परिपूर्ण शिक्षण म्हणजे जीवनाचा अनुभव, जगण्यातील मजा, विविध वस्तू, प्रक्रिया यांचं अवलोकन आणि निरीक्षण. कोवळ्या मुलांवर नाही ती ओझी लादून आपण काय मिळवतो? त्यांच्या सर्जनशीलतेला किती वाव देतो? आम्ही यातून बाहेर पडलो आहोत आणि भोवताली पसरलाय आनंद आणि आनंदच...
दहा ऑगस्ट २००९, आमच्या आयुष्यातील एक क्रांतिकारी दिवस ठरला. आमची दोन्ही मुलं एका प्रथितयश कॉन्व्हेंट शाळेत शिकत होती. मुलगी होती पहिलीला आणि मुलगा sr. K.G.मध्ये english Medium (कॉन्व्हेंट)ला. अट्टहासामुळे त्यांची होणारी मानसिक घुसमट आम्ही रोज अनुभवत होतो. शाळेमध्ये होणारा इंग्रजी संभाषणाचा अट्टहास, रनिंग लिपी समजावून घेण्यासाठी होणारी मुलांची घुसमट, दप्तरांचं ओझं आणि या समस्या "रॅट रेस'मध्ये आपापली लेकरं पुढं दामटण्यासाठी मुलांवर शाळेच्या वेळांव्यतिरिक्त खासगी ट्यूशनचा अत्याचार, हे सगळं सगळं मुळापासून उखडून टाकावंसं वाटत होतं. पण, त्यासाठी आपल्या संस्कारांची, मातृभाषेची किंमत मोजायची तयारी नव्हती. जीवनाचा वेग समजत होता; परंतु त्यासाठी कोवळ्या मनांचा, अल्लड बालपणाचा बळी द्यायचा नव्हता आणि या सगळ्या मानसिक आंदोलनात एक आशेचा किरण दिसला, जिथं इंग्रजी शिक्षण होतं, संभाषण होतं, परंतु त्याचा अट्टहास नव्हता. मायेच्या ऊबेत त्यांच्या कोवळ्या मनाचा विचार करून लडिवाळ मातृभाषेतून इंग्रजी समजावून सांगण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. जिथं कवितेचं गाणं होत होतं आणि धड्याचं जीवन अनुभवाशी नातं जोडलं जात होतं.
मनाचा धीर एकवटला. इंग्रजी शाळेच्या विळख्यातून आधुनिकतेच्या नावाखाली मुलांच्या मन मारण्याच्या प्रक्रियेला फाटा दिला आणि दोन्ही मुलांची ऑगस्ट २००९ च्या मध्यात कॉन्व्हेंट शाळेतून नावं काढली आणि महाराष्ट्र विद्या मंडळाच्या नवीन पद्धतीने सुरू झालेल्या सेमी इंग्रजी शाळेत त्यांचा प्रवेश घेतला. आज सुमारे एक वर्षाने आम्ही जेव्हा मनाला प्रश्न विचारला, की या एक वर्षात आम्ही काय मिळवलं, तर त्याचं उत्तर आनंद, आनंद आणि आनंदच!
कशाकशाचा म्हणून सांगावा आनंद! सर्वप्रथम मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. रोज शाळेतून घरी आलं, की आपण फक्त काय काय झालं विचारायचा अवकाश, त्यांच्या उत्तरांची मालिकाच. आज मटकी शिजत घातली, मेथीची भाजी निवडली, वर्तमानपत्राच्या ऑफिसात गेलो, कवितेवरचं गाणं सादर केलं, शेतीवरच्या कार्यक्रमामध्ये मी शेतकरी झालो आणि एवढंच नाही तर पाढ्यांची गाणी, संगीत सुरवटींची प्राथमिक ओळख, इंग्रजीमधून आपापला परिचय. रोजच्या रोज व्यायामाचे धडे. रोज परिपूर्ण आहार, प्रत्यक्ष झाड लावण्याचा अनुभव या आणि अशा अनेक गोष्टी.
चांगलं शिक्षण म्हणजे नेमकं काय? चांगलं इंग्रजी संभाषण म्हणजे पूर्ण शिक्षण नाही. तो एक अत्यावश्यक भाग आहे. परंतु, परिपूर्ण शिक्षण म्हणजे जीवनाचा अनुभव, जगण्यातली मजा, विविध वस्तू, प्रक्रिया यांचं अवलोकन आणि निरीक्षण. विविध कलांचा रसास्वाद, चांगलं काय, वाईट काय ते समजून चांगल्याचं अनुकरण, प्रयोगशीलता, नावीन्याची आवड, निसर्गासंबंधी कुतूहल, कलांचा रसास्वाद.
हे सगळं आम्ही आमच्या मुलांद्वारे अनुभवत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी मुलांनी केलेल्या विविध प्रात्यक्षिकांचं एक प्रदर्शन शाळा भरवते. ते पाहून असं वाटतं खरंच आपल्या मुलांनी हे केलं, एक पालक म्हणून आणखी काय हवं?
या सर्व प्रवासात आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पालक म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? चांगल्या संस्थेची, शाळेची निवड, हवी ती पुस्तके, वह्या, गणवेश घेऊन देणे, शाळेत दिलेले होमवर्क मारून-मुटकून, घोकंपट्टी करून प्रसंगी स्वतःचं करून, ट्यूशनचा भडिमार करून पालक म्हणून आपली जबाबदारी संपते? नक्कीच नाही. मुलांना अशी "प्रॉडक्ट ओरिएंटेड ट्रीटमेंट' देऊन ती सुजाण नागरिक बनू शकतील? एखादी वस्तू तयार होताना जशी उत्पादनाची साखळी असते, त्याप्रमाणे पहिली ते दहावी मुलांना एस.एस.सी. बोर्डाच्या फॅक्टरीत चढवले, की बहुतांश त्यातून कृतीपेक्षा पुस्तकी ज्ञानाला कवटाळणाऱ्या पिढ्या तयार होत जातात. हे सर्वांना माहीत असतं, कळत असतं आणि म्हणूनच "थ्री इडियट'सारखा परंपरेला छेद देणारा, नवीन विचार मांडणारा चित्रपट मनाला भावून जातो. पण, हा विचार प्रत्यक्षात आणायचा असेल तर प्रत्येक पालकाला कृतिशील व्हावं लागेल. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड द्यावी लागेल. प्रत्येक पाठ वाचून त्याचे कृतीत कसे रूपांतर करता येईल हे पाहायला लागेल. प्रयोगशीलता प्रत्येकाने अंगी बाणावयास पाहिजे. उदा. झाडांबाबतचा पाठ प्रत्यक्ष झाड लावून, जोपासून, झाड, जमीन, पाणी, पक्षी, मानव, सूर्यप्रकाश, हवा अशा अनेक अंगांची ओळख, त्याचा जीवनानुभव मुलांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करायला हवा.
शाळांमध्ये असलेली मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची धावपळ, स्नेहसंमेलने, स्पोर्टस डे, शिक्षकांवर लादलेली इतर कामे यांमुळे सर्वच गोष्टी आपण शाळेकडून अपेक्षित करू शकत नाही. म्हणून आपण पालकांनीच आता खऱ्या अर्थाने शिक्षक बनायला हवं. आपल्या पाल्यासाठी वेळ काढायला हवा. हे सोपं नाही, परंतु अशक्य मात्र नक्कीच नाही.
आजकाल रविवारी काय करायचं, मुलांच्या सुट्यांमध्ये काय करायचं, अशा प्रश्नांचं उत्तर असतं - शाळा संपली की आता त्यांना शिबिरांमध्ये टाकू. जिथं संस्कार, शिक्षण, छंद "गॅरेंटेड' विकलं जातं. अशा विकाऊ शिबिरांत मुलं स्मार्ट बनत असतील; जिज्ञासू बनत असतील? कला, कौशल्याची तोंडओळख होत असेल; परंतु कलेचा रसास्वाद घेण्याइतका त्यांच्याकडे वेळ तरी कुठे असतो? आणि एका वेळेला पन्नास मुलांच्या क्रियाशीलतेला वाव मिळत असेल? ही शिबिरांवर टीका नाही; वस्तुस्थिती आहे. पालकांना जागं करायचा प्रयत्न आहे.
आपल्या मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे कलागुण, आकलन शक्ती, निरीक्षण शक्ती आपल्यालाच माहीत असतात. त्यांना योग्य तो वाव, न्याय आपणच दिला पाहिजे. सेन्सेक्स कितीने वाढेल, हे सांगता येत नाही. बॅंकेचे व्याजदर कमी का जास्त होतील, हे सांगता येत नाही; परंतु आपल्याकडे असलेलं आनंदाचं रोपटं घडवूयात. त्यांना खत, पाणी घालूयात आणि त्यांची वाढ होतानाची पर्वणी पुरेपूर लुटूयात.
यामध्ये कुठेही शिक्षणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये; परंतु शालेय शिक्षणाला कृतिशील अनुभवांची जोड अत्यंत जरुरी आहे. विविध खेळ, छंद, साहित्य, कथा, कविता, नाटक यातून माणसाला माणूस म्हणून समजावून घेण्याची, अंतर्मनाला साद घालण्याची संधी मिळत असते. जीवनाचा रसपूर्ण आनंद पालकांनी पाल्याबरोबर उपभोगला पाहिजे. परंतु, हे तू केलंच पाहिजे, याची बळजबरी नको; तुलना तर मुळीच नको. आपला अहंकार जोपासण्यासाठी त्यांना वेठीस धरायला नको. हे बदलायला हवं. प्रत्येक मूल हे निसर्गाचा एक चमत्कार आहे, एक प्रतिभाशाली धगधगतं रसायन. भगवंताने ते आपल्या हाती सोपवलं आहे. त्याला योग्य तो न्याय आपण दिलाच पाहिजे. नाही तर यातून पुढं उभ्या राहणाऱ्या गंभीर समस्या आपण रोज वाचतोय. कोवळ्या मुलांच्या आत्महत्या, तरुणांचे अश्लील चाळे, मोबाईल इंटरनेट यांच्या विळख्यात सापडलेली आजची तरुण पिढी, चोऱ्यामाऱ्या, खून, दरोडे हे सर्व करणारी मंडळी केव्हा तरी लहान मुलंच असतील ना? ही सर्व कृत्ये करायला हे धजावले कसे? यांचं बालपण नेमकं कसं गेलं? आई-वडिलांकडून यांना योग्य तो वेळ, मायेची ऊब, वेळप्रसंगी शिक्षा, जाब विचारणं झालं असेल का? एक जबाबदार पालक म्हणून मी या सर्व गोष्टींचा विचार करतो का? मी माझ्या पाल्यासाठी काय देऊ शकतो? सुजाण समाज बनण्यासाठी माझ्या पाल्याला सुजाण करणं, त्याच्या चैतन्याला चांगला आकार देणं आणि हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे, असं मला वाटतं.
बाळकृष्ण दामले, पुणे