२० ऑगस्ट, २०१०

मेंदू क्रांती

अनादी काळापासून मानवाच्या मेंदूत अनेक बदल होत गेले. शास्त्रज्ञांच्या म्हण्यानुसार मेंदूची क्षमता अफाट असून त्याचा वापर मात्र माणूस शंभर टक्के करुन घेत नाही असे लक्षात आले आहे. बालकाच्या मेंदूची वाढ ही पहिल्या तीन वर्षात सर्वात अधिक होते. त्यानंतर वाढीचा वेग कमी होत दहाव्या वर्षापर्यंत स्थिरावतो.
सर्वसाधारण समज आहे की बाळाचे भाषिक ज्ञान शाळेत गेल्यावर सुरु होते परंतु हे खरे नाही. जन्मापासून त्याचे पालक आणि नातेवाईक जेव्हा बाळाशी बोलतात, संवाद साधतात, खेळतात, चित्र काढायला शिकवतात, तेव्हापासूनच 'ब्रेन स्टीम्यूलेशन' चालू होते. लहान बालकाची माहिती साठविण्याची क्षमता नॅशनल आर्काइव्जपेक्षा दसपट असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू अभ्यासक डॉ. ग्लेन डोमन http://www.internationalparentingassociation.org/Early_Learning/accelerate.html ह्या साईटवर म्हणतात लहान बालकांची शिकण्याची क्षमता अति प्रचंड प्रमाणात असते. वाढत्या वयानुसार ती कमी होत जाते. जसे की एक वर्षाच्या बालकाची शिकण्याची क्षमता सहा वर्षापेक्षा अधिक असते. डॉ. डोमन ह्यांनी नवजात शिशू ते दहा वर्षांच्या बाळांचा विशेष अभ्यास केला त्यासाठी ते जगभर फिरले. त्यात त्यांनी मानसिक अपंग आणि अर्धांगवायू झालेल्या बालकांना त्यांचा खास असा 'ब्रेन डेव्हलपमेंट' प्रोग्रॅम नुसार प्रशिक्षण दिले. आणि काय आश्चर्य त्यातली बहुतेक मुले वाचायला, बोलायला, खेळायलाही शिकली. आपल्या ह्या संशोधनाचा सर्वांना फायदा व्हावा म्हणून डॉ. डोमन ह्यांनी फिलाडेलफिया मध्ये १९५५ साली THE INSTITUTES FOR THE ACHIEVEMENT OF HUMAN POTENTIAL® (http://www.iahp.org/) ह्या संस्थेची स्थापना केली. आज त्यांचे कार्य जगभर पसरले आहे.
प्रत्येक पालकांना वाटते आपल्या बाळाची हुशारी वाढवायची कशी ? त्यासाठी आधी मेंदूचे कार्य आणि वाढ समजावून घेऊ या. गर्भाशयात मेंदूची बांधणी चालू असतांना प्रत्येक मिनीटांना २,५०,००० नवीन 'न्यूरॉन्सची' निर्मिती होत असते. ही निर्मिती जन्माच्या वेळेपर्यंत बरीचशी पूर्ण होते. तरी सुध्दा जन्मानंतरही काहीप्रमाणात न्यूरॉन्सची बांधणी चालूच असते. वयाच्या दोन वर्षापर्यंत माणसाचा ८०% मेंदू विकसीत झालेला असतो.
बालकाच्या जन्मानंतर तुम्ही त्याला नवीन किती गोष्टींचे ज्ञान देता, स्पर्श, गंध, रंग, ध्वनी, चव ह्या पंच अवयवांना वेगवेगळे अनुभव देता त्यावर त्याच्या उरलेल्या न्यूरॉन्सची बांधणी अधिक होते आणि पर्यायाने तुमचे मूल हुशार होते. ह्यामध्ये आहार आणि भावनिक प्रेमालाही खूप महत्त्व आहे. ज्या बाळांना सकस आणि परिपूर्ण आहार दिला जातो, शब्द आणि स्पर्शातून पालकांचे प्रेम मिळते त्या बालकांची न्यूरॉन्सची बांधणी अधिक वेगाने होते. ह्याचाच अर्थ हुशार माणसाच्या मेंदूच्या न्यूरॉन्सचे जाळे हे अधिक दाट असते. सर्वसाधारणपणे परिक्षेत चांगले मार्क मिळवणा-या मुलांना हुशार समजले जाते. परंतु हुशारीची व्याख्या फक्त मार्क मिळवण्यापूर्ती संकूचित नसावी. अमेरिकेचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ.हॉवर्ड गार्डनर ह्यांनी हुशारी किंवा बुध्दांक हा नऊ प्रकारे मोजला जातो हे सर्वप्रथम मांडले. निसर्ग, संगीत, तर्क/गणित, मानवी अस्तित्व, भाषिक, खेळाडू/नर्तक, परस्पर सुसंवाद, कलाकृती, स्वत्त्वाची जाणिव ह्या विविध प्रकारे बुध्दांक मोजला जातो. आतातर यशस्वी माणसांसाठी बुध्दांका बरोबर भावनांकही तितकाच महत्त्वाचा आहे. बुध्दांक मोजण्याच्या विविधतेवरुन 'मलटीपल इन्टलिजन्स'ची (Multiple Intelligence) संकल्पना पुढे आली. सर्वसाधारणपणे गणित आणि भाषेत उत्तम असणारया मुलांना 'हुशार' म्हटले जाते. पण डॉ.गार्डनर ह्यांनी हा समज ठामपणे 'मलटीपल इन्टलिजन्सच्या' आधारावर मोडून काढला आहे. त्यांच्या मते गणित, भाषेत हुशार नसणारे एखादे मुल खेळात, संगीतात, चित्रकलेत अगदी निसर्गात रमणारे असेल. गरज आहे त्यातली ही विविध बुध्दीमत्ता ओळखण्याची आणि फुलवण्याची. मलटीपल इन्टलिजन्स समजून घेण्यासाठी …………….
आपल्या मेंदूचे दोन विभाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात अधिक भर डाव्या मेंदूवर दिला जातो. डावा मेंदू हा भाषा, गणित, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जवाबदार असतो त्या उलट उजवा मेंदू सृजनशिलता, कल्पकता, भावना, नेटकेपणा आणि विविध कलांशी निगडीत असतो. दोन्ही भागांच्या मेंदूचे कार्य विरुध्द परंतु परस्परपूरक आहे. डावा मेंदू माहिती हळूहळू आणि सातत्याने (repetitive) घेतो तर उजवा मेंदू ही माहिती काही क्षणात घेतो व त्याला सातत्याची आवश्यकता नसते. जेव्हा गरज पडेल तेव्हा उजव्या मेंदूला ही माहिती काही सेकंदात आठवते ह्याला 'फोटोग्राफीक मेमरी' म्हणतात. जपानचे डॉ. सिशीदिया मॅकातो ह्यांचा त्यावर गाढा अभ्यास होता व त्यांनी जपानमध्ये प्रिस्कूलर्ससाठी अश्या ३५० संस्था काढल्या आहे. ह्याच अर्थ सहा वर्षाच्या आधी आपण उजव्या मेंदूची वाढ होण्यासाठी प्रयत्न करु शकतो म्हणजेच मलटीपल इन्टलिजन्स आपल्या मुलामध्ये जागवू शकतो. संशोधनात असे सिध्द झाले आहे की अपूरा आणि निकृष्ट आहार, विशिष्ट इन्फेक्शन किंवा औषधे, प्रदुषित वातावरण आणि जास्तीचा स्ट्रेस हा मेंदूच्या वाढीत अडथळे निर्माण करतो. मेंदूच्या वाढीसाठी चारवेळा सकस आणि पौष्टीक आहार, योग्य प्रमाणात पाणी आणि कमीतकमी ताणतणाव हे सर्व आवश्यक आहे. मेंदूचे कार्य समजावून घेतल्यावर आपल्या पाल्यांसाठी आपण जरुर उपयोग कराल ही आशा.

भाग्यश्री केंगे
marathiworld.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा