१९ ऑगस्ट, २०१०

बालस्वातंत्र्य

बालस्वातंत्र्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीरपणे समजून घेऊन विचार करण्याचा आहे. राष्ट्राच्या विकासासाठी योग्य समाज निर्माण करण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर आहे. वैचारिक देवाणघेवाण साधण्यासाठी अभ्यासगट, चर्चासत्रं, शिक्षणतज्ज्ञांचं या विषयावरील लिखणाचं वाचन आणि त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे.
शिक्षक, पालकच नव्हे तर एकूणच समाज निरागस, सहज उमलणाऱ्या बालकांवर स्पधेर्ची भीती आणि सक्तीचा बडगा दाखवून त्यांच्या नैसगिर्क प्रवृत्ती आणि क्षमता यांचं खच्चीकरण करत असतात. त्याला आवर घालण्याचा हा एक प्रयत्न आहे.

बालकांना स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कोणी समजून घेत नाही. त्याचं महत्त्व कोणी लक्षात घेत नाही. आजचा बालक हा भावी काळातील नागरिक बनणार असतो. त्याला स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्यायचे असतात. येणाऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड द्यायचं असतं. सृजनशील नागरिक बनण्यासाठी त्याच्या अंगात असणाऱ्या सर्व क्षमतांचा विकास व्हायला हवा आणि हा विकास छडी लागे छमछम या पद्धतीने किंवा घोकंपट्टी करून आणि केवळ परीक्षाथीर् बनून घडणार नाही. तात्पुरता त्याचा परिणाम चांगला दिसला तरी तो चिरकाल टिकणारा नसतो आणि म्हणूनच तो निरुपयोगी ठरतो.

माणसाचा भविष्यकाळ त्याच्या बाल्यातून आकारास येत असतो. त्याच्या हिताच्या दृष्टीने येणाऱ्या पिढीचं जतन करणं, तिची जोपासना करणं आणि नवजीवनाला तिला तयार करणं हे प्रत्येक प्रौढ पिढीचं आद्यकर्तव्य आहे. संपूर्ण प्राणीविश्वात माणसाचं मूल सर्वात जास्त काळ परावलंबी असतं. ही नैसगिर्क गोष्ट लक्षात घेऊन त्याचं संरक्षण करणं, त्याला फक्त आवश्यक ती मदत देऊन ते लवकरात लवकर नैसगिर्करित्या स्वावलंबी कसं बनेल, याचा विचार कुटुंबाने करायला हवा. बालकाला स्वावलंबी करण्याच्या प्रयत्नात त्याचं बालपण हरपणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. लहान मुलं ही मोठ्या माणसाची छोटी आवृत्ती असते म्हणजे शक्तीने, ज्ञानाने व अनुभवाने लहान असलेल्या बालकाला मोठ्यांप्रमाणे संपूर्ण शरीर, संपूर्ण मन, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती असणं याची दखल आपण घेतली पाहिजे. त्याला लाभलेल्या उपजत बुद्धिमत्तांचा शोध घेण्यासाठी त्याला अनुभवयुक्त शैक्षणिक संधी मिळवून देणं म्हणजे खऱ्या अर्थाने बालकाचं संगोपन करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

प्रत्येक मुलाची क्षमता, त्याचे कल, त्याची गती भिन्न असल्याचं लक्षात घेऊन जात, धर्म, वर्ग, लिंग आदी त्यांना मिळणाऱ्या संधीच्या आड येता कामा नयेत, याचाही विचार व्हावा. बालकांमधील लहरीपणा, हट्टीपणा, एखाद्या गोष्टीचा बाऊ करणं अशी लक्षत काही मुलांमध्ये दिसतात. पण ते त्यांचं व्यक्तित्व नसतं,हे लक्षात घ्यायला हवं. त्याला अशा गोष्टींपासून दूर ठेवायला हवं.


ताराबाई मोडक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा