रवींद्रनाथ टागोर हे जसे ‘विश्वकवी’ होते तसेच ‘गुरुदेव’ही होते. रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्त्व तसं बहुरंगीच होतं. जन्मत:च ते मनाने कवी होते. आणि म्हणून निसर्गाचं जणू त्यांना वेडच होतं. त्यांच्या या सौंदर्यवेडातूनच शब्दांची जुळवाजुळव सुरू झाली. हळूहळू त्या शब्दांमध्ये नाद भरू लागला, ताल येऊ लागला. लवकरच त्यातून कविता अवतरली. लहान वयातच ते भराभर कविता लिहू लागले. रवींद्रनाथ विश्वकवीच ठरले. परंतु रवींद्रनाथांचा हा विकास किंवा प्रवास तथाकथित शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून घडला नाही. निसर्गाच्या उघडय़ा शाळेतूनच ते पुष्कळ शिकले आणि आपल्या या अनुभवातूनच रवींद्रनाथांची स्वत:ची अशी एक शिक्षणदृष्टी किंवा विचार निर्माण झाला.
१९०१ साली रवींद्रनाथांनी ‘शांतिनिकेतन’ नावाची आपली शाळा सुरू केली. त्यांचं हे ‘शांतिनिकेतन’ होतं कलकत्त्यापासून लांब, मोकळ्याढाकळ्या माळावर शाल वृक्षांच्या सावलीत. ही शाळा काढताना ते म्हणाले होते, ‘माझी ही शाळा म्हणजेसुद्धा एक काव्यच आहे! त्याला कदाचित शब्दांचं माध्यम नसेल, ते निर्जीव, रूक्ष कागदावरही लिहिलेलं नसेल, परंतु ते एक जीवनाचं काव्य असल्याकारणानं जीवनाच्या माध्यमातून आणि संपूर्ण जीवनासाठी लिहिलेलं असेल!’ ज्याला आपण पालक किंवा शिक्षक मंडळी शिक्षण- शिक्षण म्हणतो, त्या शिक्षणाबद्दल रवींद्रनाथांना कधीच प्रेम, आपुलकी आस्था वाटली नाही. त्याची उपयुक्तताही पटली नाही. या असल्या औपचारिक शिक्षणामुळे माणूसही औपचारिक बनतो, कृत्रिम होतो व निखळ मनुष्यत्व गमावून बसतो. त्या काळच्या शाळा म्हणजे तर कोंडवाडेच होते. आजही असे कोंडवाडे अनेक ठिकाणी आहेतच. या कोंडवाडय़ातून वेळापत्रकाप्रमाणं चालणारा ठराविक अभ्यासक्रम रवींद्रनाथांना कधीच आवडला नाही. त्यांनीच म्हटलं आहे, ‘नाजुक फुलांवर ऊंचावरून होणाऱ्या जोरदार गारांच्या वर्षांवाप्रमाणं आमच्यावर पाठांचा मारा होत असे आणि वस्तुसंग्रहालयातील निर्जीव चित्रांप्रमाणे आम्हाला तो गुपचूप बसून सहन करावा लागत असे.’ ‘या शाळा निसर्ग आणि वास्तव जीवन यांपासून फार फार दूर असत. शिक्षण आणि जीवन यात भक्कम भिंतच उभी असे! वर्गातील साहित्य, अध्यापनपद्धती आणि एकूण सर्व वातावरणच मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तींच्या विरुद्ध असे. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक शक्तीवर आणि उत्साहावर पाणी पाडलं जात असे. ती शक्ती आणि तो उत्साह दडपून टाकला जात असे.’ रवींद्रनाथांनी अशा शाळा आणि त्यातील शिक्षण यांच्याविरुद्ध जणू बंडच पुकारले आणि ‘शांतिनिकेतन’ ही एक अभिनव मोकळीढाकळी शाळा काढली. मुलं म्हणजे उत्साह, आनंद यांचा कंद आणि चैतन्याचा सळसळता कोंभ असतात, हे रवींद्रनाथांनी स्वानुभवावरून जाणलेलं होतं. म्हणून मुलांची शाळा आणि तिथलं शिक्षणदेखील आनंदमय व चैतन्यदायी असायला हवं, असा त्यांचा आग्रह होता. त्यांची बालकांकडे बघण्याची दृष्टी किंवा बालमानसशास्त्र हे बालकाबद्दल त्यांना वाटणाऱ्या अथांग प्रेमावर आणि उदंड सहानुभूतीपूर्ण वात्सल्यावर आधारलेलं होतं. रवींद्रनाथ म्हणत असत, ‘बालक म्हणजे मानवी जीवनाच्या वेलीवर उमलणारी फुलंच! त्यांना जितका मोकळेपणा व स्वातंत्र्य मिळेल तितकी ती प्रफुल्लित आणि टवटवीत बनतील. या स्वातंत्र्यामुळंच बालांना आनंदाचा आणि सौंदर्याचा रसास्वाद घेता येतो. बालकांचं कोवळं मन त्यांच्या अवतीभवतीच्या वातावरणातून उत्तमोत्तम संस्कार टिपण्यासाठी सतत जागृत आणि उत्सुक असतं. बालांना प्रौढांनी, म्हणजे पालकांनी किंवा शिक्षकांनी ज्ञान भरवण्यापेक्षा ते त्यांचं त्यांनीच आपल्या विविध प्रकारच्या धडपडीतून मिळवणं, हे रवींद्रनाथांना फार फार उपयुक्त वाटत असे.’
निसर्ग हाच एक मित्ररूप शिक्षक आहे. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:च्या प्रयत्नानं मुलं रममाण होऊन जेवढं काही चांगलं शिकू शकतील आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतील, तेवढं शिक्षण आणि विकास अन्य कुठल्याही मार्गाने होऊ शकत नाही. रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतन या शाळेविषयी पु. ल. देशपांडे यांनी आपल्या एका व्याख्यानात रवींद्रनाथांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन फार चांगल्या रीतीनं विशद केलेला आहे. ते म्हणतात, ‘ज्ञान हा केवळ पुस्तकाकडून पुस्तकाडं चालणारा व्यवहार नसून ज्ञानाची आणि कर्माची सारी इंद्रियं ज्यामुळं चैतन्यमय होतील अशी शिक्षणपद्धती या देशात आल्याशिवया इथं प्रगती, प्रबोधन, संस्कृती, स्वातंत्र्य वगैरे कल्पनांचा खरा अर्थच लोकांना कळणार नाही. एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला येणाऱ्या माणसाची त्या वृक्षाकडून फूल, फळ व छाया लाभावी अशी अपेक्षा असते. तसलीच इच्छा धरून विद्यार्थी शाळेकडं आला तरच शिक्षणाला काही अर्थ आहे, हे रवींद्रनाथांनी ओळखलं, निर्मितीक्षम प्रतिभा, चिंतन, व्यासंगानं सबल झालेली प्रज्ञा आणि अनेक प्रकारच्या माणसांच्या स्नेहातून, त्यांच्या सुख-दु:खाच्या कथा ऐकून मनात उपजलेलं प्रेम आणि करुणा या साऱ्या गुणांच्या समन्वयातून रवीन्द्रांची शाळा जन्माला आली.
रवींद्रनाथांचा आग्रह मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे, असा होता. स्वत:च्या भाषेतून मुलांना आपले विचार जेवढे नीटनेटके आणि स्पष्ट मांडता येतात, तेवढे परकीय भाषेतून येत नाहीत. परकीय भाषेमुळे त्यांच्या अभिव्यक्तीत अनंत अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम त्यांच्या विकासावरही होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही होतो. त्यांची अभिव्यक्ती कुंठित बनते. म्हणून परकीय भाषेचं आकर्षण टाळून मातृभाषेतूनच मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. ‘शांतिनिकेतन’ म्हणजे रवींद्रनाथांची शिक्षणविषयक कल्पनांची प्रयोगभूमीच होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर स्वातंत्र्य व भरपूर आनंद कसा मिळेल, याचीच दक्षता घेतली जात असे.
‘अमूक एक गोष्ट करा’, असं रवीन्द्रनाथ मुलांना कधीच सांगत नसत. ‘आपण काय करायचं’ हे मुलंच ठरवीत असत. याबाबत त्यांचा मुलांवर फार फार विश्वास होता आणि त्यांच्या या विश्वासाला मुलंही तेवढय़ाच विश्वासूपणानं प्रतिसाद देत असत. शिस्तीचे प्रश्न कधी कधी उपस्थित होत असत, पण ते सोडवण्यासाठी मुलांचंच न्यायमंडळ होतं. रवीन्द्रनाथांनी कधीच कोणाला शिक्षा केली नाही. एकदा काही विद्यार्थी वर्गातील नेहमीच्या तासाला हजर नव्हते. त्यांच्याविरुद्ध शिक्षकांनी तक्रार केली. त्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात समरस करून घेण्यासाठी रवीन्द्रनाथांनी एका नाटकाच्या प्रयोगात त्यांना सहभागी करून घेतलं. शांतिनिकेतनमधील दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीताच्या मधुर आलापात होत असे. बहुतेक सर्व गीतांची रचना रवीन्द्रनाथांनीच केलेली होती. त्यातून मुलांना आत्मिक व मानसिक आनंद भरभरून मिळत असे. शाळेतील सर्व वातवारणच नृत्य, नाटय़, चित्र, संगीत यांनी चैतन्यमय होत असे. शिक्षण ही एक आनंदयात्राच आहे, अशीच आनंदयात्री रवीन्द्रनाथांची श्रद्धा होती. एकूणच रवीन्द्रनाथांचे शिक्षणविषयक विचार हे मुलांना आयुष्यभरातून येणाऱ्या अनुभवातून घडविण्यास हातभार लावणारेच आहेत आणि ते आजच्या शिक्षण पद्धतीतही जसेच्या तसे लागू पडतात. त्यांच्या विचारांची कास धरली तर नक्कीच आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण, सर्जनशील नागरिक म्हणून चमकू शकतो अन् अशा विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. रवीन्द्रनाथांच्या मते, शिक्षक हा सहानुभूतीपूर्ण, प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांला घडविणारा असावा व स्वत: आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची कास धरणारा असावा आणि म्हणूनच ते म्हणत की,
“A lamp can never light another lamp unless it cantinues to burn its own flame.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा