घरीदारी 'हा वाईट मुलगा आहे' असा शिक्का बसलेला आणि त्यामुळे वस्तूंची तोडफोड करणारा, शिव्या देऊन थुंकणारा मुलगा होता, सहलीला यायला उशीर झाला, बस निघून गेली म्हणून राग असह्य होऊन रस्त्यातच मुलाला लाथाबुक्क्यांनी मारणारी आई होती.

कधी मुलांच्या चित्रांमधून, कधी त्यांच्या वेगळ्या वागण्यामधून तर कधी पालकांच्या वागण्या-बोलण्यातून प्रश्न जाणवतात. त्यांच्यावर जेवढ्या लवकर उपाय होतील, तेवढे ते मुलाच्या हिताचं असतं. कारण मूल फार भरभर वाढत असतं. कुठलेतरी प्रश्न , अस्वस्थता, विकृती घेऊन ते वाढलं तर त्याच्या सबंध आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलाचं दुसरं नाव 'आज' आहे, असे म्हणतात. त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच मुलाशी ज्यांचा ज्यांचा संबंध येतो, त्या सर्व प्रौढांना या प्रश्ानंची समज असायला हवी. आमच्याकडे मुलांचे काहीच प्रश्न नाहीत, असे शाळांनी म्हणू नये तर हे प्रश्न समजण्याची दृष्टी सर्व शिक्षकांना द्यायला हवी. त्या मुलाची, त्याच्या चमत्कारिक वागण्याची, त्याच्या पालकांची चेष्टा न करता त्यांना खूप मनापासून शक्य ती सगळी मदत करायला हवी.

कित्येकदा असं आढळतं की पालकांशी मोकळेपणाने बोलल्यानेही त्यांना खूप मदत होते. आपण पालक म्हणून कसे आहोत, कसं असायला हवं, याबद्दल बोलायला लागतं, आपलं मूल कसं आहे, ते त्यांना समजून सांगावं लागतं, आपलं घर आज मुलांना काय देत आहे, याबाबत पालकांची जागरूकता संवादातून वाढवावी लागते. मुलांशी चांगला संवाद कसा करावा, याची पथ्ये शिकवावी लागतात. मुलांकडे दुर्लक्ष न करणं, त्यांना धमक्या न देणं, त्यांची इतरांशी तुलना न करणे, त्यांचे निर्णय परस्पर न घेणं, त्यांच्यावर शिक्के न मारणं, त्यांना न रागावणं, मारणं टाळणं अशी कितीतरी पालकत्वाची कौशल्ये अंगवळणीच पाडावी लागतात. पालकांनी स्वत:चं आणि मुलांचं जग मोठं करण्याची गरज असते. याची जाण आली तर प्रश्न सुटायला मदत होते. आपण कुठे चुकतो हे पालकांच्या लक्षात येतं. मुलं लहान असताना पालकांना हे पालकत्वाचं शिक्षण देणं ही जाणत्या माणसांची मोठी जबाबदारीच आहे. त्यातून खूप मुलांचा समस्यांपासून बचाव होईल. पालक शिक्षणाचं हे काम नुसती विविध विषयांवर भाषणं देऊन होत नाही हे शाळांनी लक्षात घ्यायला हवं. हे कौशल्याचं शिक्षण आहे. त्यामुळे त्यासाठी बालवाडीच्या वयापासून पालकांसाठी अभ्यासक्रम आखायला हवेत. तरच मुलांना त्याचा उपयोग होईल.

आजचे तरुण पालक असे आहेत की त्यांचा स्वत:चा जन्म स्वतंत्र कुटुंबात झाला आहे. स्वत:ला मूल होईपर्यंत त्यांनी लहान मूल हाताळलेलं नाही सांभाळलेलं नाही. घरात मोठी माणसं नाहीत. त्यामुळे मूल ही त्यांना न पेलणारी जबाबदारी वाटते. त्यातच नवरा-बायकोचं पटत नसेल तर अधिकच ताणातून कुटूंब जात असतं. आज कित्येक घरं अशी आहेत, की त्यातले बाबा कामानिमित्त दूरगावी किंवा परदेशात असतात. कधी आईपण अशी लांब गेलेली असते. याचा घरातल्या माणसांवर मुलांवर अतिरिक्त ताण असतो. सतत अस्वस्थ असलेल्या मोठ्या माणसांच्या सहवासात मुलांनी मग लवकर मोठं होण्याची अपेक्षा असते. बालपण जसं गरिबीत हिरावलं जातं. तसं ते आथिर्क संपन्नतेतही हिरावलं जातं. तो निवांतपणा, ती मोकळीक, चुकलं तर चुकलं जाऊ दे असं प्रेमानं म्हणणारी मोठी माणसं या सगळ्या बालपणाच्या गरजाच आहेत. चार खेळणी कमी मिळाली तर काही बिघडत नाही. मुलं कशातूनही खेळ शोधून काढू शकतात. पण पालकांच्या मनाचं स्वास्थ्य फार फार महत्त्वाचं आहे.

घरं लहान, खेळायला मुलं नाहीत, मित्र नाहीत, सर्व दारं बंद अशा सोसायट्यांमध्ये असंख्य मुलं आज गुदमरत आहेत. आई-वडील त्यांच्या नोकरी-व्यवसायात बांधले गेलेले. मग कुणावरतरी मुलं सोपवायची! पाळणाघर ते शाळा. पाळणाघर ते ग्राऊंड. पाळणाघर ते क्लास अशी मुलं दिवसभर फिरवली जातात. एक मूल 'मला बालभवनात नाही जायचं' म्हणून कळवळून रडायचं. त्याची आई मला हा माझाच दोष असा ठपका मनात बाळगून भांडायला आली. त्याचा दिनक्रम पाहिला तर ते मूल सकाळी सहा वाजल्यापासून घराबाहेर असायचं. त्याला आई-वडील भेटायचेच नाहीत. पाळणाघर-शाळा-क्लास हे चक्र संपलं की त्याला घरी जावंसं वाटलं तर त्याची काय चूक? त्याला 'खरंच सध्या बालभवनात पाठवू नका' अशी मी त्या आईला विनंती केली. त्याला आई हवी होती. ती मिळाल्यावर त्याचा प्रश्न आपोआप सुटला.

पालकांच्या बेबंद अपेक्षांपासूनही मुलांचा बचाव करायला हवा आहे. मला माझ्या मुलाला क्रिकेटिअरच करायचा आहे. माझी मुलगी नृत्यांगना व्हायलाच हवी, मुलाला स्केटिंगला घातलं की, त्यानं सुवर्णपदकच मिळवायला हवीत. चौथ्या वर्षापासूनच खरोखर अशा व इतक्या 'स्पेशलायझेशनची' गरज आहे का? महत्त्वाकांक्षी पालकांना वाटतं 'बालभवन'मध्ये २० मुलांच्यात 'जनरल' शिकून काय होणार? पण मग आपली मुलं मातीत, वाळूत, पाण्यात कधी खेळणार? ती इतरांशी मैत्री कधी करणार? स्वत:च्या हातांनी नवनव्या गोष्टी करायचा आनंद ती कधी मिळवणार? ती शेती कधी करणार? आज शहरी आयुष्यात मुलांना एका बंदिस्त कोशात आपण वाढवतो आहोत. स्पधेर्त धावणारी घोडी आपण तयार करतो आहोत. इतरांकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही, इतरांसाठी काही करायचं नाही, घरातली साधी साधी कामं त्यांनी करायची नाहीत. काय होईल मोठेपणी अशा मुलांचं? त्यांच्या भविष्यात मानसिक अस्वास्थ्य तर लिहून नाही ना ठेवलं जात?
गरीब वस्त्यांमधली मुलं 'बालभवन'मध्ये खेळताना आम्ही पाहतो. तेव्हा १४-१५ व्या वर्षी एखाद्या मुलीचं लग्न झालं की खूप वाईट वाटतं. तिच्या आईची असहायता दिसत असते. वर्षभरात या खेळणाऱ्या-बागडणाऱ्या मुलीला मूल होतं. नंतर येऊन जेव्हा ती सांगते की बालभवनातला काळ तिच्या आयुष्यातला सर्वांत चांगला काळ होता. छान खेळता आलं. वाचता आलं. अजूनही ती कधी सुटीच्या दिवशी येऊन बालभवनात खेळू शकते. आई म्हणून ती मुलाचा वेगळा विचार करते. मुलांच्या गाण्यांकडे, गोष्टींकडे, खेळाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहते. तेव्हा लक्षात येतं की बालपणातला आनंद सुजाण पालकत्वालाही जन्म देत असतो.

घरात आणि शाळेत बसून बसून आणि बसूनच राहून मुलांना धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत, कोलांटीउडी मारता येत नाही. त्यांच्या शरीराचा लवचिकपणा तिसऱ्या वर्षापासूनच कमी होतो आहे. त्यांच्या आहाराचा विचार करायला पालकांना वेळ नाही. सहलीला खाऊ म्हणून मुलं तयार वेफर्सची मोठाली पाकिटं आणतायत. टीव्ही व कॉम्प्युटर हेच त्यांचे मित्र. त्यांच्याशी गप्पा मारायला कुणाला वेळ नाही. अशा वातावरणात मुलं विकृत झाली नाहीत तरच नवल!

शोभा भागवत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा